रफी साहेबांची गाणी म्हणजे एक शाळाच !

रफी साहेबांची गाणी म्हणजे एक शाळाच !

रफी साहेबांची गाणी म्हणजे एक शाळाच !

गाण्याची आवड मला लहानपणापासून आहे. गाणं शिकलो नाही कधी. तशा आपल्या सगळ्याच डिग्र्या एकलव्य युनिव्हर्सिटीच्या!!! रेडिओवरची मराठी भावगीतं ऐकून ऐकून मी गुणगुणायला शिकलो. पुढे गायकांचे आवाज काढायचा नाद जडला. पण रफी साहेबांच्या वाटेला मी कधी गेलोच नाही. ही गाणी आपल्या गळ्याला झेपणारी नाहीत, या समजातच वय वाढलं.

पस्तीशीत मी उल्हासनगरातील मोहंमद रफी फॅन्स क्लबच्या निमित्ताने रफी साहेबांशी जवळीक करायचा प्रयत्न सुरू केला. सुरूवातीला गाण्याच्या नावाखाली आरडाओरडाच सुरू होता.

क्लबचे संयोजक डॉ. प्रभु आहुजा गाणी सुचवत गेले. ये गाना आप के गले को सूट होगा, ये ट्राय किजिये… तंत्रशुद्ध ज्ञान नसल्याने एकेका कार्यक्रमात सहभाग नोंदवताना चांगलीच दमछाक झाली.

त्यात आमचे डॉक्टरसाहेब म्हणायचे, ये लाईन बराबर नहीं आयी, फिल नहीं आया, आप ज बोल रहे हो, ज़ आना चाहिये, रफीसाहब को ठीक से सुनो, क्या गाया है, इतना क्लिअर उच्चारण चाहिये, हर गाने में रफी साहब की सिग्नेचर होती है, ध्यान से सुनो…

डॉक्टरसाहेबांनी मला गाणं ऐकणारा कान दिला आणि रफी साहेबांची गाणी माझ्यासाठी एक शाळाच झाली.

तेरे मेरे सपने अब एक रंग है, दिन ढल जाये, दिल की आवाज भी सुन, तुम जो मिल गये हो, मै जिंदगी का साथ, तू इस तरहा से मेरी, दर्दे दिल, दूर रहकर ना करो बात, मेरा मन तेरा प्यासा, दिल बेकरार सा है, मैने रखा है मोहब्बत, फिर तेरी याद नये गीत, तेरे प्यार ने मुझे ग़म दिया, अभी ना जाओ तोडकर, छोडकर, बार बार तोहे , याद में तेरी, मुझको अपने गले, मुझे छू रहीं है…सोबत कितीतरी गाणी मी क्लबच्या कार्यक्रमांतून गायली.

काही वाईट झाली, काही बरी झाली, पण गाणं कशाशी खातात, ते मला रफी साहेबांची गाणी गाताना कळलं. लय, ताल, सूर हा तर गाण्याचा अविभाज्य भाग आहेच, पण शब्दांचं अचूक वजन, नेमका भाव माधुर्याला किंचितही धक्का न लावता रफीसाहेबांच्या स्वच्छ नितळ उच्चारणातून येतो.

भल्या भल्या संगीतकारांच्या अवघड चालींचीही आव्हानं रफीसाहेबांनी लीलया झेलली, ती प्रत्येक बाबतीतल्या अचूकतेमुळे!!!

एक चांगला माणूस म्हणून भारत रफीसाहेबांना ओळखतो. मनाचं पावित्र्यच रफीसाहेबांच्या आवाजातून प्रतिबिंबित झालं. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा, दूरदर्शनच्या पत्रकाराने विचारलं, आप को कैसे लग रहां है, त्यावर रफीसाहेबांनी उत्तर दिलं, अल्लाह करे, ऐसा एवार्ड सबको मिले…!!!

मला गर्व वाटतो की मी आज पद्मश्री मोहंमद रफी फॅन्स क्लब सारख्या संस्थेचा सदस्य आहे, जिथे मला रफी साहेबांना ऐकता ऐकता गाणं शिकायला मिळतंय.

मला गर्व वाटतो की माझ्या प्रयत्नांने उल्हासनगरातील एक रस्ता आज मोहंमद रफी साहेबांच्या नावाने ओळखला जातो.

मला गर्व वाटतो की जेव्हा मला त्यावेळी कोणीतरी म्हटलं होतं की एका मुसलमानाचं नाव रस्त्याला का दिलंयंस, तेव्हा मी ताड्कन उत्तर दिलं होतं की ते मुसलमानाचं नाही, मोहंमद रफी साहेबांचं नाव आहे !!!

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मिडिया भारत न्यूज

MediaBharatNews

Related Posts
comments
 • रफीसाहब यांना विनम्र अभिवादन. 🙏
  राज सर गेले १५ वर्षांपासून आपला आवाज ऐकत आलोय….
  रफी फॅन क्लबमुळेच मला आपल्या रुपात एक चांगला मित्र, गुरु, मोठा भाऊ लाभलाय….मी आपणा सर्वांचा सदैव ऋणी राहीन.😊🙏

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!