युक्रेनमधले भारतीय विद्यार्थी मायदेशाच्या भूमिकेकडे डोळे लावून !

युक्रेनमधले भारतीय विद्यार्थी मायदेशाच्या भूमिकेकडे डोळे लावून !

युक्रेनमधले भारतीय विद्यार्थी मायदेशाच्या भूमिकेकडे डोळे लावून !

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये कधीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि रशिया युक्रेनवर हल्ला चढवू शकते, याचा अंदाज घेऊन अमेरिका, कॅनडा सारख्या देशांनी युक्रेनमधील नागरिकांना तसेच शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत बोलावलं. पंधरा दिवसांपूर्वीच या देशांनी ही सावधगिरी बाळगली, मात्र भारतीय राजदूतावासाने या कृतीला उशीर केला. परिणामी वीस हजाराच्या आसपास विद्यार्थी युक्रेनमध्ये असुरक्षित मानसिकतेत अडकून पडले आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून अनेकांनी बंकर्सचा आसरा घेतला आहे. भारतीयांना सुरक्षित माघारी आणण्यासाठी एक-दोन दिवसांत भारताकडून प्रत्यक्ष मोहिम राबवली जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतेय.

भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी जवळपास सोळा लाखांच्या आसपास असते. मात्र देशांतर्गत या शिक्षणासाठी उपलब्ध जागा एक लाखाच्या आसपासही नाहीत. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी एक मोठी संख्या परदेशी शिक्षणाचा पर्याय अवलंबते. मात्र सगळ्यांनाच परदेशी शिक्षणही परवडणारं नसतं. अशावेळी युक्रेन सारख्या छोट्या देशांमध्ये परवडणारं व तुलनेने अपेक्षित दर्जात्मक शिक्षण उपलब्ध असल्याने या देशांची निवड विद्यार्थी करतात.

एकूण देशाचा विचार करता उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातील विध्यर्थ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. कारण NEET परीक्षेसाठी बसणारे सर्वाधिक विद्यार्थी या राज्यातून असतात. सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना हा पर्याय जवळचा वाटतो.

आताच्या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी अशाच मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांना विमानाचं नियमित भाडंही तितकसं झेपणार नसतं. आता तर विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा भाड आकारायला सुरुवात केली आहे. पंचवीस हजाराचं विमान भाडं जवळपास साठ ते ऐंशी हजारावर जाऊन पोचलं आहे. यावर तोडगा कसा काढायचा या चिंतेत भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत.

युक्रेनच्या पूर्व भागात युद्धाचा तणाव आहे. पश्चिम भागाला तितकीशी झळ पोहोचलेली नाही. अडकलेले बहुतांशी भारतीय पश्चिम भागात आहेत, त्यामुळे ते कालपरवापर्यंत निर्धास्त होते. अगदी युद्ध सुरु होण्याच्या आदल्या दिवशीही भारतातून युक्रेनमध्ये विद्यार्थी गेल्याची उदाहरणे आहेत.

आताचा काळ हा परिक्षांचा आहे. पंधरा दिवसांवर तिसऱ्या वर्षाची परीक्षा येऊन ठेपली आहे. युक्रेनमधल्या विद्यापीठांनी ऑनलाइन अभ्यासाला नकार दिल्याने विद्यार्थ्यांना देश सोडणंही शक्य नव्हतं, त्यामुळे एका बाजूला मनातली असुरक्षितता आणि दुसऱ्या बाजूला तोंडावर येऊन ठेपलेली परीक्षा अशा द्विधा मन:स्थितीत विद्यार्थी सापडले आहेत.

परीक्षा जर हुकली तर काय हा सवाल त्यांना भेडसावतो आहे. त्यातच भारतात परतायचं जरी झालं तरी येण्यासाठी सुकर मार्ग नाही. युक्रेन मधल्या विमानसेवा ठप्प झालेली आहे. भारतीय विमान सेवांनी भाडं वाढवलं आहे. या पार्श्वभूमीवर क्यिवमधील भारतीय दुतावासाने पत्रक जारी केलं आहे.

युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले असल्याने विशेष उड्डाणांचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. अशी व्यवस्था निश्चित होताच दूतावास माहिती कळवेल, जेणेकरून भारतीय नागरिकांना देशाच्या पश्चिम भागात स्थलांतर करता येईल. कृपया आपले पासपोर्ट आणि आवश्यक कागदपत्रे नेहमी आपल्या सोबत ठेवा, असं भारतीय दुतावासाने पत्रकात म्हटलं आहे.

यासंदर्भातील अपडेट्ससाठी दुतावासाची वेबसाइट आणि सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम) पोस्ट फॉलो करण्याचा सल्लाही पत्रकात देण्यात आला आहे. संपर्कासाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आले आहेत.

1. +38 0997300483
2. +38 0997300428
3. +38 0933980327
4. +38 0635917881
5. +38 0935046170

 

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचं काय आहे म्हणणं ऐकण्यासाठी विडिओ पाहा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!