फेसबुक भारतात उचलतंय भाजपाची तळी !

फेसबुक भारतात उचलतंय भाजपाची तळी !

फेसबुक भारतात उचलतंय भाजपाची तळी !

फेसबुकचे जगात सर्वाधिक खातेधारक भारतात आहेत. भारतात फेसबुकला धंदा करायचाय आणि भाजपाला सत्तेत राहायचंय. त्यामुळे दोघे एकत्र आलेत. त्याबद्दल कोणाला काही तक्रार असण्याचं कारण नाही ; पण भाजपाची तळी उचलून धरण्यासाठी फेसबुकने आता स्वत:च्याच ध्येयधोरणाला हरताळ फासला आहे.

भारतात जातीधर्मात विद्वेष पसरवणं हे भाजपाच्या राजकारणाचं भांडवल आहे. त्यामुळे सोशलमिडियाचा वापर सातत्याने विद्वेष पसरवण्यासाठी वापरण्यावर भाजपाचा भर राहिलाय. फेसबुकचं धोरण विद्वेषाच्याविरोधात आहे, पण भारतात ते भाजपासाठी मवाळ करण्यात आलंय. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र वाॅल स्ट्रीट जर्नलने याचा भांडाफोड केलाय.

भाजपाचे खासदार टी.राजा सिंह यांच्या धार्मिक विद्वेषी वादग्रस्त फेसबुक पोस्ट हटवण्यावरून फेसबुकमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. त्यातून फेसबुक-भाजपाची हातमिळवणी जी पडद्यामागे चर्चेत होती, आता चव्हाट्यावर आली आहे. भाजपाशी संबंधित मजकुरांना ‘हेट स्पीच’ नियम लागू करण्यासाठी फेसबुकने विरोध दर्शवला आहे, कारण फेसबुकला भाजपासोबतचे संबंध बिघडवायचे नाहीत, असा आरोप अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र वॉल स्ट्रिट जर्नलमधून करण्यात आलाय.

वॉल स्ट्रिट जर्नलचं वृत्त सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातून फेसबुकचे पक्षपाती आणि सरकारला अनुरूप असणारे हितसंबंधीय धोरणच उघड झालं आहे.

फेसबुक हे सद्यस्थितीत जगभरात व्यक्त होण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरलं जाणारं समाजमाध्यम आहे. मोठमोठ्या वृत्तसंस्था सरकारांच्या बाजूने झुकल्यानंतर समांतर माध्यम म्हणून फेसबुककडे लोक पाहू लागले असतानाच डिजिटल युगात लोकांची अभिव्यक्ती असलेलं फेसबुक हे माध्यमही आता सरकारच्या वळचणीला जाऊन बसलं असल्याचं दिसून आलं आहे. खरंतर फेसबुकवर हा आरोप होताच. वाॅल स्ट्रीट जर्नलने त्याची पुष्टी केली आहे.

एका बाजूला फेसबुक हेटस्पीचच्या नावाखाली देशभरातल्या अनेक कार्यकर्त्यांच्या पोस्ट, लेख,कविता, व्हिडिओ फेसबुकने हटवते. त्यात ब-याच मराठी माध्यमांनाही याचा सामना करावा लागला आहे. गौरी लंकेश यांच्या स्मरणार्थ चालणाऱ्या नानू गौरी डॉट कॉमलाही फेसबुकने अनेक अडचणी निर्माण केल्याचे ताजे उदाहरण आहे पण भाजप कार्यकर्त्यांच्या धार्मिक विखारी वक्तव्यांकडे फेसबुक सातत्याने कानाडोळा करताना दिसते आहे.

भाजपाने आपले लोक फेसबुकमध्ये घुसवलेत. त्यामुळेच रोहिंग्या मुस्लिमांना ठार मारावं, अशी पोस्ट करणाऱ्या भाजपच्या टी राजा सिंग यांचं अकाउंट अजूनही फेसबुकवर आहे. अमेरिकेतील रेडिओ होस्ट ऍलेक्स जोन्स, नेशन ऑफ इस्लामचे नेते लुईस फर्राखन आणि इतर कट्टरपंथी धार्मिक संघटनांच्या फेसबुक अकाऊंटवर मात्र कारवाई झाल्याच्या बाबीकडे वाॅल स्ट्रीट जर्नलने लक्ष वेधलं आहे.

फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी एक्झिक्युटीव अन्खी दास यांनी टी राजा सिंग आणि किमान तीन इतर हिंदुत्ववाद्यांच्या पोस्टविरोधात हेट स्पीच नियम लागू करण्यास विरोध केला, असं फेसबुकच्या जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असल्याचं या वृत्तातून समोर आलंय.

अन्खी दास आणि भाजपाचे सबंध आता लपून राहिलेले नाहीत. अन्खी दास यांची बहीण डॉ.रश्मी दास या अभाविपच्या सक्रीय सदस्य होत्या. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शाखेच्या अध्यक्षाही राहिलेल्या आहेत. विविध माध्यमांतून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविपाची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे.

सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी डॉ.रश्मी दास यांचा २४ एप्रिल २०२० रोजी मनीकंट्रोल कॉन्ट्रीब्यूटर मध्ये छापून आलेला लेख आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात त्या रिलांयस, जिओ आणि फेसबुक यांची हातमिळवणी रिटेल क्षेत्राला चालना देणारी आहे, असं म्हणतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय कलामंच आणि अभाविप आयोजित कार्यक्रम “WOSY” अर्थात world organisation of students and youth” यातही अन्खी दास यांनी आपला सहभाग नोंदविला होता आणि त्या कार्यक्रमाचं नेतृत्व त्यांची बहिण डॉ. रश्मी दास यांच्याकडेच होतं. त्यामुळे फेसबुक आणि भाजपाचे हितसंबंध हे आजचे नाहीत, असंही साकेत गोखले यांनी म्हटलं आहे.

एकंदरीत, भाजपाविरोधातील पोस्टना पसरू न देणं, पोस्ट उडवणं आणि भाजपा समर्थकांच्या विखारी, विद्वेषी मजकुराला मोकळं रान देणं याबाबत सातत्याने जी चर्चा फेसबुकवरच मोठ्या प्रमाणात सुरू होती. तिला सबळ पुष्टी मिळून फेसबुकचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!