१९९२-९३ नंतर तब्बल तीस वर्षांनी आम्ही भेटत होतो. सर्वच मित्रमैत्रिणी आता पन्नाशीत आलो आहोत. कोणाला सुना तर कोणाला जावईसुद्धा आलेले आहेत. एखादी आजीही झालेली आहे. आयुष्यातील सुखदुःखं पचवत, बरीच जीवनकर्तव्यं पार पाडत, जराजरासे विसावण्याचे क्षण वेचत आरशात स्वतःला न्याहाळताना कधीतरी लक्षात येतं की अर्धशतक पार केलेल्या क्रिकेटवीरांचं कौतुक व्हावं, तसं कौतुक म्हणून देवानं खुश होऊन चंदेरी केसांची महिरप आपल्या चेहऱ्याला बहाल केलेली आहे. स्नेहमेळाव्याच्या बहाण्याने सगळे हेअरडाय या जादूई छडीचा उपयोग करून पंचविशीत दिसण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झालेले वर्गमित्रही भेटले.
मोठा काळ लोटला तरी काही घटना, काही आठवणी एखाद्या चित्रपटासारख्या एका मागोमाग एक आपल्याला आठवत राहतात. आमच्या अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या बीएससीच्या बॅचच्या १६ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या गेट- टुगेदरची ही कथा.

गेट-टुगेदरमध्ये मागच्या वयात जाता येतं. त्या वयातील मैत्री निस्वार्थी, ना द्वेष ना मत्सर ! हेव्यादाव्यांना तर स्थानच नाही. शिक्षण पूर्ण करावं, कोणीतरी मोठं व्हावं, एवढंच ध्येय. काय व्हायचं हेच कोणाचंच नक्की नसतं. कोणी काहीही बनलेलं असलं तरी स्नेहमेळाव्यात संयोजक, आयोजक, सूत्रसंचालक सगळं काही आमचे आम्हीच होतो.
पुणे, ठाणे, मुंबई, दापोली, भुसावळ अशा बऱ्याच लांबच्या ठिकाणांहून सर्वजण आवर्जून आलेले होते. आपुलकीची व एकीची ही भावना मनात छान आनंदाचा हुंकार देऊन गेली. सर्व एकसमान होतो. लहानमोठं, गरीबश्रीमंत असलं काही नव्हतं. पन्नाशीच्या त्या सगळ्यांमध्ये संचारली होती अवखळ पण तितकीच प्रगल्भ मुलं /मुली !!!

आमच्या काही सवंगड्यांनी आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरच जगाचा निरोप घेतला होता. काल-परवापर्यंत आपल्याशी बोलणारी मैत्रीण /मित्र आज आपल्यात नाहीत, या जाणीवेने मन हेलावून गेलं.
थोडंसंच बोलेन असं ठरवून प्रत्येक जण माईक हातात घेऊन उभं राहत होते ,पण समोर जमलेल्या मित्र-मैत्रिणींच्या नजरेतील उत्सुकता, त्यांच्या खिळलेल्या नजरा पाहून मनात ठरवलेलं सगळं ऐनवेळी विसरून जात होते.

आपसूक मनात दडलेला हळवा कप्पा अलगद उलगडून सांगू लागले होते. कोणी मोठ्या आजाराचा पराभव केलेला होता, तर कोणी अनेक शारीरिक ,आर्थिक संकटांचा मुकाबला ! आपल्या मित्र परिवाराला मनातलं सांगताना सगळे बांध मोकळे झालेले होते. कधी बोलताना कंठ दाटून येत होता तर कधी ऐकणाऱ्यांचेही डोळे पाणावत होते.

आयुष्याचे चार टप्पे आहेत. ८० पर्यंतच जेमतेम निरोगी आयुष्य असते. १०० पर्यंत क्वचितच जातात आता माणसं. तर हा आपला आयुष्याचा तिसरा टप्पा आहे. हे एका मित्राचे शब्द बराच वेळ मनात घर करून राहिले. क्षणभर काळजात कालवाकालव झाली. आपलाही तिसरा टप्पा म्हणजे आयुष्याचा संधिकाल सुरू झाला आहे, क्षणातच हे सावट दूर सारून मी मनाला बजावलं, "आयुष्य भरभरून आनंदाने जगायचं. चांगली माणसं जोडत राहून ,ओंजळ भरून आनंद देत व घेत राहायचं."

आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मोठा गोल करून आम्ही बसलो. "पासिंग द बॉल" गेम खेळू लागलो. म्युझिकच्या तालावर बाॅलऐवजी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन खेळत राहिलो. ज्याच्यावर राज्य येईल त्याने स्वतःच्या आवडीची काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची होती. कोणी डान्स केला, कोणी अभंग आणि गाणे म्हटले. मी कविता वाचन केलं.

कॉलेजमधील खोड्या, आठवणी सांगतानाही मित्रांचा आनंद ओसंडून वाहत होता. सर्व आठवणी ऐकून हास्याचे कारंजे उडत होते. त्यात सर्वजण चिंब भिजून गेलो होतो. म्युझिकवरील सर्वांचा एकत्र झिंगाट डान्स व फेर धरून गरबा खेळताना फोटोग्राफरने नेमके हसरे व अचूक भाव टिपले होते. आम्ही परतलो ते मोठ्या आनंदाने भरलेला "आठवणींचा खजिना" घेऊनच !!
लीना तांबे
लेखिका शिक्षक आहेत.
leena.adhalrao.tambe@gmail.com