शहीद नौसेना अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात बदनामीची मोहिम !

शहीद नौसेना अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात बदनामीची मोहिम !

शहीद नौसेना अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात बदनामीची मोहिम !

संघीभाजपाई हिंदुत्ववादाचा भेसूर चेहरा पुन्हा एकदा समोर

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडून नौसेना अधिकारी कॅप्टन विनय नरवाल यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाशेजारी हताश बसलेल्या हिमांशी नरवालचं छायाचित्र हल्ल्यानंतरच्या काही मिनिटांतच वेगाने पसरवून संघभाजपाच्या टोळधाडीने रचलेल्या मनसुब्यांवर अक्षरशः पाणी फिरवण्याचं काम हिमांशी नरवाल यांनी केल्याने या टोळधाडीने अत्यंत गलिच्छ भाषेत त्यांच्याविरोधात संघभाजपाला साजेशी बदनामीची मोहिम उघडली आहे. विशेष म्हणजे संघभाजपाच्या गोटात या मोहिमेबाबत सामसूम आहे.

हिमांशी नरवाल या भारतीय नौसेना अधिकारी लेफ्टिनेंट विनय नरवाल यांच्या पत्नी आहेत. विनय नरवाल यांची २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. हा हल्ला त्यांच्या लग्नाच्या अवघ्या काही दिवसांनंतर झाला, जेव्हा ते हिमांशी यांच्यासोबत हनीमूनसाठी पहलगामला गेले होते. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेला आठवडाच उलटलाय आणि हिमांशी नरवाल यांच्याविरोधात हिंदुत्ववादी टोळधाडी बदनामीची मोहिम चालवत आहेत. याचं कारण त्यांनी विनय नरवाल यांच्या जन्मदिनी ( १ मे २०२५ ) हरियाणातील करनाल येथे आयोजित रक्तदान शिबिरात दिलेलं वक्तव्य आहे.

हिमांशी यांनी पत्रकारांना सांगितलं की, त्यांच्या पतीच्या हत्येची जबाबदारी असणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी, परंतु यामुळे मुस्लिम आणि काश्मिरी समाजाला लक्ष्य करू नये. हिमांशी नरवाल यांनी शांति आणि सौहार्दाचा संदेश दिला आणि कोणत्याही समाजाविरुद्ध द्वेष पसरवला जाऊ नये, अशी विनंती केली.

या वक्तव्याने हिंदुत्ववादी टोळधाडी बिथरल्या. जे छायाचित्र पसरवून या विद्वेषी टोळीने भारतातील मुस्लिमांविरोधात वातावरण पेटवण्याचा मनसुबा रचला होता, काश्मीरी नागरिकांना संशयाच्या भोवऱ्यात आणण्याचा खटाटोप चालवला होता, त्यालाच हिमांशी नरवाल यांच्या वक्तव्याने छेद दिल्यामुळे दंगलीसाठी आसुसलेल्या टोळधाडीचा थयथयाट सुरू झालाय.

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर, संघभाजपा समर्थक हिंदुत्ववादी विचारसरणीच्या व्यक्तींनी हिमांशी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी सुरू केलीय. काहींनी नेहमीप्रमाणे, त्यांच्या शांततेच्या आवाहनाला कमकुवतपणा किंवा देशभक्ती विरोधातील वक्तव्य मानलं. हिमांशी यांच्या वक्तव्याला सनातन धर्म आणि हिंदू राष्ट्राच्या विरोधातील ठरवून त्यांच्यावर गलिच्छ भाषेत हल्ले करण्यात आले.

हिमांशी नरवाल जेएनयू विद्यार्थी असल्यावरून त्यांना सरळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय. कोणीतरी घोडेवाला आवडला असेल, हीसुद्धा सामील असणार पतीच्या हत्येत, जेएनयू मधील हाॅस्टेलवर काश्मीरी युवकांच्या खोल्यांमध्ये रात्री चालवणारी वगैरे गलिच्छ भाषेत हिंदुत्ववादी टोळधाडी अगदी उघडपणे शेरेबाजी करीत आहेत. पण त्यांना रोखण्याचे कुठलेही प्रयत्न किंवा आवाहन सरकार स्तरावरून करण्यात आलेलं नाही.

हिमांशी नरवाल यांना ट्रोल करणं हे सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत येऊ शकतं. आणि BNS मध्ये यासंदर्भात खालील तरतुदी लागू होऊ शकतात:

कलम 351(2) : गुन्हेगारी धमकी (criminal intimidation), ज्यामध्ये व्यक्तीला, त्यांच्या प्रतिष्ठेला किंवा मालमत्तेला इजा पोहोचवण्याची धमकी देणं समाविष्ट आहे. याची शिक्षा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही असू शकते.

कलम 79 : स्त्रीच्या सन्मानाला धक्का लावण्याचा हेतू असलेले शब्द, हावभाव किंवा कृती. याची शिक्षा 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड असू शकते.

IT Act, 2000 चे कलम 67 (अश्लील सामग्री प्रसारित करणे) आणि 67A (लैंगिकदृष्ट्या स्पष्ट सामग्री प्रसारित करणे) यांचा वापर होऊ शकतो, BNS मध्ये डिजिटल माध्यमांशी संबंधित व्याख्या IT Act, 2000 शी जोडल्या गेल्या आहेत.

हिमांशी नरवाल यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांविरोधात सरकारने कोणतीही ठोस कारवाई केल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. काही नेटकऱ्यांनी हिमांशी यांच्यावरील अपमानास्पद टिप्पण्यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

काहींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करून ट्रोलर्सवर कारवाईची मागणी केली होती. तथापि, या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली गेल्याचा किंवा कोणावर प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई झाल्याचं अजूनतरी दिसून येत नाही. हिमांशी नरवाल यांच्याविरोधातली बदनामीची मोहिम जणूकाही सरकार पुरस्कृत आहे की काय, इतकी सरकार पातळीवर सामसूम आहे.

पहलगाम हल्ल्यावर व्यक्त होताना सरकारला प्रश्न विचारला की पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या हताश हिमांशी नरवालच्या छायाचित्राची ढाल करून तुम्हाला जराही संवेदना नाहीत का, असा उलट सवाल करणाऱ्या तथाकथित सनातनी संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या हिंदुत्ववादी टोळधाडीचं ढोंग हिमांशी यांच्या बदनामीच्या मोहिमेतून उघडं पडलं आहे.‌ या निमित्ताने संघीभाजपाई हिंदुत्ववादाचा भेसूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मीडिया भारत न्यूज
संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account