पशूपक्ष्यांना लेकराप्रमाणे जपणारा गणराज

पशूपक्ष्यांना लेकराप्रमाणे जपणारा गणराज

पशूपक्ष्यांना लेकराप्रमाणे जपणारा गणराज

सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात माकडाचं एक छोटेसे पिल्लू एका गृहस्थाला घट्ट मिठी मारून बसलं आहे. आणि तो माणूस  त्या पिल्लाला  पोटच्या  मुलाप्रमाणे कुशीत  घेतो आहे. ते पिल्लू  विश्वासानी त्या माणसाच्या कुशीत विसावलं आहे.  त्या पिलाच्या अंगावरून हात  फिरवत तो माणूस भरल्या गळ्याने आणि मनाने म्हणतोय , “जीव अर्धा झाला होता माहितीय का …”  हे वाक्य बोलतानाचा आवाज आणि डोळ्यातलं पाणी खूप काही सांगणार आहे. ही व्यक्ती आहे आमचे स्नेही गणराज जैन.

काही माणसं अक्षरश: वेडी असतात आणि आयुष्यभर हे वेड फार मोठी किंमत देऊन ते जपत असतात. जखमी, अपंग ,अनाथ अशा प्राण्यांची, पक्ष्यांची जीव ओतून सेवा करण्याचं वेड गणराज जैन यांना लागलेलं आहे आणि तितकीच वेडी त्यांची जीवनसाथी अर्चना, नवऱ्याने स्वीकारलेल्या वेडाला आपुलकीने ती साथ देते आहे.  अंदाजे वीस पंचवीस जखमी , अपंग प्राणी- पक्षी आणि पोटचा एक मुलगा यांचा संसार सांभाळण्यासाठी वर्षातला एक दिवसही सुट्टी न घेता ती डॉक्टरकी करते आहे. ग

गणराज जैन  मूळचे महाडचे.  याआधी ते महाडला “पाणवठा”  या  त्यांच्या संस्थेमार्फत  महामार्गावर जखमी झालेली जनावरे,  इतर ठिकाणी जखमी झालेली,  वृद्ध , अपंग अशा प्राणीपक्ष्यांवर उपचार करत, त्यांची  सेवा करत.  तेव्हाही त्यांच्याकडे बरेच जखमी प्राणी -पक्षी उपचार घेत असायचे . यासाठीचा खर्च काही  संवेदनशील व्यक्ती , मित्र यांच्या सहभागातून होत असे.  दोनेक वर्षांपूर्वी बदलापूरला हा उपक्रम गणराज जैन यांनी हलवला.

काही दिवसांपूर्वी ठाणे – बदलापूर इथेसुद्धा प्रचंड पाऊस पडला. त्या पुरात गणराज यांच्याकडच्या  प्राण्यांचे पिंजरे, बांधलेली शेड या सगळ्याचं नुकसान झालं.  हे फेसबुक वरूनही  कळलं होतं आणि त्या छोट्या माकडा बरोबरचा व्हिडिओ सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितला आणि आज न राहवून त्यांना फोनच केला.

गणराज सांगत होतं, ते माकडाचे पिल्लू ही मादी आहे आणि तिला रेस्क्यू केल्यावर तिने गणराजच्या गळ्याला इतकी घट्ट मिठी मारली होती की  त्यांना अक्षरशः श्वास घेता येईना. ते पिल्लू खूप घाबरलं होतं.  गणराज कडे असलेल्या  प्राण्यांपैकी दहा प्राणी वाहून गेले. काही वाहून गेले होते ते कुठे कुठे मिळाले. त्यांचे पिंजरे तर पूर्ण मोडतोड होऊन लांबवर जाऊन पडले होते.

गणराज सांगत होते ,”आम्ही दोघं खूप रडलो त्या रात्री.  मी अर्चनाला म्हणालो की आता बास करूया. हे बंद करूया.  किती वर्ष अडचणींना तोंड द्यायचं? ” त्यावर अर्चना म्हणाली,  आज आता झोपूया. उद्या सकाळी बोलू.  सकाळी उठल्यावर तिने सांगितलं , “आत्ता बाहेर शेडमध्ये जे 23 प्राणी आहेत ना त्यांना जाऊन हे सांग, आणि ते जमलं तर हे सगळं बंद करूया.”

ते अर्थातच शक्य नव्हतं. हे  सांगताना सुद्धा गणराज यांचा आवाज भरून आला होता. अर्चना कुठे आहे विचारल्यावर त्यांनी सांगितलं, ती दवाखान्यात गेली आहे.  गेल्या अडीच वर्षात तिने एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही, कारण तिच्यावरच आमचा हा सगळा आर्थिक डोलारा उभा आहे. आज खरंतर मुलाला खूप ताप आहे, तरीही तिला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ”

गणराजशी बोलताना माझ्या डोळ्यातून अक्षरश: घळाघळा पाणी वाहत होतं. ही कुठल्या मातीची माणसं असतात?  हे कसलं वेड असतं जे माणसांना अशा एखाद्या कामासाठी झोकून द्यायला लावतं? सुखाचं आयुष्य जगावं,  घरदार,  कपडेलत्ते याची चैन करावी असं न करता एखाद्या गरुडाचा  पंख तुटला आहे -त्याला घेऊन ये,  एखादं माकड जखमी झालं आहे – त्याच्यावर उपचार कर,  एखादी म्हैस कुठेतरी अडकली आहे आहे- तिला सोडवून आण-  हे करण्याचं खूळ  या माणसाला का लागलं असावं?  त्यात बरोबरीने साथ देणारी ती अर्चनाही धन्य!  आणि आईबापाचं खुळ डोक्यात घेऊन स्वतःचा वाढदिवस त्या प्राणी पक्ष्यांच्याबरोबर साजरा करणारा त्यांचा लेकही धन्य !

हे दोघेही हे काम इतक्या निस्वार्थीपणे आणि प्रसिद्धी पासून दूर राहून करतात की लोकांना ते माहितीच नाही.

खरंतर त्यांच्या या कामाला आर्थिक मदतीची खूप गरज आहे.  ही पृथ्वी,  हे जग फक्त माणसांचं,  माणसांसाठी नाही – त्यात या सगळ्याच मुक्या पशुपक्ष्यांचाही तेवढाच वाटा आहे, हे मान्य करून त्यांनाही चांगलं आयुष्य मिळावं यासाठी धडपडणाऱ्या गणराज आणि अर्चना जैन या जोडप्याला सलाम आहे!!

 

——–सुजाता पाटील——–अलिबाग

लेखिका कवयित्री असून, त्या एस इ एस हायस्कूल, कुरूळ, अलिबाग येथे मुख्याध्यापिका आहेत.

 

MediaBharatNews

Related Posts
comments
 • Nice Work… It’a Real Humanity Thing !

 • NARSING GANPATRAO INGALE

  August 11, 2019 at 10:53 am

  झाडेबुडे जीव/सोइरे पाषाण…ही संत तुकाराम उक्ती कृतीत आणणारा.. खराखुरा गणराज

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!