वटसावित्रीच्या समर्थनाला आता सात जन्माच्या थापा !

वटसावित्रीच्या समर्थनाला आता सात जन्माच्या थापा !

वटसावित्रीच्या समर्थनाला आता सात जन्माच्या थापा !

कोणत्याही धर्मांच्या सणउत्सवांना कोणाचा कधीच आक्षेप नसतो आणि असूही नये. मात्र लोकांची दिशाभूल करणाऱ्या भंपकपणावर कुठलीही टीकाटीपणी झाली की जणू काही धर्मावरच आघात झाला अशी बोंब मारून उत्तरं देण्याचं टाळण्याचा प्रयत्न हितसंबंधित करतात. त्याने धार्मिक पोलखोल होत असल्याचं लक्षात आल्यावर आता अमूकतमूक कृतीत कसं विज्ञान आहे, हे विनाआधार दामटवून पसरवण्याची लबाडी समाजमाध्यमांचा गैरफायदा घेत सुरू झालीय.

पुराणकथेतील सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण वाचवले त्याला वडाच्या झाडाखाली आणून ! अशा एखाद्या प्रसंगात आपणही 'मृत्यूशी झुंज दिली' असा शब्दप्रयोग करतोच. सत्यवान-सावित्रीच्या कथेतही सावित्रीने यमाशी वाद घालणं किंवा त्याला विनवणी करणंही असंच प्रतिकात्मक आहे. त्याला कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण त्या आडून सवाष्ण स्त्रीयांनी वटपौर्णिमेचं व्रत करण्याची रूढी लादली गेली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मनोकामना करणारं हे व्रत आहे.

धर्म हे पुरुषांनी पुरुषांच्या सोयीने रचलेले, मांडलेले, बिंबवलेले असल्याने जागोजागी धर्मात स्त्रीयांना दुय्यमत्व देण्यात आलं आहे. धर्मपालनाच्या नावाखाली स्त्रीयाही ते दुय्यमत्व अभिमानाने किंवा नाईलाजाने मिरवतात.

जशा धर्मश्रद्धेने व्रत पाळणाऱ्या स्त्रीया आहेत, तशा वटपौर्णिमेचं व्रत टाळलं तर सासरी पतीनिष्ठ नसल्याचा आरोप होण्याची भीती असते म्हणून किंवा उद्या एखादं अघटित काही झालंच तर त्याचं बालंट आपल्यावर येऊ नये म्हणूनही अनेक स्त्रीया मनाविरूद्ध व्रत राखतात.

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, म्हणून पुरुषांसाठी असं एखादं व्रत का असू नये किंवा वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे पुरुषांना मिळावेत म्हणून त्यांनी वडाला फेऱ्या का मारू नयेत, असं विचारण्याची सोय पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने स्त्रीयांना ठेवलेली नाही. उलट अशी व्रतं स्त्रीयांच्या कशी हिताची आहेत, कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं वगैरेत कसं विज्ञान आहे, त्याने स्त्रीयांची चीडचीड कमी होते वगैरे निराधार माहिती समाजात पसरवून स्त्रीयांना भ्रमित करण्याचे उद्योग जोरदारपणे सुरू आहेत.

जर कुंकू लावून, मंगळसूत्र घालून चीडचीड कमी होत असेल तर पतीच्या निधनानंतर या गोष्टी स्त्रीयांकडून हिरावून का घेतल्या जातात, इतका साधा सरळ प्रश्न स्त्रीयांना पडत नाही, कारण धार्मिकतेमुळे आपण आपली विचारशक्तीच कुंठीत करून घेतलेली असते.

असाच एक खोडसाळ प्रचार सात जन्माबाबतचा !

जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो. संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या ! १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह. असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.

या आशयाचा एक मेसेज तुम्हाला वाॅटस्एपवर मिळाला असेल ! मीडिया भारत न्यूज ने हा मेसेज नामांकित डाॅक्टरांना पाठवला आणि त्यातील तथ्यतेबाबत विचारणा केली. उत्तर आलं की या दाव्याला कसलाही वैज्ञानिक, वैद्यकीय, जीवशास्त्रीय आधार नाही.

डॉ. मंजिरी मणेरीकर यांनी याबाबत सविस्तर मांडणी केलीय. वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. मणेरीकर म्हणतात,

'वटपौर्णिमेची पूजा सात जन्म हाच नवरा मिळो म्हणून करतात', ह्याची चेष्टा होते म्हणून, नवऱ्याला १०० वर्षे आयुष्य मिळो यासाठी व्रत केलं जात असल्याचा ओढून ताणून मांडलेला दावा समोर आलाय.

