हजारों शब्दांचं काम एका क्षणात करतात डोळे !

हजारों शब्दांचं काम एका क्षणात करतात डोळे !

हजारों शब्दांचं काम एका क्षणात करतात डोळे !

मनीषा मावशी माझी नेहमीची भाजीवाली. आज भाजी घ्यायला गेले अन् एक वेगळीच चमक मला मावशीच्या डोळ्यात दिसली. वय वर्ष साधारण 52-53. या वयातसुद्धा डोळे अतिशय सुंदर, पाणीदार आणि बोलके. कदाचित त्यामुळेच तिच्याकडे भाजी घ्यायला गर्दी होत असावी.

"डोळे हे जुल्मी गडे, नयन तुझे साहसी, आखोंमे काजल है, नैनो मे सपना, आखों मे तेरी अजब सी अजब सी अदाये है " ही आणि अशी अनेक प्रकारची डोळ्यांवरील सुमधुर गाणी आपले हृदय जिंकून घेतात.

तसा शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचाच आहे. पण त्यात सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे आपले डोळे, जे मरणानंतरसुद्धा काही काळ जिवंत राहू शकतात. एखाद्या गरजूच्या शरीरात प्रवेश करून पुन्हा ही सुंदर दुनिया बघू शकतात.

राग, लोभ, माया, प्रेम या साऱ्या भावना डोळ्यातून स्पष्ट जाणवतात. मनातला सारा भाव डोळे समोरच्याच्या चटकन लक्षात आणून देतात म्हणून तर कधी कधी त्यांना फसवे डोळे असंही म्हटलं जातं.

डोळ्यातला साहसीपणा स्पष्ट करतो की, तो मनुष्य किती पराक्रमी आहे. एखाद्याबद्दल वाटणारं प्रेम, मस्ती, आलेली धुंदी सारं काही तर डोळे सांगतात. डोळ्यांतली चमक आनंदभाव दाखवून देते. इतरांबद्दल आदरभाव सुद्धा दाखवतात डोळे. आईच्या डोळ्यातलं वात्सल्य मुलाला जाणवल्याशिवाय राहत नाही.

कधीकधी शरमेने झुकतात डोळे. खोटेपणा दूर सारून खरेपणा सहज जाणवून देतात डोळे. खोटे बोलणारा मनुष्य सुद्धा डोळ्याला डोळे भिडवून बोलू शकत नाही. काहींच्या डोळ्यात चोरटा भाव असतो तोसुद्धा लपत नाही. नुसत्या डोळ्यांच्या खुणांनी समोरच्याला कळतं, याला काय म्हणायचंय ते. रागाने मोठे आणि लालबुंद झालेले डोळे समोरच्याला धाकात ठेवण्याचं काम करतात.

डोळ्यांतून अश्रू येतात ते दोन प्रसंगांत, एकतर अतीव दुःख झाल्यावर आणि दुसरं म्हणजे अत्यानंद झाल्यावर. पण त्यावेळी सुद्धा डोळ्यातला भाव दाखवून देतो दुःख आणि आनंद यामधली हलकीशी लकेर.

काही डोळे टपोरे, बोलके तर काही पाणीदार असतात. काहींमध्ये चपलता असते. काही डोळे कमालीचे चमकदार असतात. डोळ्यातील नितळता तुमच्या सौंदर्याला चार चाँद लावतात.

हजारो शब्दांचे काम एका क्षणात करतात डोळे. डोळ्यांनी ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता कानांपेक्षाही जास्त असते. एखाद्याच्या भावनेचा पत्ता शोधायचा असेल तर त्याच्या नजरेला नजर भिडवून पहावं.

डोळ्यांमुळे आपण सुंदर जग पाहू शकतो. रंगीबिरंगी दुनियेत जगण्याचा आनंद घेऊ शकतो. चांगले पहा आणि त्याचा चांगलाच अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. आपल्या डोळ्यांनी आपण काय पाहायचं आणि त्यातून काय घ्यायचं हे प्रत्येकानेच स्वतःसाठी ठरवावं लागत. नाहीतर एक कटाक्ष, आणि त्याचा घेतलेला चुकीचा अर्थ अनर्थ घडवल्याशिवाय राहत नाही.

 

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!