आयुष्यात टर्निंग पॉईंट आलाच नाही तर…?

आयुष्यात टर्निंग पॉईंट आलाच नाही तर…?

आयुष्यात टर्निंग पॉईंट आलाच नाही तर…?

आयुष्यातल्या सार्‍याच गोष्टी संपून जातील, या एकाच भीतीने माणूस बदलत जातो, तोच असतो आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. खूप काही गमावण्याच्या भीतीने माणूस उत्तमोत्तम जगण्याचा प्रयत्न करू लागतो. काय काय राहून गेलयं, या विचारांचं थैमान माणसाच्या डोक्यात घुमू लागतं. कोणता क्षण शेवटचा ठरेल, हे कधीच कोणाला सांगता येत नाही. प्रत्येक क्षण शेवटचा आहे, असं समजून त्या क्षणाचा आनंदोत्सव साजरा करावा.

खूप छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो. अगदी हिरवळीवर अनवाणी चालून मऊ गवताचा स्पर्श अनुभवणं, मंद वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन त्या होणाऱ्या गुदगुल्या अनुभवणं, स्वतःच्या आवडीच्या वस्तू खरेदी करणं, निसर्गाचा मनमुराद आनंद घेणं, आपल्याने होईल तेवढी इतरांना मदत करणं, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं, थोडं इतरांनाही समजून घेणं. या सार्‍या गोष्टी बऱ्याचदा दिसतात छोट्या ; पण खूप मोठा आनंद देऊन जातात.

प्रत्येक क्षणाचा आदर करायला शिकलं पाहिजे. मिळणारा प्रत्येक क्षण म्हणजे आपल्यासाठी बोनसच असतो. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक राहिलं म्हणजे त्याचा सकारात्मक दृष्टीकोनच आपल्याला आनंदी ठेवायला मदत करतो. प्रत्येक आनंदी क्षण आपलं जगणं सुसह्य करतो. इतरांनासुद्धा छान जगण्याची प्रेरणा देतो. आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना विचारा, जगणं म्हणजे काय?

आता या कोरोनाच्या काळात ज्यांनी स्वतःचे जीव गमावले, ज्यांना अचानकच या दुनियेतून एक्झिट घ्यावी लागली. ध्यानीमनी नसताना किंवा मृत्यूची थोडीही चाहूल नसताना हे जग सोडून जावं लागलं, त्यांच्या घरच्यांवर तर आभाळच कोसळलं. सारं काही एका क्षणात संपून गेलं आणि जगायचं राहूनच गेलं. खरं तर, आपण क्षणांचे गुलाम आहोत.

जेव्हा घरातली एखादी कर्ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जीवनमृत्यूशी झुंज देत असते. तेव्हा त्या सार्‍या राहून गेलेल्या गोष्टी घरच्यांना आणि त्या व्यक्तीलासुद्धा आठवत राहतात; म्हणून यातूनच आपण आपली जीवनशैली नियमित आनंदी ठेवावी हे शिकलं पाहिजे.

बऱ्याचदा काही गोष्टींची लाज वाटते म्हणून किंवा समाज काय म्हणेल या भीतीनेच आवडणाऱ्या गोष्टी टाळल्या जातात. त्याच त्याच रुढी परंपरांमध्ये आपण गुंतून जातो. सतत नको त्यांच्याही दबावाखाली जगत राहतो. आपण आपल्या आनंदात कोणाला लुडबूड करु द्यायचीच नसते.

आनंदाचा काही साचा नसतो. मिळवायचा म्हटला की कशातही मिळतो. अगदी ढाराढुर झोपण्यात सुद्धा आणि भसाड्या आवाजात गायलेल्या गाण्यांत सुद्धा !

खरंतर आनंदाने जगण्यासाठी पैसाच लागतो, असंही मुळीच नाही. आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ओळखावा आणि नवीन म्हणजेच आवडणाऱ्या गोष्टींसोबत जीवन जगायला सुरुवात करावी .

हे टर्निंग पॉइंट म्हणजे एखाद्याचे आजारातून बरे होणे, खूप मोठ्या संकटातून सहीसलामत सुटणे, अनंत यातना होत असतानाही योग्य मार्ग मिळणे. खूप कष्टानंतर सुखाची चाहूल लागणे असे काहीही असू शकते.

टर्निंग पॉईंटची वाट बघण्यापेक्षा वेळीच जगून घ्यायलाच का शिकू नये? काय सांगावं ? हे टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात येतीलच असं. "पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त" असं म्हणत पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतली पाहिजे .

आयुष्य खूप छोटंसं आहे. त्यात फार थोडेच क्षण आनंदाचे मिळतात; म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आदर करून आनंदोत्सव साजरा करणं गरजेचं आहे. जीवनरहाटी चालूच राहणार !

आपण असलो तरी आणि नसलो तरीसुद्धा. म्हणूनच जीवनाचा हा सुखाचा प्याला आनंदाने ओठाला लावावा. जगण्याची मजा घेत घेत तो संपवावा. तेच इतरांचं आदर्श व्हावं, आपल्याही जीवनाचं सार्थक व्हावं...आणि म्हणावं.... मीच आहे माझ्या आनंदाचा शिल्पकार !

 

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

comments
 • शीला गवांदे

  October 13, 2021 at 7:52 am

  खरंच प्रत्येक क्षणात आनंद शोधायचा आणि आनंदी राहायचे. खूप छान लिहिले आहे तुम्ही.👌👌

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!