मुंबई प्रेस क्लबमध्ये खरंच अंधभक्तांनी वोटचोरीच्या माहितीपटावेळी गोंधळ घातला ?

मुंबई प्रेस क्लबमध्ये खरंच अंधभक्तांनी वोटचोरीच्या माहितीपटावेळी गोंधळ घातला ?

मुंबई प्रेस क्लबमध्ये खरंच अंधभक्तांनी वोटचोरीच्या माहितीपटावेळी गोंधळ घातला ?

मुंबई प्रेस क्लबचे ज्येष्ठ सदस्य परनजॉय गुहा ठाकूरता यांनी तयार केलेल्या माहितीपटाच्या प्रसारणावेळी झालेल्या वादाचा विडिओ समाज माध्यमांत पसरला आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस एका अंधभक्ताशी कसा वाद घालत आहेत, असा दावा केला गेला, पण समर खडस यांनीच दिलेल्या स्पष्टीकरणामुळे भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधक असे दोन्ही बाजूंचे ट्रोलर्स तोंडावर आपटले आहेत. कोणी वोटचोरीचा विडिओ दाखवणार असल्याने प्रेस क्लबमध्ये शिरून अंधभक्तांनी गुंडगिरी केल्याचा दावा केला, तर काहींनी समर खडस यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा खटाटोप केला. सत्य मात्र वेगळंच होतं.

प्रेस क्लबमधील काही ज्येष्ठ सदस्य गेली काही दशके फिल्म क्लब चालवतात. दर शनिवारी क्लबच्या कॉन्फरंस हॉलमध्ये सांयकाळी वेगवेगळे क्लासिक सिनेमे व त्यावर चर्चा असा कार्यक्रम होतो आहे. त्याचे काम हरिश नांबियार हे प्रेस क्लबचे एक सन्माननीय सदस्य पाहातात. रॉय यांनी नांबियार यांच्याशी बोलून शनिवारच्या फिल्म क्लबच्याच शोमध्ये आपला माहितीपट दाखवावा, असं समर खडस यांनी नांबियार यांना सुचवलं होतं, त्याप्रमाणे नांबियार व गुहा यांनी शनिवार २५ ऑक्टोबरचा दिवस निवडून त्या दिवशी हा माहितीपट दाखवण्याचे नक्की केलं होतं.

त्याचं निमंत्रण गुहा यांनी असंख्यांना पाठवले, तसंच या कार्यक्रमाबद्दल एक्सवरही पोस्ट केली. शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी साधारण सहा वाजता क्लबच्या कॉन्फरंस हॉलमध्ये काही ज्येष्ठ पत्रकार मंडळीही जमलेली होती.

मागच्या छोट्याशा जागेत पाच सहा कॅमेऱ्यांचे ट्रायपॉड्स लागलेले होते व काही कॅमेरामन उभे होते. क्लबचा हॉल हा खूपच छोटा असल्याने गर्दी वाढतच गेली. वाढणाऱ्या गर्दीकडे पाहून नांबियार यांनी त्या कॅमेरामन्सना तुम्ही प्रश्नोत्तरांना येऊन त्याचे चित्रिकरण करा, हा माहितीपट युट्यूबवर उपलब्ध असल्याने तुम्हाला त्यातील काही भाग हवाच असल्यास तेथून तो तुम्ही घेऊ शकता, तसंच तुम्ही कॅमेरे काढल्यास इथे काही खुर्च्या मांडता येतील व काहींना उभे राहून हा माहितीपट पाहाता येईल, असं सांगितलं.

मात्र आम्हाला इथे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आम्ही इथून हलणार नाही, असे त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. नांबियार यांनी त्यांनंतर दोनदा त्यांना विनंती केली की कृपया तुम्ही कॅमेरे काढा व प्रश्नोत्तराच्या वेळी तुम्ही कॅमेरे लावा. मात्र आम्हाला निमंत्रण मिळाल्याचे ते वारंवार सांगत राहिले.

समर खडस यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला निमंत्रण कोणी दिले आहे? त्यावर हे निमंत्रण आम्हाला काँग्रेस पक्षाने दिले आहे, असं उत्तर त्यांनी दिलं. हे उत्तर ऐकून खडस  यांना आश्चर्य वाटलं.

प्रेस क्लबला सिनेमापासून चर्चासत्रांपर्यंत असंख्य कार्यक्रम होत असतात, त्यात कधीही कुठला पक्ष अधिकृत निमंत्रण पाठवत नाही व तसे निमंत्रण कुठल्याही राजकीय पक्षाने पाठवणे हे योग्यही नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने म्हणजे नक्की कुणी दिलं, असं विचारलं असता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्याचं एकाने सांगितलं.

खडस यांनी हा कार्यक्रम प्रेस क्लबचा असून काँग्रेस पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. इथे लोकांना अडचण होते आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर जा, असं पत्रकारांना सांगितलं. त्यानंतर चॅनेलचा एक पत्रकार व इतर काही कॅमेरामन यावर वाद घालू लागले. तुम्ही बाहेर जायला सांगणारे कोण, इथून वादाला सुरुवात झाली.

