खासदार डॉ श्रीकांत शिंदेंना शिवसेना शाखेत शिरण्यापासून शिवसैनिक महिलेने रोखलं ! ही मीडिया भारत न्यूज ची बातमी काल तुफान चर्चेत होती. त्या बातमीखाली काही जणांनी 'फेक न्यूज', 'खोटी बातमी' 'असं काही घडलं नाही' अशा प्रतिक्रिया दिल्या.
इथे तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगतो. ही मीडिया भारत न्यूज ची बातमी आहे. ती शंभर टक्के खरी नसेल. पण ९९ टक्के नक्कीच खरीच असणार ! बातमीत आलेलं वर्णन एक टक्का इकडेतिकडे होऊ शकतं.
जे घडलंय त्याची माहिती आशा रसाळ यांनीच स्वतः 'मीडिया भारत' ला दिलीय. आशा रसाळ यांना मी जितकं ओळखतो, त्यावरून एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की त्या दबावाने, धमकीने, घाबरून जाऊन, केलेली कृती नाकारतील किंवा बोललेल्याचा इन्कार करतील अशी शक्यता नाही.

घटनेचा इन्कार करण्यासाठी पोलिसांनी आशा रसाळ यांना बोलावलं. मात्र, आपण फुटीरांना शाखेत शिरण्यासून रोखलं, यावर त्या ठाम राहिल्या. तसा जबाब त्यांनी पोलिसांना दिलाय.
सदरची घटना घडल्यावर समाजमाध्यमात एक मजकूर पसरला होता की खासदार श्रीकांत शिंदेंची काॅलर धरून त्यांना शाखेबाहेर काढले.
आशा रसाळ यांचा हवाला देत कल्याणच्या पोलिस उपायुक्तांनी पत्रकारांना जे सांगितलं की 'असं' काही घडलं नाही, ते 'असं' म्हणजे काॅलर धरून बाहेर काढणं !

हा उल्लेख 'मीडिया भारत न्यूज' च्या बातमीतही नाही. आशा रसाळ यांनी दिलेल्या माहितीतही तो नव्हता. कारण प्रत्यक्षात तसं काही घडलेलंही नव्हतं !
'मीडिया भारत न्यूज' ची बातमी आणि समाजमाध्यमात पसरलेला मजकूर वेगवेगळे आहेत. पोलिस उपायुक्तांनी समाजमाध्यमातील मजकुराबाबत जे वक्तव्य केलंय, त्यावरून आशा रसाळांनी खासदारांना अडवलं, ही बातमीच खोटी असल्याचे पतंग काही लोक उडवत आहेत.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांच्या समर्थकांना शिवसेना शाखेत शिरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, यावर आशा रसाळ आजही ठाम आहेत.
एकनाथ शिंदेंच्या काही समर्थकांनी मला संपर्क साधून बातमी खोटी असल्याचं सांगितलं. मी म्हटलं...खासदार कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण येऊद्या किंवा खासदार घटनास्थळी येताना, आलेले व शाखेत शिरतानाचा विडिओ पाठवा. आपण तो प्रसारित करू ! ना स्पष्टीकरण आलं ना विडिओ !

उलट, आशा रसाळ ह्याच खासदारांसोबत बैठकीत बसलेल्या असल्याचा फोटो पसरवून रसाळ ह्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न खासदार समर्थकांनी केला. पण आशा रसाळांनी त्याच बैठकीत उद्धव ठाकरेंची अर्थात शिवसेनेची भूमिका मांडली, हा उल्लेख बातमीतही आहे.
फोटोबाबत 'मीडिया भारत' शी बोलताना आशा रसाळ म्हणाल्या की शिवसेना आमची आहे. शाखा आमची आहे. आमच्या शाखेत फुटीर घुसताहेत आणि मी का पळून जाऊ ? त्यांनी युवकांसमोर त्यांची भूमिका मांडून संभ्रम निर्माण केला. मी त्यांच्यासमोर त्यांची भूमिका खोडून काढून शिवसेनेची भूमिका मांडली.
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज