काॅलेजमधली लेक्चर्स आणि अन्य कामं यात बुडालेले असताना नीरजाचा एक मेसेज आलेला दिसला. नंतर पाहिला तर गंगाधर पाटील सरांच्या मृत्यूची बातमी. तो फाॅरवर्डेड मेसेज होता त्यांच्या मुलाने सरांबद्दल लिहिलेला.
खूप दिवस अन् काही वर्ष झाली सरांशी बोलून. ते आमचे एम. ए. चे शिक्षक. खरेखुरे हाडाचे शिक्षक. 'समीक्षेची नवी रुपे' लिहून त्यांनी आमच्या पिढीला एक नवी दृष्टी दिली. वर्गातली त्यांची व्याख्यानं आजही आठवतात. इतक्या काळानंतरही.
अनुष्टुभमधल्या 'रेखेची वाहाणी'तले समीक्षालेख तोंडपाठ असण्याची ती वेडी भावतंद्रा आम्हाला नक्कीच एक शहाणिवेची दिशा देती झाली !
रेगे अन् रेग्यांची सावित्री, त्यांच्या कविता आकळून घेण्याचा एक मार्ग असाही असू शकतो हे सरांकडून लख्खपणे समजून घेता आलं. तरी रेगे मला फारसे का भावत नाहीत हेही तेव्हा आकळलं.

चार- पाच वर्षांपूर्वी सरांचा अचानक फोन आलेला. माझी कुठलीशी कविता वाचून त्यावर बोलले होते. त्याचं इंटरप्रिटेशन कसं कसं होऊ शकतं त्यासंबंधी बरंच काही.
मला खरं तर आधी काहीसा संकोच आणि नंतर चक्क बरं वाटू लागलं ते सगळं ऐकताना. नव्हे आनंदच झाला. ज्यांची थोरवी मनोमन मान्य केली आहे असे आपले शिक्षक आपल्याच कवितेविषयी मनापासून भरभरुन काही महत्वाचं सांगताहेत हे राहिलं मनात.
फार चांगले शिक्षक लाभले आम्हाला. हो, लाभले ! जाणीवपूर्वकच असं म्हणतेय. पाटीलसर अत्यंत साधे, अंतर्मुख, फारसे गोष्टीवेल्हाळ नसलेले होते. फर्डे वक्तेबिक्ते नव्हते. पण शिकवायचे फार फार आतून.
काॅ. नजुबाई गावितांच्या 'आदोर'च्या पुस्तक-प्रकाशनाचा कार्यक्रम कपिल पाटील यांनी मुंबईत छबिलदाससमोरच्या हाॅलमध्ये आयोजित केला होता. कार्यक्रमाला ही तुडुंब गर्दी. सगळीच आणि सगळ्यांचीच भाषणं फर्डी झाली. त्यात गंगाधर पाटील सरांचीच काय ती लो की.

मला आठवतंय सर काहीसे आकसले होते. मैदानी वक्तृत्वाची रंगत त्यांच्या मांडणीला नव्हती पण मुद्दे अत्यंत जेन्युईन होते.
सरांनी शिकवलेल्या अभ्यासपत्रिकेच्या नोट्स मी खूप वर्ष जपून ठेवल्या होत्या. प्रत्येक वेळी वाटायचं राहू दे. नको द्यायला रद्दीत. पण एकदा देऊन टाकल्या. एका जेन्युईन विद्यार्थिनीला! आपला फार काही तरी जवळचा भाग काढून दिलाय असं वाटलं होतं तेव्हा.
तिला म्हणालेही.. गंगाधर पाटील सरांचं नाव ऐकलंयस का ? ती ''हो'' म्हणाली.. आनंदून तिला म्हणाले, ''मुली हे ठेव तुझ्याकडे. नंतर याचं काय करायचं ते तूच ठरव.''
ती म्हणाली, "म्हणजे काय मॅडम .. मीही नंतर देणारच ना कुणाला.."
शिक्षक हा असा वाहात असतो. वाहता असतो. सतत. धिम्या गतीने.
पाटीलसर, विनम्र अभिवादन !
- प्रज्ञा दया पवार