मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
राजकीय पक्ष किंवा नेत्यांना जवळ घेऊन संपवण्याच्या भाजपाई षडयंत्राचे नवे बळी ठरले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू ! विशेष म्हणजे खुद्द बच्चू कडूंना ही जाणीव झालीय व ती त्यांनी जाहिरपणे बोलूनही दाखवली. शिंदे गटातून आमदार फुटणार असल्याची ‘सामना’ दैनिकाने केलेली बातमी आणि आजची बच्चू कडूंची पत्रकार परिषद याची सांगड घालायला आता राजकीय जाणकारांनी सुरूवात केलीय. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या राजकारणाची दुसरी इनिंग सुरू झाल्याची ही चाहुल असल्याचं बोललं जातंय.
रवी राणा हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे जवळचे आहोत असं सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोपांमागे कुणाची फूस तर नाही ना अशी शंका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त करत भाजपाकडेच बोट केलं आहे. आपला गेम तर होऊन नाही राहिला, असा सवाल करीत, महाविकास आघाडीचं सरकार पाडून गुवाहाटीला गेलेल्या ५० आमदारांना खरंच ‘खोके’ दिले का, हे आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावं, असं म्हणत बच्चू कडू यांनी रवी राणांनी केलेल्या आरोपांचा चेंडू भाजपाच्या कोर्टात टोलावला आहे.
महाविकास आघाडीतून ज्यांना बाहेर पडायचं नव्हतं पण दबावाने गुवाहाटीला बोलावून घेण्यात आलं, अशा आमदारांत बच्चू कडूसुद्धा आहेत. आम्ही काही तुमच्याकडे स्वतःहून आलो नव्हतो, हे बच्चू कडुंचं वक्तव्य सूचक आहे. भाजपाने सरकारात सहभागी तर करून घेतले नाहीच, उलट रवी राणासारख्या आमदाराला पुढे करून आरोप केले जाताहेत, यावरून बच्चू कडू कमालीचे नाराज आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मनातली खदखद आज बाहेर काढली.
शिंदे-भाजपा सरकारात सगळं आलबेल नसल्याचा तसंच ५० खोके एकदम ओके नसल्याचाही प्रत्यय महाराष्ट्राला आला. बच्चू कडुंनी भाजपाला १ नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आपण पुढचं पाऊल टाकू असं त्यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातच समावेशाची शक्यता न दिसल्यापासून बच्चू कडू नाराज आहेत. सुरूवातीला कार्यकर्त्यांना त्यांनी संयमाचा सल्ला दिला होता; परंतु, दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ‘आपण सरकारात आहोत असं गृहित धरून कुठलंही पाऊल टाकू नका’ असं स्पष्ट सांगितलं होतं.
समाजमाध्यमात प्रहार कडून काही व्यक्त होऊ नका, पण वैयक्तिक पातळीवर अगदी बाजू घ्यायची वेळ आलीच तर उद्धव ठाकरेंची घ्या, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सूचित केलं होतं. रवी राणाकडून झालेल्या थेट आरोपानंतर भाजपाला शिंगावर घ्यायच्या पवित्र्यात बच्चू कडू आले आहेत. त्यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता नसल्याचेच संकेत आहेत.
विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे ठाकरे गटाकडून ५० आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होणं आम्ही समजू शकतो. त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून दलाली आणि स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप सहन होणारे नाहीत, या शब्दांत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
रवी राणा यांच्या आरोपांमुळे सर्व ५० आमदार नाराज असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडुंनी केलाय. या आरोपांमुळे पाच हजारांची देणगीही जनतेतून मिळणं मुश्कील झाल्याचं बच्चू कडू म्हणाले.
राणा यांचे आरोप खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिंतोडे उडवणारे असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माध्यमांसमोर या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची आणि स्टंटबाज दलाल रवी राणा यांना समज देण्याची वेळ आली आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी मनातील संतापाला वाट मोकळी करून दिलीय.