जावेद अहमद घामिदी यांना इस्लामिक विद्वान म्हणून पुरोगामी विचारांचे मानले जाते. त्यांचे विचार इस्लामच्या पारंपरिक व्याख्यांपासून वेगळे आणि आधुनिक संदर्भात प्रगतीशील आहेत. भारतातील द्वेषभक्त सध्या जावेद अहमद घामिदी यांच्या मुलाखतीचा एक विडिओ पसरवताहेत आणि त्या आडून दहशतवाद ही इस्लामचीच कशी शिकवण आहे, हे हिंदुंवर बिंबवण्याचा खटाटोप करताहेत. प्रत्यक्षात जावेद अहमद यांचं म्हणणं असं आहे की दहशतवादी किंवा कोणीही इस्लामिक कडवट विचारांची व्यक्ती आपल्या हिंसक कृत्यांसाठी जो कुराणाचा दाखला देतात, ती दिशाभूल आहे.
भारतातील द्वेषभक्त सातत्याने कुराणाची बदनामी करतात, पण घामिदी यांच्या इस्लामच्या व्याख्येत कुरआनला सर्वोच्च स्थान आहे. ते हदीस आणि इतर परंपरागत स्रोतांचाही वापर करतात, परंतु त्यांच्या विश्वासार्हतेची कुरआनच्या आधारेच काटेकोरपणे तपासणी करतात. हा दृष्टिकोन पारंपरिक इस्लामिक विद्वानांपेक्षा वेगळा आहे, जे हदीसवर जास्त अवलंबून असतात.

भारतीय द्वेषभक्त हिंदू धर्माला सनातन धर्माकडे नेऊ पाहताहेत, तसाच प्रपोगंडा करताहेत, तर घामिदी यांची मांडणी म्हणजे इस्लामला आधुनिक काळाशी सुसंगत करण्याचा प्रयत्न आहे.
उदाहरणार्थ, त्यांनी गुलामी, युद्धबंदी, आणि स्त्रियांच्या अधिकारांबाबत प्रचलित समजुतींना आव्हान दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की इस्लाम धर्म गुलामीला प्रोत्साहन देत नाही आणि युद्धबंदी महिलांशी विवाहबाह्य संबंधांना परवानगी देत नाही.

प्रेषित मुहम्मद यांनी लहान वयाच्या आयेशाशी लग्न केलं, ही बाब द्वेषभक्त इस्लामची टिंगल करण्यासाठी वापरतात, पण घामिदी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्या पत्नी हजरत आयेशा यांच्या विवाहाच्या वयाबाबत पारंपरिक समजुतींना (6-9 वर्षे) नाकारलंय. त्यांचं मत आहे की आयेशा यांचं वय त्यावेळी अधिक होते, जे ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भाशी सुसंगत आहे. हा दृष्टिकोन अनेक पारंपरिक विद्वानांपासून वेगळा आहे.
भारतीय द्वेषभक्तांचे घामिदी का लाडके आहेत, कारण ते आतंकवाद आणि जिहाद यांच्याविरोधात स्पष्ट भूमिका घेतात. मात्र, घामिदी यांनी इस्लामिक आतंकवादाला इस्लामच्या गैर-व्याख्यांशी जोडलं आहे.
त्यांच्या मते, धर्मत्यागाची मृत्युदंडाची शिक्षा, गैर-मुस्लिमांवर मुस्लिम वर्चस्व, किंवा जागतिक इस्लामिक राज्याची संकल्पना यासारख्या चुकीच्या शिकवणी आतंकवादाला प्रोत्साहन देतात. त्यांनी या विचारांना स्पष्टपणे विरोध केला आहे. घामिदींचं म्हणणं असं की इस्लामच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ काढून सांगितली गेल्यामुळे समाज भरकटलाय.

इस्लाम लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांशी सुसंगत आहे, हे घामिदींचं मत भारतीय द्वेषभक्तांना मान्य असेल का ? धर्माच्या नावाखाली कोणत्याही जोर, जुलूम,जबरदस्तीला जावेद अहमद घामिदी विरोध करतात आणि व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देतात. घामिदींना डोक्यावर उचलून धरणारे भारतीय द्वेषभक्त व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला चढवणारे आहेत.
घामिदी यांनी इस्लाममधील स्त्रियांच्या अधिकारांवर आधुनिक दृष्टिकोन मांडला आहे. ते स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करतात आणि कुरआनच्या संदर्भात स्त्रियांना अधिक हक्क आणि सन्मान मिळावा यासाठी युक्तिवाद करतात.

घामिदी यांचे विचार पुरोगामी असले तरी, त्यांना कट्टरपंथी आणि पारंपरिक इस्लामिक गटांकडून टीका झाली आहे. त्यांच्या काही मतांमुळे, विशेषत: हदीस आणि पारंपरिक व्याख्यांबाबत, त्यांना २०१० मध्ये हिंसक धमक्यांमुळे पाकिस्तान सोडावा लागला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. ही बाब द्वेषभक्तांनी केलेल्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांच्या घटनांची आठवण करून देणारी आहे.
जावेद अहमद घामिदी यांचे विचार इस्लामच्या आधुनिक, तर्कसंगत आणि मानवतावादी व्याख्येवर आधारित आहेत, जे त्यांना पुरोगामी इस्लामिक विद्वान बनवतात. त्यांच्या विचारांना समर्थनही झालं आणि विरोधही झाला. परंतु त्यांचं कार्य इस्लामला समकालीन आव्हानांशी जोडण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतं.
माणुसकी, पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, समता, स्त्री स्वातंत्र्य, धर्मचिकित्सा, सुधारणा मांडणाऱ्या भारतातील समाजसुधारकांना खलनायक ठरवणारे द्वेषभक्त केवळ मुस्लिमविरोधात काहीतरी ऐकायला मिळतं म्हणून जावेद अहमद घामिदी यांच्या मुलाखतींचा पुरस्कार करताहेत, पण वैचारिक लोच्या असलेल्या द्वेषभक्तांना हे माहित नाही की जावेद अहमद घामिदी हे अप्रत्यक्षपणे द्वेषभक्तांच्या विरोधी विचारांचंच प्रतिनिधित्व करतात.
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज
संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com