डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेल्या समारोपाच्या भाषणातील विचार देशातील आजच्या स्थितीतही दिशादर्शक असेच आहेत, देशात फोफावत चाललेल्या धर्मांध प्रवृत्तींना भारतीय संविधान हेच भरभक्कम उत्तर आहे, असं मत महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं. कायद्याने वागा लोकचळवळीने प्रकाशित केलेल्या 'भारतीय राष्ट्र निर्मितीची मूलतत्वे' या पुस्तिकेच्या संदर्भाने एडवोकेट ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कायद्याने वागा लोकचळवळीचा फातिमाबी-सावित्री उत्सव यंदा पुण्यात एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनमध्ये होत आहे. उत्सवाचं यंदाचं आठवं वर्ष आहे. ८ व ९ जानेवारी होणाऱ्या दोन दिवसीय उत्सवातील दुसऱ्या दिवशी सावित्री पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी एड. यशोमती ठाकूर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
त्याचंच रीतसर निमंत्रण देण्यासाठी कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर तसंच फातिमाबी-सावित्री उत्सवाच्या समन्वयक वृषाली विनायक व लोकचळवळीचे राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांनी मुंबईत एड. ठाकूर यांची भेट घेतली.

शासनाकडून 'फातिमाबी-सावित्री उत्सव' साजरा करण्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल यशोमती ठाकूर यांचे राज असरोंडकर यांनी आभार मानले.
संविधान दिनाचं निमित्त साधत लोकचळवळीने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेची प्रत एड. ठाकूर यांना व तेथे उपस्थित आमदार मोहन हंबर्डे यांना भेट देण्यात आली.
२५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत समारोपाचं भाषण केलं होतं. त्या भाषणाचा भावानुवाद मराठीतील ख्यातनाम लेखिका सविता दामले यांनी केलाय.
ही पुस्तिका घराघरात जायला हवी, असं मत यावेळी एड ठाकूर यांनी व्यक्त केलं. बाबासाहेबांनी व्यक्त केलेल्या शक्यता आणि धर्माभिमानावरून दिलेले धोक्याचे इशारे वेळीच लक्षात घेतले गेले असते तर आजची अराजकाची हुकुमशाही स्थिती निर्माण झाली नसती, असंही त्या म्हणाल्या.