म्युकर मायकोसीस चं नाव कधी ऐकलं होतं का?

म्युकर मायकोसीस चं नाव कधी ऐकलं होतं का?

म्युकर मायकोसीस चं नाव कधी ऐकलं होतं का?

जगात अनेक प्रकारचे सजीव आहेत. अतिसूक्ष्म व्हायरसपासून ते प्रचंड मोठ्या प्राण्यांपर्यंत अनेक सजीव इथे जगत असतात. व्हायरस हे फक्त सजीव पेशींतच पुनरुत्पादन करू शकतात. मात्र ते काही प्राण्यांमध्ये नुसते जिवंत राहू शकतात.

उदा कोरोना व्हायरस वटवाघूळ आणि मुंगूस ह्या प्राण्यात नुसता जिवंत राहतो, पण त्यांच्यात रोग निर्माण करत नाही. अपघाताने तो माणसात शिरतो आणि मग रोग निर्माण करतो आणि एकाकडून दुसऱ्याकडे जातो.

बाकीच्या सजीवांमध्ये बॅक्टेरिया, अमिबा सारखे एकपेशीय जीव आणि फंगस किंवा बुरशी हे येतात. हे सजीव इन ऍनिमेट किंवा निर्जीव पदार्थांवरही वाढू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्यातरी दुसऱ्या सजीवाच्या शरीरात जाण्याची सक्ती नसते.

काही बॅक्टेरिया आपल्या आतड्यांमध्ये, आपल्या स्किन वर असतात. पण ते रोग निर्माण करत नाहीत. उलट ते व्हिटॅमिन B तयार करतात, इतर रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना मारतात. त्यांना चांगले बॅक्टेरिया असेही म्हणतात.

बुरशीला पूर्वी वनस्पती मानायचे. मात्र आता त्यांना एक वेगळाच सजीवांचा वर्ग मानले जाते. बुरशी ही dead अँड decaying पदार्थांवर वाढते. म्हणजेच मृत आणि विघटन होणाऱ्या पदार्थांवर. म्युकर ही बुरशी आपण सर्वांनी बघितलेली आहे. पावावर किंवा एखादा पदार्थ फ्रिजच्या बाहेर राहिल्यास येणारी ही बुरशी आहे. तिचे लांब लांब धागे असतात आणि त्यावर स्पोअर येतात.

परागकणाप्रमाणे हे स्पोअर हवेतून उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. ते डोळ्यांना दिसत नाहीत. इतकी वर्षे आपण ते श्वासातून शरीरात घेत आहोत.

पण कधी म्युकर मायकोसिस हे नाव तरी ऐकले होते का? नाही ! कारण त्यांना जगण्यासारखी परिस्थिती आपले शरीर तयार होऊच देत नाही.

आत्तापर्यंत कोणाला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अनुभव असेल की स्किनवर चट्टे येतात किंवा बोटांच्या बेचकीत इन्फेक्शन होते. खूप खाज सुटते. क्रिम लावून बरे होते. ह्याचे कारण ती बुरशी स्किन च्या वरील आवरणात असलेल्या किरॅटीन ह्या प्रोटीन मध्ये वाढते. ती स्किन भेदून आत जाऊ शकत नाही. हे सुद्धा जेव्हा माणसाला खूप स्ट्रेस असतो तेव्हा होते.

कोरोना व्हायरसमुळे रक्तातील साखर वाढते, आधीच डायबेटिस असेल तर ती जास्त वाढते. स्टिरॉइड्समुळे शुगर वाढते.

डायबेटिसचे निदान पहिल्यांदा होते, तेव्हा बरेचदा ते बऱ्या न होणाऱ्या जखमेमुळे होते. ह्याचे कारण रक्तात साखर जास्त असल्याने त्यावर बॅक्टेरिया खूप जोमाने वाढतात. त्यामुळे कुठल्याही ऑपरेशनच्या आधी शुगर टेस्ट करावी लागते.

तसेच डायबेटिसमुळे इम्युनिटी कमी होते म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच स्टिरॉइड्स हे औषध inflammation कमी करते, पण ती शरीराची रोगजंतू नष्ट करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजेच साखर वाढणे आणि रोगजंतूंचा नाश न होणे ह्या दोन्ही कारणाने रोगजंतू जोरात वाढतात.

कोविडमध्ये हे सगळे एकत्र जुळून येत आहे. त्यामुळे म्युकरचे स्पोअर नाकावाटे सायनस मध्ये आणि तिथून ब्रेनमध्ये जात आहेत. रक्तातील साखरेवर त्यांची वाढ जोमाने होऊन धागे तयार होतात आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये वाढतात. त्यामुळे रक्तपुरवठा बंद होतो आणि तो भाग मृत होतो व काळा दिसतो. म्हणून तिला ब्लॅक फंगस म्हणतात. एकदा रक्तात शिरल्यावर ती बुरशी कुठल्याही अवयवात जाऊ शकते.

तेव्हा ज्यांना डायबेटिस आहे त्यांनी आपली शुगर लेव्हल नॉर्मल ठेवावी. कोविड होऊच देऊ नये. स्वतःच्या मनाने स्टिरॉईड घेऊ नयेत. कारण Always prevention is better than cure.

 

 

 

डॉ. मंजिरी मणेरीकर

नामवंत पॅथॉलॉजिस्ट | नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे पॅथॉलॉजिस्ट व टीएन मेडिकल कॉलेज व नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून कामाचा अनुभव.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!