जगण्याला पैलू पाडते मैत्री !

जगण्याला पैलू पाडते मैत्री !

जगण्याला पैलू पाडते मैत्री !

मैत्री म्हणजे,
वसंत ऋतूतील
झाडाला फुटलेली पालवी..
मैत्री म्हणजे,
भर उन्हातही
गर्द झाडांची सावली..

विचार जुळले की मैत्री व्हायला वेळ लागत नाही. आपलं मन जिथे मोकळं करता येतं, कोणताही प्रश्न आपसूकच जिथे मांडल्यावर सोडवला जातो, तिथे फुलते मैत्री .

अशी ही मैत्री व्यक्तींशी तर होतेच, पण बऱ्याचदा प्राण्यांशी, झाडा- फुलांशी सुद्धा होते. तीही आपल्याशी एकांतात बोलतात .आपली दुःखं समजून घेतात. दुःख विसरून फुलांसारखं बहरण्यास शिकवतात.

किती किती विषय डोक्यात असतात. ते सगळेच मैत्रीत एकमेकांना सांगितले जातात. कधी वाईट, तर कधी चांगले अनुभव वाटले जातात. जिथे बोलताना आता काय बोलावं, कोणत्या विषयावर बोलावं? हा प्रश्न कधीच उभा राहत नाही, ती असते मैत्री.

एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे प्रश्न सोडवणे, आयुष्याच्या अवघड प्रसंगी साथ सोबत देणं, हीच तर खरी मैत्री.

कधी थोडासा रुसवा ,कधी थोडासा फुगवा, कधी उचंबळून येणारं प्रेम तर कधी खूप वाटणारी आपुलकी या सर्व गोष्टी मैत्रीत सहजपणे घडत असतात. एकमेकांच्या प्रगतीसाठी झटत राहणं, कधीकधी आवर्जून मैत्रीत आवडणाऱ्या गोष्टी करत राहणं हे हमखास होत राहतं.

अशा मैत्रीतून आपलं मनोबल सतत वाढत असते. मन प्रसन्न, मोकळं, स्वच्छंदी आणि धाडसी सुद्धा राहण्यास मदत होते. इतकी जादू असते मैत्रीत.

आपल्या गाडीत पेट्रोल कमी आहे, हे माहित असून सुद्धा मित्राच्या गाडीत अजिबात पेट्रोल नसताना हळूच आपल्या गाडीतलं पेट्रोल मित्राच्या गाडीत टाकायला लावते ती मैत्री. मित्राची आई आजारी आहे म्हंटल्यावर, एखादवेळी स्वतःजवळची वस्तू विकून मदतीला धावते ती खरी मैत्री.

मित्राची आवड-निवड जपून, हमखास त्याची आवडणारी पुस्तकं आवर्जून पाठवून देते ती खरी मैत्री. पैशांची अडचण न सांगताच समजून घेऊन आर्थिक मदत करण्यास मागेपुढे बघत नाही ती मैत्री. आपलं चुकलं, कोणी ओरडलं तरी हमखास आपल्या बाजूने ठामपणे उभी राहते ती मैत्री. पायाच्या जखमेला सुद्धा हळुवारपणे मलमपट्टी करते ती मैत्री. आपल्या सोबत हसणारी ,आपल्या सोबत रडणारी तीच तर खरी मैत्री !

अशी ही मैत्री आपणास लाभणं म्हणजे खरंच पुनवेचा चंद्राशी झालेली आपली युतीच. हाच तर खरा आपल्या आयुष्यात आलेला दुग्धशर्करा योग.

अशीही ही मैत्री चढणीची असावी. आधाराची वाटावी. ती घसरणीची नसावी. निरभ्र आकाशाची पारदर्शक मैत्री, जगण्याला पैलू पाडते आणि जीवन पाचूचे होऊन जाते.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!