नदीवरची मजाच वेगळी

नदीवर कपडे धुता – धुता सहजच कवितेच्या ओळी ओठांवर येतात,
नदीमाय नदीमाय दूर तुझे घर,
लेकरांच्या मायेसाठी येते भुईवर..

गावाला नदीचा वारसा लाभणं म्हणजे यासारखे दुसरे भाग्य नाही. गाव समृद्ध, सुजलाम, सुफलाम करते ती नदी. दोन्ही बाजूला छोट्या छोट्या टेकड्या आणि मधेच खळखळणारी नदी.

टेकड्यांनी पांघरलेली हिरवी गर्द वनराई.. त्या वनराईत विविध प्रकारचे प्राणी. वळणावळणाची पायवाट तर कधी संपते आणि कधी सुरू होते ते समजत नाही. आजूबाजूला एवढी हिरवळ की देहभान विसरायला लावते.

गावी असताना पंधरा वीस जणांचे कपडे. कमीतकमी चार बादल्या तरी भरायच्या. अशावेळेला नदीचा खूप मोठा आधार वाटायचा.

घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर नदी. उताराची घसरण करत सरकण नदीवर पोहचू, अशी ह्या वळणावळणाच्या पायवाटेवरून जाताना मोठी कसरत व्हायची. खूप मोठी उतरण उतरून जावी लागायची. तीच नंतर चढण व्हायची.

साडी कमरेत खोचलेली. अस्सल गावठीपण आपल्याला येतंच. एक हात कमरेवर आणि दुसरा हात कपड्यांच्या बादलीला धरलेला. अशी माझ्यातली धूणेवाली खाली उतरताना आणि वर चढताना दमछाक झालेली दिसायची. तर कधी धापा टाकताना दिसायची.

कपडे धुणे हा काही कुणाचा आवडता प्रांत नाही. पण नदीच्या पात्रात मोकळेपणाने कपडे धुण्याची मज्जा काही औरच! एकदा का नदीवर पोहोचलात की मग मात्र मन मोकळं, स्वच्छ व्हायचं,गप्पा मारून. जसं नदीत कपडे बुडवल्यावर मळ निघून जातो, अगदी तसंच..

कधी मी आणि जाऊबाई तर कधी सूनबाई जोडीला असायची. मी दोघींबरोबर नेहमी असे. मुलूखभराच्या गप्पा व्हायच्या. कोणत्या विषयाने सुरुवात व्हायची आणि कोणत्या विषयाने शेवट व्हायचा, त्याचा तपास लागत नसे.

अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. कपडे धुण्यासारखे किती शुल्लक, छोटसं काम पण त्यातून खूप मोठा गहन अर्थ प्राप्त व्हायचा आमच्या गप्पांनी. आम्हाला मिळालेला तो अतिउत्तम स्पेस होता.

अथांग नदीचं पाणी खळखळ वाहणारं पाहिलं की मन मासोळी व्हायचं. नदीत पाय रोवून उभं राहताना, संकट आलं तरी ठामपणे सामोरं जावं हेच सांगायचं. कपड्यांना दगडावर घसरा देण्यात आपण तल्लीन असतो, तेव्हा नदीच्या नाजूक लाटा पायाशी गुदगुल्या करत असतात. मधेच चिमुकले मासे तळपाय खाजवून जातात. मन जलविहार करू लागतं. मला इथेच समजलं की माझी सूनबाईसुद्धा चांगली पट्टीची पोहणारी आहे.

नदीवरली मजा एक वेगळीच. गृहिणींना शक्यतो बिनकामाचं नदीवर जाऊन गप्पा मारलेल्या काही ऐकिवात नाही. कपडे धुणे हा तर फक्त बहाणा, खरं तर इथे मस्त जीव रमतो. वेळ कधी जातो गप्पा मारता- मारता ते कळत सुद्धा नाही. काम पण होतं आणि मनसुद्धा मोकळं होतं.

मन मैला साफ होतो. ते पुनः खळाळतं. इतकं निर्मळ होतं की त्याचा तळ दिसू लागतो,अगदी स्पष्टपणे.

पुन्हा नव्याने उभारी मिळते, दूर दूर वाहण्यासाठी, सर्वांना समृद्ध करण्यासाठी…असं हे नदीवरचं प्रेम दिवसागणिक वाढत जातं; कधी निशब्द तर कधी बोलकं होऊन जातं !

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

comments
  • तुकाराम गायकर

    September 1, 2021 at 1:45 pm

    खूप छान लेखन.असेच छान लेखन व्हावे यासाठी शुभेच्छा.

  • श्री.तुकाराम गायकर

    September 1, 2021 at 1:52 pm

    खूप छान लेखन.असेच छान लेखन व्हावे यासाठी शुभेच्छा.
    पाचघर गावची मांडवी नदी डोळ्यासमोर उभी राहिली.आपल्यातील भावस्पर्शी प्रतिभेने तेथील शब्दचित्र छान रेखाटले आहे.
    मीही माझ्या ब्लॉगवर निबंध लेखन करत असतो.अवश्य भेट द्या.www.schoolington.com

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!