हुमान – नियतीचं कोडं

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरून एवढ्या मोठ्या पदावर काम करणं सोपं नसतं. "हुमान" नियतीने घातलेलं अत्यंत अवघड कोडं सोडवलं ते संगीता मॅडमने. "संगीता उत्तम धायगुडे" उपायुक्त, महानगरपालिका, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे आत्मचरित्र असलेलं हुमान.

हुमान वाचलं आणि खरंच उद्धस्थतेचं शिखरंच जणू पार केलं. मी फक्त वाचलं आणि दशा झाली. ज्यांनी सोसलं, साहिलं अन् सोबत वाहिलं त्याचं काय झालं असेल? एका स्त्रीची ताकद समस्त स्त्रीयांना उभारी देणारी ठरली. हे हुमान आहेच असं.

बापरे ! केवढा तो आत्मविश्वास. तोही इतक्या संकटांमध्ये. संकटांवर संकटं झेलत तिनं स्वतःला तावूनसुलाखून घेऊन यश प्राप्त केलं. नातलगांचा जरासुद्धा आधार नसताना, दहावीपर्यंतचे शिक्षण खेडेगावात घेतलेली एक मुलगी इतका स्ट्रगल करू शकते, यावर विश्वास बसत नाही.

तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर कधीच कोलमडून पडलं असतं. पण ती खचली नाही. खंबीरपणे उभी राहिली. आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटत राहिली. प्रेमळ पतीची साथ अर्ध्यावर सुटल्याने संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला पण..... कहाणी अधुरी राहिली नाही. तिनं पतीचं स्वप्न पुरं केलं एकटीनं. पुन्हा स्वतःला आणि मुलांना सावरलं. ती पदरात तोंड खुपसून बसली नाही. तिनं कंबर कसली. पदर खोचला. ती शिकली.

एकटी पडली तेव्हा जवळच्या लोकांनीच आणखीन एकटी पाडली. साथ देण्यास, मदत करण्यास नकार दिला. तिचा तो एक - एक दिवस किती दुःखात गेला असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण त्यातूनही ती आपल्या शिक्षणाच्या आणि आपल्या परिपक्व प्रतिभेच्या जोरावर सहीसलामत सुटली.

"खरंच जगणे सुंदर आहे" पण अशा कठीण प्रसंगात तग धरून राहाणं हे केवळ अवघड आहे. कितीतरी खेळ दाखवले असतील नियतीने. पण ती डगमगली नाही. उलट हयात नसलेल्या पतीच्या प्रेमाची साथ तिला संकटावर भक्कम पाय रोवून उभं राहण्यास मदतच करीत होती.

त्याच्या प्रेमळ आठवणी तिनं जप जप जपल्या. क्षणभरही विसरली नाही. त्या आठवणीच जर तिच्याकडे नसत्या तर कदाचित तिचं जगणंच भस्मसात झालं असतं. ज्ञानग्रहण करण्याची आवड तिच्याकडे होतीच. त्यामुळेच ती पुढे जाऊ शकली. वेळीच अचूक निर्णय घेण्याची क्षमता तिला प्रगतीपथावर घेऊन गेली.

अहोरात्र तिचं अभ्यास करणं, एकाच ध्येयानं पछाडून त्यावर काम करणं ही तिची खासियत होती. त्याच तपश्चर्येचं फळ तिला मिळालं आणि ती आज या पदापर्यंतचा प्रवास करू शकली. आपल्या मुलांच्या भविष्याला आकार देऊ शकली. घर सावरू शकली.

एकेकाळी साथ न देणारा समाज, आज तिला मान देऊ लागला. ती ताठ मानेने समाजात वावरू लागली. तिचं आत्मचरित्र म्हणजेच जणू हुमान ! अनेकांना प्रेरणा देणारे पुस्तक नव्हे हा तर अनुभव ग्रंथच.

तिने सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही. यशाचे शिखर गाठण्यासाठी कधीच कोणत्याही वाममार्गाचा स्वीकार केला नाही. तेच संस्कार तिच्या मुलांवरही दिसून येतात. अशा अनेक दुःखाने पिचलेल्या संगीता आपल्या देशात असतील. पण संगीता धायगुडे मात्र संकटाला संधी मानून स्वतःच्या आयुष्याचं आयुध करुन लढल्या.

प्रत्येकाने संगीता धायगुडे यांचे हुमान पुस्तक वाचावं मग कळेल आपल्या वेदना तर यापुढे फारच तकलादु आहेत. आपल्या आयुष्याचं कोडं म्हणजेच हुमान सोडवायचं असेल तर हे हुमान जरुर जरुर वाचावं. प्रेरणा घ्यावी आणि मग स्वतःच्याच आयुष्याला एक कडक सॅल्युट ठोकावाच.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!