मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सुशांतसिंग प्रकरणाचा मिडियाने पार कचरा करून टाकलाय. न्याय देण्याच्या नावाखाली स्वत:चा सुपारी अजेंडा राबवून टीआरपी खेचण्याचं काम मिडियाने पद्धतशीरपणे केलं. प्रकरणाची माहिती देण्याऐवजी दिशाभूलच जास्त केली गेली. पण अशा प्रकरणात नेमका तपास कसा केला जातो, एखादा मृत्यू हा आत्महत्या की हत्या, हे कसं ठरवलं जातं, त्याचे काही वैज्ञानिक निकष आहेत. त्याबद्दल सांगताहेत, डॉ. मंजिरी मणेरीकर !
सुशांतसिंगची आत्महत्या की खून ही चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच लिहायचे मनात होते पण लिहिले नाही. मात्र काल ही आत्महत्या च होती असा निष्कर्ष निघाल्याचे वाचले. फॉरेन्सिक फाईल्स बघून मला माझ्या फॉरेन्सिक क्षेत्रातल्या आठवणीही ताज्या झाल्या त्यामुळे शेवटी लिहायचे ठरवले.
सर्वप्रथम एखादी व्यक्ती मरण पावते, तेव्हा नातेवाईक फॅमिली डॉक्टरला बोलावतात. डॉक्टर तिला मृत घोषित करतात व डेथ सर्टिफिकेट देतात. ह्यात पोलिस केस होत नाही. पण डॉक्टरला मृत्यू अनैसर्गिक असल्याची शंका आल्यास डेथ सर्टिफिकेट न देता पोलीस केस होते. जर प्रेत गळफास लावलेल्या स्थितीत असेल तर त्याला हँगिंग असे म्हणतात. ह्या केस मध्ये पोस्ट मॉर्टेम आवश्यक असते.
पोस्ट मॉर्टेम चे उद्देश पुढीलप्रमाणे
१. मृत्यू गळफासानेच झाला आहे की नाही ते ठरवणे. २. आत्महत्या, खून की अपघात ते ठरवणे.
हँगिंग हे violent asphyxial death ह्या प्रकारात मोडते. साधारणपणे आत्महत्या करणारेच गळफास लावून घेतात कारण एक धडधाकट माणूस दुसऱ्या धडधाकट माणसाला फासावर चढवू शकत नाही.
काही वेळा अनेक जण मिळून एखाद्याला फासावर लटकवतात. त्याला लिंचिंग म्हणतात. Ashyxia म्हणजे गुदमरून मृत्यू. हँगिंग नेच माणूस मृत्यू पावला असेल तर त्याचा चेहरा काळानिळा होतो, डोळे खोबणीच्या बाहेर येतात, जीभ बाहेर येते, तीही काळीनिळी असते. मृत्यूनंतर प्रेत त्याच स्थितीत राहिल्यास सगळे रक्त पायात जमा होते व ती त्वचा लालकाळी होते.
गळफासाची जखम (ligature मार्क) फास लावून घेतला असल्यास ही जखम V आकाराची असते. डोके पुढे झुकल्यामुळे मागच्या बाजूला जखम नसते. ह्याउलट दुसऱ्या व्यक्तीने कापड किंवा दोरीने गळा आवळला असल्यास मानेवरची जखम पूर्ण असते. जखमेचे डिसेक्शन केल्यास आतमध्ये रक्तवाहिन्या, स्नायू ह्यांच्यात रक्तस्त्राव आणि जखमा असतात.
हँगिंग मध्ये कारटीलेज किंवा हाड फ्रॅक्चर होत नाही मात्र दुसऱ्याने गळा आवळल्यास स्वरयंत्राला फ्रॅक्चर असू शकते. कधीकधी प्रेताजवळ त्या व्यक्तीची चिठ्ठी मिळते. तीही खरच त्याने लिहिली आहे की नाही किंवा त्याची मनस्थिती त्यावेळी आत्महत्या करण्याची होती की नाही हे सुद्धा ठरवता येते.
ह्यात asphyxia म्हणजे गुदमरण्याची लक्षणे दिसत नाहीत. मानेवरची जखम फक्त त्वचेपुरती असते. ज्या कारणाने मृत्यू आला ते कारण सापडते. क्वचित एखाद्याला बेशुद्ध करून फासावर चढवलेले असू शकते. ह्यासाठी viscera म्हणजे जठर, आतडे यांचे तुकडे, लिव्हर, स्प्लिन, ब्रेन इ अवयवांचे तुकडे आणि रक्त विष दिले आहे का ह्याची तपासणी करण्यासाठी पाठवावे लागतात.
जिथे प्रेत सापडते त्याला सीन ऑफ क्राईम म्हणतात. जर खून असेल तर दुसरी व्यक्ती तिथे हजर असली पाहिजे. अश्या वेळी दोन्हीमध्ये मटेरियल ट्रान्सफर होते. ह्याला लोकार्ड्स प्रिन्सिपल असे म्हणतात. म्हणजे खून करणाऱ्या व्यक्तीचे बोटांचे, पायाचे ठसे, केस, कपड्याचे धागे अश्या अनेक गोष्टी सापडू शकतात. आजकाल cctv कॅमेरे असतात. त्यात बघूनही ठरवता येते. मुख्य म्हणजे ह्या सर्व शंका पोलिसांनी घ्यायच्या असतात.
बातमी फक्त एवढीच द्यायची असते की अमुक व्यक्ती तिच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडली. पोलीस अधिक तपास करत आहेत. खुनाची शंका असली तरी ती व्यक्त करत नाहीत कारण खुनी सावध होतो.
सुशांतच्या किंवा सगळ्याच केसेसमध्ये आपण बातमी वाचतो की ह्या ह्या व्यक्तीची आत्महत्या ! जेव्हा कदाचित पोस्टमॉर्टेम सुद्धा झालेले नसते. मग त्यावर मोठमोठे लेख येतात. त्याचे अंत्यसंस्कार होतात. मग कोणीतरी शंका काढतो आणि मीडिया ह्याच मुद्द्यावर अडून बसतो. शेवटी ती आत्महत्याच निघते. हे शिक्षितपणाचे लक्षण आहे असे मला वाटते.
डाॅ. मंजिरी मणेरीकर नामवंत पॅथाॅलाॅजिस्ट असून, त्यांनी नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे पॅथाॅलाॅजिस्ट व टीएन मेडिकल कॉलेज व नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे.