शाळेच्या घंटेचा नाद कानावर पडला आणि अंतरंगात त्याच्याच नादलहरी विसावल्या. आपसूकच घंटेकडे लक्ष गेले. कितीतरी दिवसांनी हा आवाज ऐकत होतो सारेजण ! शाळेच्या घंटेचा नाद नवनिर्मितीसह उत्साह देणारा असतो. ऊर्जा देणारा असतो.
आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस. तब्बल दोन वर्षाच्या प्रदीर्घ विरहानंतर विद्यार्थी शाळेत येऊ लागले. आता शाळेतलं वातावरण त्यांच्यासाठी पहिल्यासारखं राहिलं नव्हतं; तरीही मुलं शाळेशी जुळवून घेताना दिसू लागली. एवढा वेळ एकाच जाग्यावर बसण्याची सवय मुलांची जवळजवळ मोडलेली होती. ती पुन्हा आता नव्याने जमवावी लागली .

मुलांच्या खूप गोष्टी बदललेल्या दिसल्या . घराची शाळा झाली हे ठीक आहे पण शाळेचेही घर झाले की मग मात्र थोडी समस्या निर्माण होते. शाळेत सर्व मुलांमध्ये एकत्र राहण्याचा, एकत्र बसून डबे खाण्याचा, हातावर हात मारण्याचा, मित्राच्या खांद्यावर हात टाकण्याच्या सवयी, बाजूला बसण्याच्या सवयी आता दिसल्या नाहीत.
जास्त वेळ मुले आता एकाच जागी स्थिर राहू शकत नाहीत. तो थिल्लरपणा , ती निरागसता सांगू पाहते की आम्हाला पण बागडायचं आहे. पण कोण ही वेळ आली. सारं चित्रच बदलून गेलं.

मूळात मानव हा समाजप्रिय प्राणी आहे . तो इतका एकलकोंडा नाही. प्रत्येकालाच कधी न कधी एकमेकांची गरज लागतेच , मग ही मुलं कशी बरी जुळवून घेतील लगेचच .
वर्गात जास्त हालचाल करता येत नाही , मग बाथरूमला जातो म्हणून सांगून , तिथेच थोडाफार टाईमपास केला जातो. बाथरूमला जातानाच प्रत्येक वर्गात डोकावण्याची, तसेच आजूबाजूला बघण्याची , रमत-गमत चालण्याची गंमत वाटू लागली आहे .
वर्गात सतत तोंडावर मास्क , हाताला सॅनेटाईज करायचं कंटाळवाणे वाटू लागले आहे. पण या गोष्टी नाईलाजास्तव का होईना मुलं करू लागली. पूर्वी मैदानात वाऱ्यासारखी धावणारी मुले आता मात्र थोडी स्थूल वाटू लागली. मैदानी खेळांची तर त्यांच्याशी फारकत झाली .
काही अबोल तर काही खूपच बडबडी झाली. स्थिरता कमी झाली आणि चुळबूळ सुरू झाली. ती चुळबूळ डोळ्यांतूनही दिसू लागली . प्रत्येकालाच बाईंशी काहीतरी बोलायचंय , सांगायचंय. आम्ही लॉकडाऊन मध्ये काय - काय केलं . किती क्षण यातनेत आणि किती क्षण आनंदात घालवले ते .

शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेला पाहण्यासाठीची आतुरता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात जाणवत होती. ऑनलाईन शिक्षण जरी चालू असले तरी प्रत्यक्ष भेट ही काही औरच असते. ऑनलाइन शिकण्यात आणि प्रत्यक्ष समोर शिक्षक उभा राहून शिकवण्यात वेगळेपण आहे .
प्रत्यक्ष व्यक्ती समोर असताना ती ग्रहण करण्याची शक्ती काही वेगळी असते. मधेच होणाऱ्या काही गमती जमती , मध्येच एकमेकांना विचारले जाणारे प्रश्न , त्या अनुषंगाने निघणारे काही इतर विषय . खरंच याला तोडच नाही , जिवंतपणा वाटतो या सर्व गोष्टींमध्ये .
शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकरूप होऊन पाठ शिकवतात आणि शिकतात. प्रत्यक्ष शिक्षक समोर असेल तर मुलेही खुलतात. मनाचे बांध खुले होतात. तोंड भरून हाक मारतात. अशी ही निरागसता कुठून रे आणता मुलांनो ? असेच बहरत रहा. हसत खेळत रहा. तुमचा तो हक्क आहे.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत
gawandenanda734@gmail.com