विदर्भातील पूरग्रस्त गावं २६ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत !

विदर्भातील पूरग्रस्त गावं २६ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत !

विदर्भातील पूरग्रस्त गावं २६ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत !

विदर्भात यंदा निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने लोकांना थेट १९९४ च्या पुराची आठवण करून दिली. गेल्या २६ वर्षात पहिल्यांदाच वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुराने लोकांची वाताहात केली. परंतु, दहा दिवस उलटले तरी शासन आश्वासनात आणि प्रशासन पंचनाम्यात अडकलं आहे. लोकांना धास्ती वाटते. १९९४ सालचीच पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीची अद्याप पूर्तता झालेली नाही. तर आता पुरातील मदतीच्या पूर्ततेसाठी कोणतं साल उजाडेल ?

२९ ऑगस्ट २०२० च्या मध्यरात्री पुराची पातळी वाढायला सुरुवात झाली. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे पूर्ण पातळीमध्ये उघडल्याने वैनगंगा नदीला ऐतिहासिक पूर आला होता. २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत हा पूर कायम राहिल्याने शेकडो गावांना याचा फटका बसला. भंडारा जिल्ह्यातील पवनी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी सावली आणि मूल, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा आणि आरमोरी तालुक्यातील गावांना पुराचा गंभीर फटका बसला.

पुराच्या तडाख्याने नदीलगतची शेकडो गावं प्रभावित झाली आणि हजारो कुटुंबं रस्त्यावर आली. या भागामध्ये बहुतेक लोकांची घरं कौलारू आणि कच्ची स्वरूपाची असल्यामुळे ती उध्वस्त झालेली आहेत. शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे या भागातील मुख्य धान पीक आणि सोबत कापूस आणि इतर भाजीपाला पिकौ जमीनदोस्त होऊन उध्वस्त झालेली आहे. पुराच्या एका आठवड्यानंतरही मोठ्या प्रमाणात शेतीची पिके पाण्याखाली बुडालेली आहेत. या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या वर्षभराच्या उपजीविकेवर पाणी पसरले आहे.

प्रशासनाकडून प्रभावित क्षेत्रांमध्ये पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, परंतु अनेक कुटुंबे अजून पंचनाम्याची प्रतीक्षा करत आहेत. अजून कुठलीही निश्चित मदत पूरग्रस्तांपर्यंत पोचली नाही.

सन १९९४ मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पूर गंगानदीला आला होता. याची आठवण दोन पीडित भागातील लोकांकडून काढली जात आहे. त्या पुरानंतर अनेक गावांनी पुनर्वसनाची मागणी प्रशासनाला केली होती, परंतु त्याची दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही आणि पूरग्रस्तांची परिस्थिती जैसे थे च राहिली. या पुरानंतर सुद्धा लोकांकडून पुन्हा एकदा पुनर्वसनाची मागणी जोर धरत आहे.

पूर्व विदर्भातील पूर हा आंतरराज्यीय नद्यांशी संबंधित आहे. वैनगंगा व पेंच या ज्या दोन नद्यांना पूर आला, त्यांपैकी वैनगंगा मध्य प्रदेशातील शिवनीतून उगम होऊन बालाघाट, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातून वाहते, तर पेंच नदीचा उगम मध्य प्रदेशाच्या छिंदवाडा जिल्ह्यात असून ती नागपूर जिल्ह्यात येते.

वैनगंगा ही विदर्भातील सर्वात मोठी नदी. मध्य प्रदेशात संजय सरोवर तर पूर्व विदर्भात भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरण आहे. त्याचप्रमाणे पेंच नदीवर मध्य प्रदेशात चौराई, तर नागपूर जिल्ह्यात पेंच धरण आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात या नद्यांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. पूर्व विदर्भात ८० मि.मी. पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. पण प्रत्यक्षात पाचपट अधिक म्हणजे ४१५ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे धरणाचे सर्व म्हणजे ३२ दरवाजे उघडण्यात आले व त्यातून १८ हजार दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यातच मध्य प्रदेश सरकारने संजय सरोवरातून अतिरिक्त पाणी सोडले. ते गोसीखुर्दमध्ये आले. त्यामुळे पुन्हा दरवाजे पाच मीटर उघडण्यात आले.

एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात विसर्ग झाल्याने वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला. त्यामुळे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना फटका बसला. असाच प्रकार नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या पेंच नदीच्या बाबतीत घडला. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे तेथील चौराई धरण भरले. तेथून ९ हजार क्युसेक (सुमारे २,५४,८५१ लिटर) पाणी प्रतिसेकंदाला सोडण्यात आले. हे पाणी नागपूर जिल्ह्यातील पेंच धरणात थडकले. परिणामी या धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडणे अपरिहार्य होते. त्यानुसारच तो सोडण्यात आला. त्यामुळे पेंच आणि कन्हानला पूर आला व नदीकाठावरील ४८ गावांना फटका बसला.

 

 

प्रशांत चव्हाण

एकलव्य सामाजिक संस्थेचा स्वयंकार्यकर्ता


संबंधित वृत्तांत युट्यूबवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!