अनुभव असेही…सुखावणारे !

अनुभव असेही…सुखावणारे !

अनुभव असेही…सुखावणारे !

दोन तीन रिक्षावाल्यांनी नकार दिल्यावर चवथ्याला विचारतांना मी कावलेलीच होते. त्याने होकार दिल्यावर रिक्षात बसता बसता बडबडले त्या आधीच्यांच्या निषेधपर काही.

रिक्षावाल्याने काय झालं म्हंटल्यावर करवादून त्याला ऐकवलं - दिवासा उजेडी, इथल्या इथे, हातात ओझं असलेली म्हातारी बघूनही (उर्मटपणे) नाही म्हणणाऱ्या त्याच्या समव्यावसायिकांबद्दल!

तो शांतपणे म्हणाला, कधी कधी त्यांची काही चूक नसते. थकलेले असतात म्हणून बसलेले असतात रिक्षात. कधी दिवसभराचे काम झालेले असते, घरी जायचे असते. घरं लहान असतात. आज घरी बायकोने हळदीकुंकू ठेवले असेल तर चार बायका जमल्या असतील घरी. मग घरी तरी कसं जाणार... वगैरे!

मी वरमलेच. कधीकधी दुसऱ्याचं दुःख, अडचण आपल्या लक्षात येत नाही आणि  आपण बसतो वैतागत, वाटलं. उतरताना त्याचे आभार मानले आणि जरा जास्तीचे पैसे त्याच्या हातावर ठेवले.

स्वयंपाकघरातला नळ गळत होता म्हणून प्लंबरला बोलावलं. त्याने जे काय काम केलं ते अगदी टेम्पररी! नळ पुन्हा गळायला लागला. दरम्यान बाथरूम मध्ये गिझरमधून येणाऱ्या पाण्याचाही नळ गळायला लागला होता. पहिल्याला काही धड येत नाही म्हणत दुसऱ्या एकाला बोलावलं.

तो आला, त्याने नळ बदलला. तो दुसऱ्या दिवशी तुटलाच शिवाय त्याला जोडलेल्या नळीतूनही पाण्याचे फवारे उडायला लागले! गिझरच्या नळासकट बाथरूममधला मुख्य आणि त्यातूनच पुढे गेलेला बेसिनचा नळही बंद करून ठेवावा लागला. त्यामुळे additional चिडचिड!

त्याला फोनवर फोन केले तर तो उचलेच ना! मग आणखी एक प्लंबर शोधला. त्याने आधी फोनवर फॉल्टचे फोटो टाकायला सांगितले. ते टाकल्यावर आवश्यक ते साहित्य घेऊनच आला.

विशी-बाविशीचा दिसणारा चुणचुणीत मुलगा होता. सर्व काम पाहून, आम्हाला कशा प्रकारचे नळ हवे आहेत ते समजून घेऊन, कुठले घ्यावेत याचा सल्ला देऊन, पुन्हा जाऊन आम्हाला हवेत ते घेऊन आला, फटाफट काम केलं.

त्याचं कौशल्य आणि कॉन्फिडन्स पाहून मला आणखी दोन कामं आठवली. त्यातलं एक करून टाकलं, दुसऱ्याचं काय करावं याचा सल्ला दिला. ठरवा, करून देतो म्हणाला.

खुश होऊन मी त्याला चहा-केक दिला. तो घेता घेता जरा चौकशी केली.

एवढासा दिसणारा हा मुलगा तिशीचा होता. बारावी झाल्यावर, वयाच्या अठराव्या वर्षी कामाच्या शोधात मराठवाड्यातून बहिणीच्या बरोबर तिच्या सासरी आला. दाजींच्या हाताखाली मेकॅनिकचे काम करू लागला. नंतर प्लम्बिंगचे काम शिकला. दिवसभर मिळेल ते काम करून रात्री दाजींच्या कामाला मदत करू लागला. तीन वर्षांमागे लग्न झाले. दरम्यान अर्धा गुंठा जमीन पुण्यात (!) घेऊन त्यावर घर बांधले.

आज पुण्यात त्याचे स्वतःच्या जमिनीवर स्वतःचे घर आहे. मराठवाड्यात कोरडवाहू जमीन आहे. पैसे जमवून दिवाळीत गावी जाऊन शेतात विहीर खणली आणि चक्क अठ्ठावीस फुटांवर पाणी लागलं. पन्नास फूट खणली. जसजसे पैसे जमतील तसतशी बांधून घेईन म्हणाला. आता जाऊन-येऊन शेतात वडिलांना मदतही करेन म्हणाला. विहिरीला लागलेल्या झऱ्यांचे फोटो-विडिओ दाखवले.

हे सगळं सांगताना अभिनिवेश नव्हता किंचितही, पण एक वेगळाच आत्मविश्वास होता.  त्याचं ऐकताना माझ्याच घशात कौतुकाने आवंढा येत होता. निघताना त्याला तोंडभरून आशीर्वाद दिला.

त्याने मागितले ते पैसे फार चिकित्सा न करता आधीच दिले होतेच.

छान वाटलं, ते सांगावसं वाटलं.

 

 

सुनीती सुलभा रघुनाथ 

सामाजिक कार्यकर्ता

MediaBharatNews

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!