प्रेस क्लबच्या नियमांनुसार तिथल्या व्यवस्थेस प्रेस क्लबचे पदाधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. तुम्ही बाहेर जायला सांगणारे कोण, यावर प्रेस क्लबचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो, असं खडस यांनी म्हटल्यावर भांडणास सुरुवात झाली.

'समोरच्याने आवाज वाढवल्यानंतर मेणाहूनही मऊ, मुलायम होऊन उत्तरे देण्याचा माझा स्वभाव नाही. सध्याच्या काळात तशा पद्धतीने कुणी ऐकतही नाही, हे माझे मत त्या दिवशीही सिद्धच झाले. त्या दरम्यान या सगळ्याचे चित्रिकरण काही कॅमेरामन बंधू करत होते. हे करू नका, असे आमचे खजिनदार सौरभ शर्मा यांनी त्यांना सांगितले. मात्र अब तुम्हे दिखाते है, असे सांगत त्यांनी ते सुरु ठेवले. त्यानंतर मी हॉलमध्ये जाऊन बसलो व दहा मिनिटांत माहिती पट सुरू झाला. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही झाला. इतकीच ही घटना आहे.' असं स्पष्टीकरण समर खडस यांनी केलं आहे.

समर खडस यांनी काय म्हटलंय ?

एखाद तासाच्या आतच काही वॉट्सॅप ग्रूप्सवर यातील भांडणाचा व्हिडिओ कापून तो टाकण्यात आला. त्यावर विविधांगांनी असंख्यांनी असंख्य बाबी लिहिल्या. त्यात नेहमीप्रमाणे मी अर्बन नक्सल आहे इथपासून ते वोट चोरीच्या माहितीपटातून कॅमेरामन्सना बाहेर जायला लावल्याने मी गोदी मिडिया/ पाकीट पत्रकार आहे, इथपर्यंत असंख्य विविध चर्चा चवीने केल्या गेल्या. एका साक्षेपी माजी संपादकाने आपल्या समाजवादी सवयीनुसार बारिक खडे मारून घेतले.

परदेशातून भाजपविरोधी सोशल मिडिया चालवल्या जाणाऱ्या एका हँडलपासून ते भाजपच्या बाजूने चालवल्या जाणाऱ्या एका सोशल मिडिया हँडलपर्यंत असंख्यांनी असंख्य विश्लेषणे केली. ही सगळी मजेशीरच आहेत, असे मला वाटते.

माझ्या असंख्य मित्रांनी अगदी महाराष्ट्रातीलच नव्हे तर दिल्ली, बंगलोर, चेन्नईपासूनच्या मित्रांनी माझ्याकडे या वायरल क्लिपविषयी फोन करून चौकशी केली. त्या बहुतांश लोकांनी विचारले की, नक्की काय झाले, कारण या व्हिडिओत तू नग्नावस्थेत नाहीस, तू कुणाकडून पैसे घेत नाहीस, तू कुठल्याही स्त्री सोबत असभ्य वर्तन करत नाहीस, तू फक्त जोरजोरात भांडत आहेस, तर यात वायरल होण्यासारखे काय आहे? मलाही त्याचे उत्तर माहित नव्हते.

मात्र इतक्या साऱ्या लोकांची आपल्यावर नजर असल्यानेच हे सगळे घडले असावे, यापेक्षा याचे वेगळे उत्तर काही असू शकत नाही. असो तरी माझ्या हितचिंतकांना, मित्रांना, कुटुंबीयांना या सगळ्यामुळे मनस्ताप झाला हे मान्य आहे. आपल्या इतकेच आपल्या जवळचेही मनाला न लावून घेणारे असतीलच, असे नसते, हे खरंच!

समर खडस यांनी केलेल्या स्पष्टीकरणातून हिंदुत्ववादी असोत की तथाकथित बुद्धिवादी मंडळी असोत, ती अर्धवट अपुऱ्या माहितीवर कसे स्वतःच्या अजेंड्यांचे इमले चढवतात, ते स्पष्ट झालं आहे. समर खडस यांच्याशी वाद घालणारी व्यक्ती कार्यक्रम उधळायला आलेली कोणी बाहेरून घुसलेली व्यक्ती नव्हती तर पत्रकार होती, हे अधोरेखित झालंय.

मूळात ती व्यक्ती समर खडस यांच्याशी ज्या शब्दात वाद घालत होती, त्यातूनच ती पत्रकार आहे, हे स्पष्ट होत होतं. पण आपापल्या अजेंड्यांची झापडं डोळ्यांवर असली की भले भले कसे समाज माध्यमातल्या चक्रव्यूहात सापडतात आणि फसतात, हे कमल गवई प्रकरणापाठोपाठ पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account