मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सध्या सगळीकडे विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील माणूस रोज अनेक समस्यांना तोंड देत जगत आहे. त्यात अजूनही आपल्या देशात दुर्दैवाने बहुजन समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. लोकांना वाटतं आम्हाला आरक्षण मिळतं म्हणजे आम्ही खूप काही ओरबाडून घेतो सरकार कडून, पण प्रत्यक्षात तसं अजिबातच नाही. त्यावर सविस्तर लिहीनच. पण सध्या “गायिका आणि अभिनेत्री” म्हणून मी या क्षेत्रात स्थिर होत असताना , बरेच लोक मला मेसेज पाठवून तर कधी फोनवर काही सूचना देत आहेत.
सूचना देणाऱ्यांचं म्हणणं की कशाला त्या राजकारणाच्या पोस्ट करत असतेस. आपला काय संबंध? करीअरवर परिणाम होईल. एका पक्षावर स्थिर रहा, वगैरे.
सर्व प्रथम माझ्याशी सर्व शुभचिंतकांचे मी आभार मानते की त्यांनी काळजीपोटी मला हे सल्ले दिले. पण मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत.
उद्या वाहतूक कोंडीमुळे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाला किंवा पुरामुळं किंवा ब्रिज कोसळल्यामुळे तुम्हाला कार्यक्रमाला जाता नाही आलं तर काय कराल? तुमच्या मुलांचं शिक्षण महाग होणार, कारण हळू हळू सगळ्या धनाढ्य लोकांच्या शाळाच फक्त अस्तित्वात असणार आहेत मग तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही तेव्हा काय करणार? सरकारी हॉस्पिटल ही संकल्पनाच नष्ट होऊन खाजगी मोठमोठाली हॉस्पिटलं तयार होतील तेव्हा काय करणार? जेव्हा नोकरीतून अचानक तुम्हाला काढून टाकण्यात येईल तेव्हा काय कराल? अचानक बँका बुडून तुमचा सर्व पैसा गेला तर काय कराल? निसर्गाची हानी झाल्यामुळे वारंवार नैसर्गिक आपत्ती येतच राहणार आहे तेव्हा काय कराल? रुपयाची किंमत घसरत जाईल आणि अधिकाधिक आपला देश भिकेला लागेल, पण ते तुम्हाला समजत नाहीये आणि जेव्हा कळेल की आता आपलं असं काहीच आपल्याकडे नाहीये तेव्हा काय कराल?
बरेच प्रश्न मला पडलेत. तुम्हाला जर ते पडत नसतील तर तुमचं भविष्य प्रचंड मोठया धोक्यात आहे. पुढच्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. त्यांना आपण काय भविष्य देणार आहोत याचा विचार तुम्हाआम्हाला करावाच लागेल. ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
आता याचा राजकारणाशी कसा संबंध ते सांगते.
I m supporting a person not any political party :
कसंय, राजकारण वाईट म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आमची कामं करणारा कोणी प्रतिनिधी नाही अशी ओरड करतो. कितीही नाकारलं तरी राजकारणात आपला प्रतिनिधी येत नाही तोवर मोठे बदल होणार नाही, त्यासाठी व्यक्ती बघून मतदान केलं पाहिजे, पक्ष नाही, असं मला वाटतं. पक्ष हा राजकारणाचा भाग आहे. चांगल्या माणसानी राजकारणात आलं पाहिजे त्याशिवाय बदल होणार नाही. पक्ष काय , आज हा मोठा उद्या तो मोठा चालूच राहिल. पण सत्ता असेल तर तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करून समाजाचं काम करु शकता. सरकारी तिजोरीतील पैसा गरजू घटकाला मिळावा असं वाटतं असेल तर आपला प्रतिनिधी तिथे हवा. पण आपण पक्ष आणि त्याची नीती यात अडकून त्यावर टीका करत राहतो. आपल्या प्रतिनिधींना आपण निवडून नाही देऊ शकत म्हणून त्यांना दुसऱ्या पक्षात जावं लागतं.
आता स्पष्ट च सांगायचं झालं तर सेना भाजपची व्होटबॅंक निश्चित असते. हिंदुत्व या एका मुद्यावर त्यांचा मतदार फुटत नाही. बाकी त्यांना काही जाणून घ्यायचं नसतं. त्यांनी राजकारण योग्य रीतीने जाणलं आहे. याउलट आपण आपल्याच उमेदवाराची निंदा नालस्ती करत राहतो. जोवर मतपेटीत आपली मत एक विचाराने पडत नाहीत तोवर काहीही होऊ शकत नाही.
आपण वैयक्तिकरित्या किंवा एखाद्या संस्थेच्या माध्यमातून फार थोड्या लोकांना मदत करू शकतो. पण जर आपले प्रश्न समजून घेणारा माणूस निवडून आला तर तो आपल्या शिक्षणासाठी मदत करेल, व्यवसासाठी मदत करेल. मोठमोठी कामं मंजूर करून घेईल . परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवून देईल. आपल्या मुलांसाठी हॉस्टेल बांधेल. कमी दरात विद्यार्थ्यांना चांगल्या जेवणाची सोय करेल. अशा प्रकारे सर्व सामान्यांसाठी सरकारी निधीतून अनेक सुविधा तो प्रतिनिधी मिळवून देईल. पण त्यासाठी आपण या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
प्रत्येक वॉर्ड मध्ये बैठक झाली पाहिजे. कोण कोण उमेदवार कोणकोणत्या पक्षातून उभे आहेत. त्यातला कोणता काम करणारा आहे. तो ज्या पक्षातून उभा असेल, त्याला सर्वांनी एक मताने निवडून आणले पाहिजे. एकदा आपली व्होटबॅंक पक्की झाली की मग दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. मग आपलं घर सोडायचं नाही. पण त्यासाठी आपण नुसतं भावनिक नाही तर प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे. जे सेना भाजपचे पारंपारिक मतदार करतात. तुम्ही ही जागृती आणू शकता लोकांमध्ये.
माझी नम्र विनंती आहे. तुम्हीही तुमच्या विभागातून योग्य व्यक्तीला निवडून द्या. जो आपल्या समस्या मांडू शकते अशा व्यक्तीसाठी काम करावं, अन्यथा उद्या नुसते हे नाही ते नाही म्हणून आयुष्यभर आंदोलनच करत बसावी लागतील किंवा दुर्दैव समजून रडत बसावं लागेल.
लेखिका गायिका /अभिनेत्री असून समाजमाध्यमात सामाजिक लिखाण करीत असतात.