काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या निमित्ताने जम्मूकाश्मीरातील अतिरेकी कारवाया आणि त्याचाच एक भाग म्हणून काश्मीरी हिंदूंवर आपले घरदार सोडून आलेली पलायनाची पाळी या सगळ्या घटना पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. १९९० मधील या घटनांमध्ये हिंदुंचं केवळ पलायन झालेलं नाही तर कित्येकांच्या हत्या झाल्यात, घरं लुटली गेलीत आणि स्त्रीयांवर अत्याचार झाल्याचंही सांगण्यात येतं.
सिनेमाच्या निमित्ताने एक नाव पुन्हा चर्चेत आलंय, ज्या नावाची काश्मीरी हिंदुंमध्ये प्रचंड दहशत होती. फारूक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे ! फारूकचं टोपणनाव बिट्टा होतं आणि मार्शल आर्टमधील त्याच्या कौशल्यामुळे तो बिट्टा कराटे म्हणून ओळखला जातो.

बिट्टाने खोऱ्यात अनेकांच्या हत्या केल्या. अगदी मुस्लिमांच्याही ! पण त्याच्या क्रौर्याला बळी पडलेले अधिकजण हिंदूच होते. भारताच्या बाजूने असणं किंवा काश्मीर स्वतंत्र करण्याच्या मोहिमेला विरोध करणं हे हत्येचे निकष होते. बिट्टाने आपल्या अतिरेकी कारवायांची सुरुवात सतीश टिक्कूंच्या हत्येने केली. टिक्कूंशी त्याचे मैत्रीसंबंध होते. कदाचित टिक्कूंच्या हत्येवेळी बिट्टाचं काळीज हाललंही असेल, पण त्याने हत्या केली, हे सत्य नाकारता येत नाही.
बिट्टा हुकुमाचा ताबेदार होता. अतिरेकी कारवायांत सामील झाल्यानंतर तो एकप्रकारचा गुलाम होता. त्याच्या मेंदूवर पाकिस्तानातून काश्मीरात लुडबुड करणाऱ्यांचं नियंत्रण होतं. पाकिस्तानच्या हातचं बाहुलं बनलेला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्टसारख्या झुंडीचा कमांडर अशफाक माजिद वाणी याच्या इशाऱ्यावर बिट्टा कठपुतळीप्रमाणे वागत होता. अशफाककडून जे नाव यायचं त्यांची तो हत्या करायचा. स्त्रीयांच्या, लहान मुलांच्या डोळ्यांदेखत हत्या करतानाही त्याला काही वाटत नव्हतं.
'मी कोणाही निरापराधांना मारलं नाही. 'वरून' जे नाव यायचं, त्यांचा मी खातमा केला', असं बिट्टा म्हणतो. पण तुला माहिती असायचं का ते कोण आहेत, असं विचारल्यावर बिट्टा म्हणतो, 'वरून' नाव आलं की विषय संपला ! ते नाव म्हणजे स्वतंत्र काश्मीरच्या ध्येयाविरोधातलंच असणार हे तो गृहित धरायचा.
समोरची व्यक्ती कोण आहे हे माहित नसतानाही तो दावा करतो की मी निरापराधांना मारलेलं नाही. 'वरून' जे नाव येईल त्या व्यक्तीला 'शत्रू' समजून तो गोळ्या घालत असे. त्याचा संघटनेशी करारच तसा झालेला होता. शत्रू कोण आहे, हे संघटना ठरवत होती, बिट्टा नव्हें !

पाकिस्तानातून बिट्टाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही काश्मीरमध्ये तुमचं काम दाखवलं की आम्ही भारतावर हल्ला करून काश्मीरची मुक्तता करू. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. दरम्यान अतिरेक्यांनी बंदुकीच्या जोरावर खंडणीखोरी, लुटमारी, स्त्रीयांवर अत्याचार सुरू केले. तिथून तो हळुहळू काश्मीर स्वातंत्र्याच्या मानसिकतेतून बाहेर येत गेला. त्याच्या मते, काश्मीर भारतातून मुक्त होणं निव्वळ अशक्य आहे. अतिरेक्यांचा भारत सरकारला शरण जाण्याचा निर्णय त्याला आता योग्य वाटतो.
बिट्टा कराटे २००६ मध्ये जामीनावर बाहेर आलाय. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा तो म्होरक्या आहे. आपल्याला जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते, याची त्याला जाणीव आहे. ती व्हायलाही हवी. विद्वेष, विखाराच्या मागे आयुष्य असं पार भरकटून गेल्यावर तो भानावर आलेला असला तरी त्याचं क्रोर्य माफी देण्यालायक नाही.
जून, १९९० मध्ये अटक झालेला बिट्टा २००६ साली जामीनावर बाहेर आला, पण दरम्यानच्या १६ वर्षात त्याला पोलिस आणि न्याययंत्रणा शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ शकली नाही, हे खेदजनकच म्हणावं लागेल. बाहेर आल्यावर त्याने पत्रकार परिषद घेऊन विस्थापित हिंदुंना खोऱ्यात परतण्याचं आवाहन केलं खरं, पण जो व्यक्ति आजपर्यंत फासावर जायला हवा होता, तो आम्हाला परतण्याचं आवाहन करतोय, हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया त्यावेळी काश्मीरी हिंदुंतून आली होती.
जम्मू-काश्मीरातील सत्तास्वार्थी राजकारणातून स्वतंत्र काश्मीरसारखे उपद्व्याप जन्माला आलेत. या राजकारणाने तिथे एकत्र नांदत असलेल्या हिंदुमुस्लिमांना आमनेसामने उभं केलं. राममंदिर आंदोलनासारख्या घटनांनी आगीत तेल ओतायचं काम केलं.

बिट्टासारखे कित्येक युवक पाकिस्तानच्या विखारी विषपेरणीचे बळी होऊन स्वत:च्याच देशाविरोधात उभे ठाकले. हत्या कोणाची करायची, हे ते ठरवत नव्हते, तर फक्त 'वरून' येणाऱ्या आदेशांचं एखाद्या रोबोटप्रमाणे पालन करत होते. धर्माचा फुका अभिमान तुम्हाला धर्मांधतेकडे घेऊन जातो आणि पुढे माणसातून उठवतो, याचं बिट्टा कराटे एक ठळक उदाहरण आहे. अशी हजारो उदाहरणे असतील. ही लागण आता हिंदुंनाही झाली आहे.
धर्मविद्वेषाच्या आड हिंदुंमध्येही बिट्टा तयार करण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे. बिट्टा कुठल्याही जातीधर्माचे असोत, ते देशविरोधीच असतात, हे आपण स्पष्टपणे स्वीकारलं पाहिजे आणि ठणकावून सांगितलं पाहिजे. धर्मविद्वेषातून राजकीय खेळातल्या कठपुतळी होऊन निरापराधांचे बळी घेतल्यानंतरची मागाहून उपरती काही कामाची नाही. भानावर राहून स्वत:चा मेंदू इतर कोणाला वापरू न देता स्वत:चा बिट्टा कराटे होऊ न देणं प्रत्येकाला जमलं पाहिजे.
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com