झाले गेले विसरून जावे…!!!

झाले गेले विसरून जावे…!!!

झाले गेले विसरून जावे…!!!

विसरणं हे शाप आहे की वरदान असं कोणी म्हटलं तर... विसरणं हे वरदानच आहे ! वाईट गोष्टी विसरून जाऊन नव्या उमेदीने जीवन फुलवता येतं. न आवडणार्‍या गोष्टी विसरल्याने दुसर्‍याला माफ करता येतं. किंबहुना स्वतःला माफ करणं केव्हाही चांगलंच.

जितकं साठवू आणि आठवू तितका त्याचा त्रास आपल्यालाच अधिक होत असतो. हा असं का वागला? तो तसं का वागला? हे असं का झालं? ते तसं का झालं? आपण काय त्यावर संशोधन करणार आहोत का? मग का ह्या सर्व गोष्टींची आपण आपल्याशीच सांगड घालत बसतो? आपला स्वभाव चांगला असूनही आपल्याशी लोक वाईट का वागतात ? असंच सारखं मनात येत राहतं.

मग अशावेळी आपलंच काहीतरी चुकलं असेल, त्यामुळे लोक आपल्याशी असं वागले असतील, असं जर मनाशी धरलं तर आपण स्वतःला आपण खूप त्रास करून घेतो. त्याचा परिणाम आपल्या मनावर व नंतर शरीरावर सुद्धा होतो.

हे जर टाळायचं असेल तर आपण आधी स्वतःला माफ करायला शिकलं पाहिजे. स्वतःला माफ केलं की सगळ्या गोष्टी कशा सुसह्य होतात. दुसऱ्याला माफ केलं की मन हलकं होतं.

समजा एखाद्याने त्याची चूक कबूल केली आणि आपण त्याला समजून घेऊन मोठ्या मनाने माफ केलं तरीसुद्धा जर त्या व्यक्तीने स्वतःलाच माफ केलं नसेल तर ती व्यक्ती मनातून खचत जाते. त्याच्या वागण्याबोलण्यात ते जाणवू लागतं.

जिथल्या तिथे गोष्टी सोडून द्या, असं म्हणणं खूप सोप्पं असतं; परंतु त्याचा प्रत्यक्षात वापर करणं खूपच अवघड आहे. प्रत्येकावर झालेले संस्कार त्याला बरोबर किंवा चुकीचं वागायला भाग पाडत असतात. हा ज्याचा त्याचा स्वभावधर्म असतो. दुसर्‍याला, बदल म्हणण्यापेक्षा आपणच त्या व्यक्तीच्या बाबतीत बदललो तर जगणं आनंदी होईल .

हे खरं आहे. मन शांत, प्रसन्न आणि हलकं होतं. शांत आणि प्रसन्न मनात नवीन गोष्टी शिकण्याची उमेद निर्माण होते. आपला उत्कर्ष होतो. जे आपल्याला चुकीच वाटतं ते समोरच्याला चुकीच वाटेलच असं नाही. तो त्याच्या संस्कारांचा भाग आहे. तो एक स्वतंत्र जीव आहे आणि आपणही एक स्वतंत्र जीव आहोत.

जरी आपण एकमेकांमध्ये राहतो तरी प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकाला आपली स्वची मते आहेत. इतरांचा बदला घेण्याची भावना ठेवण्यापेक्षा आपल्यातच आपण बदल घडवून आणला तर आपली शारीरिक व मानसिक हानी आपण थांबवू शकतो.

दुसर्‍यांना सुधारण्यात वेळ घालण्यापेक्षा स्वतःचे छंद जोपासा, आपल्या आवडत्या कामात वेळ घालवा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटतात. दुर्लक्षित केलेल्या गोष्टी लवकरच विस्मरणात जातात.

विसरणं आणि स्वतःला माफ करणं ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाण्याची तिसरी बाजू आहे - दुसऱ्याला माफ करणं. घडून गेलेल्या आयुष्यातील वाईट घटना विसरल्या की माफ करायला अवघड जात नाही.

चूक झाली तर मान्य करा आणि परत ती चूक आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे प्रश्नच राहत नाही. चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवाव्यात आणि वाईट गोष्टी विसरून जाव्यात. त्यात आपलही चांगभलं आणि समोरच्याचंही.

मग जगणं सुद्धा मजेशीर वाटू लागतं. आपलं कर्तव्य पार पाडण्यात कोणतेच अडथळे वाटत नाहीत. चांगले कर्म करत राहिलो की चांगलं फळ आपोआपच आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि हो ! फळ चांगलं मिळो ना मिळो,आनंद मिळेलच की ! हो ना!

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!