‘तो’ आता ‘आई’ होणार आहे…!

‘तो’ आता ‘आई’ होणार आहे…!

‘तो’ आता ‘आई’ होणार आहे…!

पूर्वी नव्हतं ना असं काही ऐकलं? भविष्यात असं काही घडू शकतं यावर नव्हता ना विश्वास? ती आधी स्त्री होती, पण मनाने मात्र पुरुष होती...म्हणजे स्त्री चं शरीर घेऊन पुरुषी भावनांसह ती जगत होती. तिला असा जोडीदार मिळाला...की जो आधी पुरुष होता पण मनाने मात्र स्त्री भावनेचा. आता तो स्त्री म्हणून जीवन जगत आहे म्हणजे ट्रान्स वुमन.


हा स्त्रीचा पुरुष झाला तरी गर्भाशय असल्याने आता आई होणार आहे ;म्हणजे जो बाप दिसतो आहे तो आता आई होणार आहे आणि जी आई दिसते आहे तिचा या बाळंतपणात कसलाही थेट संबंध नाही. कसं वाटतं ना ऐकल्यावर, वाचल्यावर! विश्वास ठेवावा की ठेवू नये असं वाटतं ना? की समाज कुठे भरकटत  चाललाय असं वाटतं? की भारतीय संस्कृती आता नष्ट होणार अशी भीती वाटते?

विनायक सावळे

 

तर साथी हो, ऐका.  यातलं काहीही घडणार नाहीये. हे स्वीकारल्यानंतर मात्र माणूस म्हणून आपण स्वतःच उन्नत होणार आहोत आणि जेव्हा समाज हे आनंदाने स्वीकारेल तेव्हा समाजाने, स्वातंत्र्य आणि समतेची सर्वोच्च उंची गाठलेली असेल. त्या दिशेने आपण सार्‍यांनीच जायला हवे. जर आपण त्या दिशेने गेलो नाहीत, तर आपल्यातल्याच अनेकांना आपण एक तर गमावून बसू, नाहीतर त्यांच्या बंडाला सामोरे जावे लागण्याची तयारी ठेवावी लागेल.

काय आहे हे सगळं. तर सोपं करून सांगतो. आपल्यापैकी काही जणांमध्ये निसर्गतः त्या शरीराने स्त्री जरी असल्या तरी त्यांच्या मनात पुरुषी भावना असू शकतात, म्हणजेच त्या मनाने पुरुष असू शकतात. किंवा, काही जण शरीराने पुरुष असतील पण मनाने ते स्त्री असतात. पण आज मात्र समाजात याबद्दल प्रचंड अज्ञान असल्याने, अशा व्यक्तिमत्त्वांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. प्रसंगी भयानक छळाला देखील सामोरे जावे लागते.

कुटुंबात याला बदनामीचा विषय मानला जातो. आणि समाजाचा टिंगल  करण्याचा विषय होतो.

पण मेंदूतील नव्या संशोधनातून ही गोष्ट अत्यंत नैसर्गिक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा समूह देखील आता जागृत झालेला आहे. एलजीबीटीक्यू प्लस नावाने त्यांची आता ओळख आहे. पुरुषाला पुरुषाचे आकर्षण वाटणे, स्त्रीला स्त्रीचे आकर्षण वाटणे, शरीराने पुरुष आहे पण मनाने स्त्री आहे म्हणून पुरुषाचे आकर्षण वाटणे, शरीराने स्त्री पण मनाने पुरुष म्हणून स्त्रीचे आकर्षण वाटणे, एकाच वेळी दोघांचेही आकर्षण वाटणे, किंवा कोणाचेही आकर्षण न वाटणे आणि पुढे अजून बरेच काही.... हे सारे प्रकार नैसर्गिक आहेत. यात विकृती अशी काहीही नाही.

फक्त हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीची कवाडे उघडी ठेवावी लागतील.

हे सारं आपण शांतपणे समजून घ्यायला हवे. थोडा अभ्यास केला तर भारतीय संस्कृतीत देखील हे स्वीकारण्यात आलेलं आहे हे आपल्याला समजेल.आता जगभर हा नवा विचार रुजू लागलेला आहे.

या विविध प्रकारच्या गरजा आणि भावना असलेल्या खरं तर विविध प्रकारच्या लैंगिकता असलेल्या सगळ्यांनाच सन्मानपूर्वक जगता येईल, असा समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. अशी व्यक्तिमत्वे आपल्या कुटुंबात, शेजारी, गल्लीत, गावात, शहरात, नात्यात कुठेही असतील. त्यांना आपला धाक वाटता कामा नये. आपला आधार वाटावा. त्यांना लपवालपवीची भीती नको.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात एकूण ४ लाख ८८ हजार ट्रान्सजेंडर आहेत. पण ज्यांनी अजूनही ओळख खुली केलेली नाही अशी संख्या प्रचंड असण्याची शक्यताच अधिक आहे. काही सर्वेनुसार ही संख्या लोकसंख्येच्या ०.३ ते ०.१५ % पर्यंत असू शकते. म्हणजे सरासरी ०.१० टक्के जरी आपण गृहीत धरले... तर भारतात ही संख्या ३९ लाख इतकी असू शकते.

 

त्यांनाही मोकळा श्वास घेता यावा. आपल्या प्रश्नांवर, गरजांवर खुलेपणाने बोलता यावे.असा समाज निर्माण करूया.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः ।
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥

सर्वच सुखी व्हावेत, सर्वच रोगमुक्त व्हावेत, सर्वे मंगलमय व्हावेत, कोणीही दुःखी असू नये.

हे आपणच म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलंय. आपल्यात जसे स्त्री - पुरुष असणार, तसेच ट्रान्सजेंडर असणार, त्यात ट्रान्स वुमन आणि ट्रान्स मेन असणार. त्यांच्या भावना, त्यांच्या गरजा या वेगळ्या असणार. तरीही ते आपल्यासारखेच आहेत आणि आपल्या सारखेच असणार. आपलेच आहेत आणि आपल्यापैकीच असणार.

या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्या समाजाला आपण सारेच मदत करु या. समृद्ध समाजाच्या दिशेने दमदार पाऊल टाकूया.

जिया आणि जाहाद तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.

 

 

 

 

विनायक सावळे

vinayak.savale123@gmail.com
9403259226

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!