आसनगाव मध्ये राहणाऱ्या विकास सूर्यकांत केदारे या युवकांने आपल्या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीसह आत्महत्या केली. विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता. विकास आणि त्याची वयोवृद्ध आई अशा दोघांनीही या आरोपाखाली काही महिने जेलमध्ये काढले होते. आपण काही गुन्हा केलेला नसताना केवळ संशयावरून भोवतालच्या व्यवस्थेने जो आपला छळ केला तो सहन करण्याच्या पलीकडचा होता, असं उद्विग्न होऊन नमूद करत विकासने मुलीसह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.
आत्महत्यापूर्व चिठ्ठीत विकासने शहापूर पोलीस ठाण्यातील क्षीरसागर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यावरही बोट ठेवलं आहे. क्षीरसागर याच्यावर विकासकडे पैशाची मागणी केल्याचा व ते न दिले गेल्याने त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. एकंदरीत पाहता संवेदनाहीन समाजव्यवस्थेने विकास आणि त्याची मुलगी आर्या यांचा बळी घेतला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी विकासची पत्नी मोनाली हिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा विकासची आई पुष्पलता आणि मुलगी आर्या या दोघीच घरात होत्या. कुठूनतरी औषधाचा वास येतोय म्हणून शोधाशोध करत असताना आपल्या घरातून बेडरूममधूनच वास येतोय असं लक्षात आल्यावर गच्चीवर असलेल्या विकासला बोलावलं आणि बेडरूमचा दरवाजा फोडून पाहिलं असता मोनालीने कीटकनाशक प्राशन केल्याचं आढळून आलं. त्यानंतर तिला त्वरेने हॉस्पिटलला हलवण्यात आलं, परंतु त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला, असं विकासची आई पुष्पलता यांचं म्हणणं आहे.
यावेळी घरात मोनालीला विचारणा केली असता तिने 'तुझ्या पप्पांना घाबरवत होते', असं मुलीला म्हटल्याचंही ६५ वर्षीय पुष्पलता सांगतात. दोघा नवराबायकोत कधी वाद असल्याचं, झाल्याचं मी तत्पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असंही त्यांचं म्हणणं आहे. मोनालीच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून, पती व सासूने छळ केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी विकास व पुष्पलता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुष्पलता यांना दोन महिन्यांत जामीन झाला तर विकासला ४ महिने जेलमध्ये राहावं लागलं.

जेलमधले दाहक अनुभव त्याने मोजक्या मित्रांना सांगितले होते. जेल, नातेवाईक, समाज, पोलिस यंत्रणेच्या अनुभवांनी त्याच्या मनावर खोल जखमा केल्या असाव्यात, असं विकासची आत्महत्यापूर्व चिठ्ठी वाचल्यावर लक्षात येतं.
आज १५ मार्च २०२२, जवळपास ७ महिने झालेत. मोनाली गेली. ती गेली पण मागे खूप सारे प्रश्न सोडून गेली. ७ महिन्यामध्ये मी रोज माझं मरण पाहिलं आहे. खूप त्रास होत आहे. कदाचित कुणीच समजू शकणार नाहीत. कुणाच्या तरी सांगण्यावरून तक्रार झाली. त्यानंतर मी काण आयुष्य भोगले ते फक्त मीच सांगू शकतो. आर्याकडे पाहून पुन्हा उभं रहायचा खूप प्रयत्न केला, पण आत खूप असह्य होत आहे. मी आणि आर्या आम्ही दोघेही आत्महत्या करीत आहोत...विकासच्या चिठ्ठीची सुरुवात ही अशी आहे.
मला मी न केलेल्या गुन्ह्यासाठी - शिक्षा भोगायला लावली गेली. माझा अति प्रामाणिकपणा मला नडला. झाले ते सर्व वाईट होते पण त्यात माझ्या आईची काय चूक होती? असा सवाल करीत विकासने स्पष्टपणे लिहिलंय की पोलिस अधिकारी आर एस क्षीरसागर सारखे नीच पैश्याला हपापलेले लोक भेटले. त्यांना द्यायला लाखों रुपये नव्हते म्हणून माझ्या आयुष्याची वाट लावली ! पोलिस व इतर सरकारी लोक जे पैश्यासाठी निरपराध लोकांना अडकतात, त्यांना माझा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही.

जेलमध्ये माझ्यासारखे ८० टक्के लोक आहेत जे फक्त तपास अधिकाऱ्याला द्यायला पैसे नाहीत म्हणून नरकयातना भोगत आहेत, असंही विकासने चिठ्ठीत नमूद केलंय.
त्याने असं का लिहिलंय हे विचारलं असता विकासची आई पुष्पलता केदारे यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं की क्षीरसागर या पोलिस अधिकाऱ्याने आमच्याकडे दीड लाखांची मागणी केली होती. तो फ्लॅटचे पेपरही मागत होता. सारखा दबाव आणत होता. त्याने विकासचा खूप छळ केलाय. तारखेवर आम्हाला, मोनालीच्या माहेरचे लोक मारणार आहेत, म्हणून भीती घालायचा.
पुष्पलता यांच्या आरोपांची पुष्टी उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ता शिवाजी रगडे यांनीही केलीय. क्षीरसागर यांच्या पैश्याच्या मागणीबद्दल आणि छळाबद्द्ल विकास आपल्याकडे बोलला होता, असा रगडे यांचा दावा आहे. जेलमधल्या अनुभवांनीही तो अस्वस्थ होता, असं रगडे यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं. सदरबाबत पोलिस अधीक्षक नवनाथ ढवळे यांच्याशी चर्चा झालीय व त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्यामार्फत आरोपांची चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय.
शहापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं की क्षीरसागर हे विकासच्या पत्नीच्या आत्महत्येत तपास अधिकारी होते. त्यांच्यावरील आरोप यापूर्वी समोर आले नव्हते, पण पहिल्यांदाच काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी करू आणि यथोचित कायदेशीर कारवाई करू.