भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 'भारत जोडो' पदयात्रा सुरू आहे. डाव्या संघटनांनीही 'नफरत छोडो' अभियान सुरू केलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेही गांधीजयंतीचं निमित्त साधत जातीय सलोखा अभियानाची घोषणा केलीय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भातलं पत्रक जारी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस हरकिरण कौर उर्फ सोनिया धामी यांनी मीडिया भारत न्यूज ला ही माहिती दिली.
२ ऑक्टोबर हा गांधी जयंती दिवस आहे हे आपण सर्व जाणतो. देशासमोर गंभीर परिस्थिती असताना धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी शक्तींचे आव्हान आणि समाजात जातीय संघर्ष भडकवत असताना यावेळी गांधी जयंती येत आहे.

भारत हा एक असा देश आहे जिथे भिन्न धर्म, जाती आणि पंथाचे लोक, भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले, भिन्न भाषा बोलणारे परंतु एकत्रित व सलोख्याने राहणारे लोक आहेत. विविधतेतील ही एकता हीच आपल्या राष्ट्राची ताकद आहे. या एकात्मतेच्या अभावी देशाचे विघटन होईल त्यामुळे देशाची एकता बिघडवण्याचे जातीयवादी शक्तींचे प्रयत्न हाणून पाडावे लागतील. महात्माजींना याच एकोप्यासाठी व सर्व धर्म समभाव प्रयत्नांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती.
लोकांमध्ये सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी, त्यामुळे द्वेषाची संस्कृती पसरवण्याच्या आणि लोकांमध्ये फूट पाडण्याच्या जातीयवादी शक्तींच्या प्रयत्नांविरुद्ध आपल्याला गांधी जयंती उत्सवाच्या निमित्ताने राज्यात जनजागृती करावयाची आहे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली असल्याचं सोनिया धामी यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सामाजिक सौहार्द, देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी आठवडाभर जातीय सलोखा अभियान - २०२२ चा कार्यक्रम देण्यात आलाय.
त्या अंतर्गत चांगले वक्ते बोलावून व्याख्याने आयोजित करावीत, असं अपेक्षित आहे. या अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर, २०२२ पासून करायची आहे तसंच केलेल्या कार्याचा अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवून द्यायचा आहे. असा आदेश जयंत पाटलांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला असल्याचंही धामी यांनी सांगितलं.