दर १२ वर्षांनी शरीरातील सर्व पेशी मरून नव्याने पुन्हा येतात म्हणून १२ वर्षांचं तप आणि अशी ७ तपे म्हणजे ८४ वर्ष + लग्नाचं वय १६ मिळून १०० वर्षे असं गणित मांडणारा मेसेज फिरतोय.

१. शरीरातील मेंदू, लिव्हर, किडनी, स्नायू, हार्ट इ अवयवांच्या पेशी साधारण १ वर्ष वयाला जितक्या असतात तितक्याच राहतात. त्या मेल्यास त्यांच्या जागी fibrous tissue येते. हार्ट अटॅक आल्यावर तेवढ्या भागातले स्नायू काम करत नाहीत हे आपल्याला माहीत आहे.

२. त्वचा, आतडी, गर्भाशयाचे आतले आवरण, पुरुषांमधील वृषणातील शुक्रजंतू बनवणाऱ्या पेशी ह्यांच्यातील तळाकडील पेशी सतत नव्या पेशी तयार करत असतात. गर्भाशयाचे आवरण दर महिन्याला बदलते, स्किनच्या तळाकडील पेशी सतत बाहेरच्या बाजूला शिफ्ट होतात. सर्वात बाहेरच्या थरात फक्त किरॅटीन असते. तसेच आतड्यातील पेशीही सतत बदलत असतात. 12 वर्षे ह्यासाठी अजिबात लागत नाहीत.

३. मुलांच्या लग्नाचं वय १६ असं मुळीच नव्हतं. कधी पाळण्यात लग्नं व्हायची तर कधी जरठ कुमारी विवाह व्हायचा. तेव्हा हे गणित ओढून ताणून आणलेलं आहे, हे स्पष्ट आहे.

वास्तविक, स्त्रीला नटण्यासजण्यासाठी, घराबाहेर पडून मैत्रिणींमध्ये मिसळायला ही पूजा एक बहाणा आहे.

डॉ. मणेरीकर सांगतात की माझी आई त्रिरात्री व्रत करायची, पण ती बीए पर्यंत शिकलेली होती आणि नोकरी करायची. तिने माझ्या शिक्षणावरच फक्त भर दिला तर सासू शाळेतही न गेलेली पण कलावती आईंचे ऐकून कोणत्याही पूजा करत नसली, तरी माझ्या MD शिक्षणात आणता येतील तितकी विघ्ने तिने आणली.

त्यामुळे पूजा करणे चांगले/ वाईट किंवा पूजा न करणे वाईट/चांगले असे कोणतंच मत मी मानत नाही. ज्यांना नोकरी सांभाळून पूजा करणे शक्य आहे आणि स्वतःहून करावीशी वाटते त्यांनी करावी अथवा करू नये. मात्र त्यात ओढूनताणून हास्यास्पद वैज्ञानिक कारणे शोधू नये एवढेच मी म्हणेन, असं मत डॉ. मणेरीकर यांनी व्यक्त केलंय.

एकंदरीत डॉ. मंजिरी मणेरीकर किंवा अन्य डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पेशी मृत्यू व पुनर्जीवनातून सात जन्मांचं मांडलेलं गणित निराधार, फसवं आणि समाजाची दिशाभूल करणारं आहे. विरोध या फसवेगिरीला करावा लागतो.

समाज सतत अज्ञानात राहावा यासाठीची निरंतर धडपड करणारा एक वर्ग आपल्याकडे आहे. स्वतःचं वर्चस्व अबाधित राहावं यासाठी हा वर्ग सातत्याने कार्यरत असतो.

लबाडी, खोटारडेपणा, षडयंत्र, कपटनीती, दिशाभूल, अज्ञान, अंधश्रद्धा ही या वर्गाची हत्यारं ! आमनेसामने न लढता छुप्या लढाईवर या वर्गाचा विश्वास आहे. त्यातून वरवर वाचता खरे वाटतील आणि पटकन विश्वास बसेल असे खोटारडे मेसेज तयार करून पसरवत राहण्याचं अखंड काम या वर्गाकडून सुरू असतं. त्यामुळे असे मेसेज पुढे पाठवण्याआधी ते पटण्यासारखे आहेत का, त्यात प्रथमदर्शनी तरी तथ्य दिसतंय का, असं होऊ शकतं का, असू शकतं याचा सारासार विवेक बाळगणं गरजेचं आहे.‌

लक्षात ठेवा समाजमाध्यमांचा वापर समाजाला जागृत करण्यासाठी व्हायला हवा, संभ्रमित करण्यासाठी नव्हें !

 

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मीडिया भारत न्यूज I संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

mediabharatnews@gmail.com

 

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!