तुम्हीही जातीवरून ठरवणार आहात का सायली कांबळेला वोट करायचं की नाही ?

तुम्हीही जातीवरून ठरवणार आहात का सायली कांबळेला वोट करायचं की नाही ?

तुम्हीही जातीवरून ठरवणार आहात का सायली कांबळेला वोट करायचं की नाही ?

सायली कांबळे नावाची कोणीतरी युवती इंडियन आयडॉलमध्ये चांगलं गाते, असं ऐकलं होतं ; त्यामुळे युट्युबला सर्च करून तिची गाणी ऐकली. ती खरोखरच एक चांगली ताकदीची गायिका आहे. तिची गाण्यावर चांगली पकड आहे. आवाजात गोडवा आहे. तिची शब्दफेक आणि व्यक्त होणारा भाव यात सुद्धा ती माहिर आहे. तिच्यात जबरदस्त आत्मविश्वास आहे. एकंदरीत इंडियन आयडॉलमधील एक ताकदीची स्पर्धक आहे !

उद्या कदाचित ती अंतिम विजेता असेल किंवा नसेलसुद्धा ! जो आणि जसा निकाल लागेल, तो तुम्हाला खिलाडूवृत्तीने स्वीकारता आला पाहिजे. निकालांमध्ये काही उणंदुणं झालंच तर ते फक्त लक्षात ठेवायचं असतं. आपल्यावर एखाद्या अव्यवस्थेमुळे अन्याय झाला, अशी भावना मनात आली तरी ती अव्यवस्था दूर करण्यासाठी तुम्ही संयमाने भविष्यात अखंड प्रयत्नशील राहिलं पाहिजे. नुसतं वर्तमानात निरर्थक हातपाय आपटणं, आकांडतांडव करणं याला काहीही अर्थ उरत नसतो.

सायली कांबळेचं आडनाव कांबळे असल्यामुळे ती समाजातील कुठल्या घटकांतून आलेली आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आपल्याकडच्या समाजव्यवस्थेत राहत नाही. परंतु तरीही काही महाभाग की आपली आहे, मागासवर्गीय आहे, शेड्युल कास्ट आहे, जयभीमवाली आहे, बौद्ध आहे, सीआर आहे, एमआर आहे, अशी अनेक बिरुदं लावून तिच्याबद्दल स्वतःहूनच रिकामटेकडा अभिमान बाळगत असतात आणि एका चांगल्या कलावंताला जातीच्या कोंदणात संकुचित करून टाकत असतात.

बरं ही मंडळी इतर वेळी जातीयवादाच्या विरोधात असतात. जातीयवाद हा त्यांना भारतातला मोठा रोग वाटत असतो. जातीवाद संपला पाहिजे, अशी त्यांची भावना असते. जातीयवादाविरोधात ही मंडळी मोठी आक्रमक असतात ; परंतु कांबळे आडनावाचा कोणी त्यांच्या समोर येतं, तेव्हा त्या व्यक्तीचं जातीय दृष्टिकोनातून मूल्यमापन करण्याचा मोह या मंडळींना आवरत नाही. इथे ज्यांना तुम्ही जातीयवादी म्हणता, त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही जातीवरून ठरवणार आहात का सायलीला वोट करायचं की नाही?

मग सुरू होतात रिकामटेकडे मॅसेजचे उद्योग आणि त्यातून नेहमीचं रडगाणं ! सायली कांबळे ही आपली/बौद्ध असल्यामुळे तिला मतं मिळत नाहीयेत, त्यामुळे तिला जास्तीत जास्त मतदान करा, असं पसरवून आपण खूप मोठं समाजकार्य करतोय, असा या मंडळींचा एक गोड गैरसमज असतो. हा कट्टरतावाद जातीयवादाला पूरक ठरतो किंवा तो सायली कांबळेसारख्या गुणी कलावंताचं नुकसानच करत असतो, ही भावना, ही जाणीव पुसटशीही या लोकांना नसते.

अलिकडेच एका एपिसोडमध्ये सायली कांबळे ही शिर्डीच्या साईबाबांना केलेल्या नवसामुळे झालेली मुलगी आहे आणि ती साईबाबांची भक्त आहे, असा ‘भयानक’ गौप्यस्फोट झाल्यानंतर या मंडळींचा भ्रमनिरास झाला. त्यांच्यावर आभाळ कोसळलं. ते 180 कोनात फिरले आणि सायली कांबळेला वोट करू नका, असे मेसेज फिरवू लागले.

