मनाने कमकुवत असतात व्यसन करणारे लोक !

मनाने कमकुवत असतात व्यसन करणारे लोक !

मनाने कमकुवत असतात व्यसन करणारे लोक !

" व्यसनाधीनता " हा बघायला गेलं तर सर्वात मोठा विळखा घालून बसलेला, बऱ्याच जणांना झालेला आजारच म्हणावा लागेल. सरळ काहीजण सांगतात खूप स्ट्रेस आहे, म्हणून आम्ही व्यसनांचा आधार घेतो.

स्ट्रेस आल्यावर व्यसन केल्यावर ते काही काळापुरता ताण जातो पण कायमचा नष्ट होत नाही. उलट व्यसनांच्या आहारी जातात माणसं. आधी माणसे व्यसन करतात आणि नंतर मात्र व्यसनच माणसांना गिळंकृत करतं. हल्लीच्या पिढ्यांकडे पाहिलं की खरंच आश्चर्य वाटतं, इतका कामाचा लोड आहे ताण आहे आणि त्यातूनही मुलं व्यसनांकडे झुकतात.

काहींना दारू, सिगारेट, गांजा, गुटका, चरस ,अमली पदार्थांचे व्यसन लागतं. जे अतिशय वाईट आहे.

मनाने फार कमजोर असतात व्यसन करणारी माणसं. दुःख पचवण्यासाठी, संकटातून सावरण्यासाठी त्या क्षणाला व्यसनांचा आसरा घेतात. पण स्वतःच्या शरीराला नाहक यातनेत लोटतात मन रिझवण्यासाठी. क्षणिक सुख मिळतही असेल. पण संकट , यातना तशाच राहतात. त्या काही केल्या सुटत नाहीत.

कुटुंबाच्या कुटुंबं उध्वस्त होतात या व्यसनापायी. मित्रपरिवार तुटत जातो. खोटं बोलणं सुरू होतं. स्वतःपासूनच स्वतःला लपवण्याचा खेळ सुरू होतो.जो कधीच संपत नाही. यांचे असे प्रताप पाहून मुलं कोमेजून जातात.

पालकांच्या अशा व्यसनाधीनतेमुळे मुलांचं बालपण हरवून जातं. जितकी खुलायला हवीत मुलं तितकी खुलतच नाहीत. अशी मुलं समाजात खूप बुजरेपणाने जगतात. त्यांच्या प्रगतीत न्यूनगंड अडथळे निर्माण करतो. निकोप आणि सकस असं बालपण ही मुलं कधीच जगलेली नसतात.

पालकांचे सततचे व्यसनांवरून झालेले भांडण पाहून काही मुलांचा उद्रेक होतो. ती समाजविघातक कृत्यांकडे आकर्षिली जातात. कुठून ना कुठून मिळेल त्या मार्गाने आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात. भांडणे करणे, शिव्या देणे, स्वार्थी जगणे हीच संस्कृती वाटू लागते.त्यात त्यांना काहीच वावगे वाटत नाही.

आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतोय हेही त्यांना जाणवत नाही. अशाप्रकारे अख्खं कुटुंब हसण्या - बागडण्याला मुकतं. सततच्या कटकटी आणि सततची भांडणे याची जणूकाही त्यांना सवय झालेली असते.‌"असेही छान जगता येतं ", हेच विसरून गेलेले असतात अशी माणसे. स्वतः नीट जगत नाहीत आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू देत नाहीत.

बाबांनो व्यसनं फार वाईट रे ... आयुष्य जाळतात दुसऱ्यांची आणि स्वतःचीही. खास करून त्यांची जी तुमच्यावर अवलंबून असतात. कधी म्हातारे आई - वडील दारुड्या मुलांमुळे हैराण असतात. तर कधी त्यांची लहान - लहान मुले आणि बायको त्रस्त होते. व्यसन एकजण करतो, त्याचा आनंद तो एकटाच घेतो. पण देशोधडीला लागतं ते त्याच अख्ख कुटुंब. काहीही दोष नसताना उगीच भरडले जातात सारेजण.

त्या लहान मुलांनाही ऐकून घ्यावं लागतं, यांचा बाप दारुड्या आहे म्हणून... बऱ्याचंदा इतर मुले त्यांच्यात मिक्स होत नाहीत. किंबहुना यांचे पालकच या मुलांमध्ये स्वतःच्या मुलांना मिक्स होऊ देत नाहीत. म्हणजे विचार करा की,या मुलांना वाळीत टाकल्यासारखं किती लहानपणापासूनच सहन करावं लागतं.

बायका तर पैसा घरात येत नाही म्हणून लोकांची धुणी-भांडी , जास्तीचे कामं करतात . जेणेकरून आपलं कुटुंब कसबसं चालावं म्हणून खुप जिव काढावा लागतो त्यांनासुद्धा .

आपल्याला इतकं सुंदर शरीर मिळालं आहे, त्याचं गटार करू नका . आपल्याला काही एक अधिकार नाही, आपल्या शरीराला व्यसनाधीनतेत लोटण्याचा. फुकट मिळालेल्या या देहाचा आदर करा. माणूस बनून जगण्याची संधी पुन्हा - पुन्हा येत नाही. म्हणूनच असं झिंगताना थोडातरी विचार करा...

जीवन एकदाच मिळतं ..पुन्हा पुन्हा नाही ....फक्त छान जगता यायला हवं...हो ना ?

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!