गायकी गुणवत्ता मागे पडली आणि जातधर्म, विखार, द्वेष ठरवू लागला की तिला वोटींग करायचं की नाही !

कोण आहेत हे नतद्रष्ट दळभद्री लोक, जे परिवर्तनाच्या प्रक्रियेला खरं तर मारक आहेत. ही मंडळी छाती फुगवून समाजसुधारकांचा वारसा तर सांगत असतात ; पण प्रत्यक्षात यांचं वर्तन समाजसुधारणेच्या आजवर झालेल्या कामावर बोळा फिरवणारं असतं.

इंडियन आयडॉल ही गाण्याची स्पर्धा आहे. तिथे तुमचं गाणं खणखणीतपणे वाजणार आहे ! तुम्ही जिंका अथवा जिंकू नका, एक मोठा मंच तुम्हाला उपलब्ध झालेला असतो. काय रियॅलिटी असेल, फेक असेल, पण करोडो लोकांनी तुम्हाला पाहिलेलं, ऐकलेलं असतं. करोडो लोकांना तुमचा आवाज आवडू लागलेला असतो. त्याच्यावर स्वार होऊन नव्या माध्यमांचा वापर करून, तुमचं पुढचं करिअर तुम्ही कसं घडवायचं, हे पुढे तुमच्या हातात असतं.

सायली कांबळे ज्या पद्धतीने परफॉर्म करते, तिच्यात एक जबरदस्त आत्मविश्वास असल्याचं दिसतं. समाजमाध्यम चाळलं की लक्षात येतं की जातीपातीच्या पलिकडे तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे. ती पुढे मोठी गायिका म्हणून उभी राहील किंवा कदाचित नाहीसुद्धा राहणार ! कदाचित तिचं करीअर क्षेत्रही वेगळं असेल. भविष्य काहीही असू शकेल.

काही दिवसांनी इंडियन आयडॉलचा हा सीजन संपलेला असेल, सायली कांबळे कदाचित चर्चेत असेल किंवा चर्चेबाहेरही गेलेली असेल ; परंतु तिच्या निमित्ताने समाजमाध्यमात फैलावून ठेवलेली जातीयवादी विखारी घाण मात्र उदाहरण म्हणून मागे उरलेली असेल. असल्या थिल्लर उद्योगांनी तुमचा कट्टरतावाद काही काळ तुम्हाला गुदगुल्या करेल, पण अशाने समाजमाध्यमात उमटत जाणारे जातीयवादी ओरखडे मात्र कायम राहतात, अधिक गडद होत जातात, याचं भान उत्साही उथळ मंडळींनी ठेवण्याची गरज आहे !

ज्यांना स्वत:च्या जातीचा अभिमान आहे, असे लोक जातीयवादाविरोधात कधीच असू शकत नाहीत. उलट, ते जातीयवाद पोसत असतात.

तुम्ही मागे का फेकला गेलात, कारण हजारों वर्ष गुणवत्तेवर नव्हें, तर तुमचं जातीय दृष्टीने मूल्यमापन झालं अशी तुमची तक्रार असते; मग किमान तुम्ही तरी त्याच दृष्टिकोनातून गुणवत्ता तपासण्याचा रोग स्वत:ला लागू देऊ नये. बाबासाहेबांचे उपकार विसरले, असं तुम्ही येताजाता प्रत्येकाला हिनवत असता ; पण बाबासाहेबांचे उपकार लक्षात ठेवलेले तुम्ही काय दिवे लावत आहात, याचीही कधीतरी झाडाझडती होण्याची गरज आहे.

 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक,  मिडिया भारत न्यूज

MediaBharatNews

Related Posts
comments
  • Vilas Kalu Yeshwante

    July 15, 2021 at 4:22 am

    योग्य विश्लेषण
    100%सगमत

  • खूपच अभ्यासपूर्ण व छान मते असलेला हा लेख लिहिण्यात आला आहे लेखकाचं अभिनंदन आणि कौतुक समाजातील दुटप्पीपणा व खरा कलावंत त्याचं कौतुक कसं करावं याचा स्पष्ट दृष्टिकोण सांगितला गेला आहे

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!