उत्तरेत मुलींची संख्या कमी आहे, लग्नासाठी मुली मिळत नाहीत, म्हणून तिथल्या पुरुषांची खाज भागवायला महाराष्ट्रातल्या महिला विकल्या जाताहेत, हा विषय मराठी अस्मितावाल्या संघटना आणि राजकीय पक्षांच्याही अजेंड्यावर नाही.
अनिल वाडेकर हाजिर हो...असा पुकारा करीत आता उल्हासनगर आणि बुलढाणा पोलिस मानवी तस्करी प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. अनिल वाडेकर काळा की गोरा, पोलिसांना माहित नाही. हे नाव पीडीत महिलेच्या जबानीतून आलंय. पीडीत महिलेच्या तक्रारदार आईने आपल्या फिर्यादीतही अनिल वाडेकर नावाचा उल्लेख केलाय.
आरोप आहे की रागाने दोन मुलांसह आपलं घर सोडून निघालेल्या एका ३० वर्षीय महिलेला अनिल वाडेकर नावाच्या कोण्या व्यक्तीने फूस लावून उल्हासनगरला आपल्या घरी आणलं. तिथे ती महिला मुलांसह सातआठ दिवस राहिले व नंतर वाडेकरने तिची दोन मुलं अज्ञातांना विकली व पीडित महिलेचाही एका जोडप्यामार्फत राजस्थानमध्ये सौदा केला.
पीडित महिला आणि तिची दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेच्या पतीने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात मार्च, २०२५ मध्ये नोंदवली होती. त्यानंतर काही दिवसांनी महिलेच्या कुटुंबाला काॅल आला की तुमच्या घरातील महिला माझ्याकडे आहे. हवी असेल तर माझे खर्च केलेले पैसे द्या आणि घेऊन जा.
हा काॅल आल्यावर पीडित महिलेच्या कुटुंबाने देऊळगाव राजा पोलिसांच्या मदतीने काॅल लोकेशन शोधून आधी मध्यप्रदेशातलं आलोट तालुक्यातलं कंथारिया गाव गाठलं. तिथे पैशाने विकत घेऊन पीडितेचा पती बनलेल्या ईश्वरची पोलिसांनी चौकशी केली. त्याने सांगितलं की महिला सारखी पळून जात होती, म्हणून ज्याने मला विकली, त्याला परत देऊन टाकली.
मग देऊळगाव राजा पोलिस आणि आलोट पोलिसांनी मिळून राजस्थानातलं डग गाठलं. तिथे एका दलालाच्या घरी शोध घेतला असता, आधी महिला सापडून आली नाही. पण सोबतच्या महिला पोलिसाला संशय आला म्हणून गोशाळेची झडती घेतल्यावर पीडित महिला डांबलेली सापडून आली.
इथवर महाराष्ट्रातील देऊळगाव राजा आणि मध्यप्रदेशातील आलोट पोलिसांनी निभावलेली भूमिका ठीकठाक होती. पण महिला सापडून आल्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्याची तसदी ना महाराष्ट्र पोलिसांनी घेतली ना मध्यप्रदेश पोलिसांनी !
देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार होती. त्यातली पीडित महिला सापडली. पण माळीपुराहून ती राजस्थानला कशी पोचली, ते जाणून घ्यावसंही पोलिसांना वाटलं नाही. तसं झालं असतं तर तिच्या मुलांचा वेळीच सुगावा लागला असता.
पण देऊळगाव राजा पोलिसांचं काम वाढलं असतं. मुलं शोधण्यापेक्षा कर्तव्याशी बेइमानी अधिक सोपी होती. देऊळगाव राजा पोलिस कर्तव्य जाऊदेत, पण बेपत्ता प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या निर्देशानुसार जरी वागले असते तर त्यांना वाडेकर दुवा सापडला असता.
पीडित महिलेने केलेल्या वर्णनानुसार, उल्हासनगरात अनिल वाडेकर, छाया वाडेकर आणि त्यांची नर्सिंगचं काम करणारी मुलगी साक्षी अशा कुटुंबात ती आठवडाभर राहिली होती. चाळीतलं घर असावं, जवळ मटनाचं दुकान होतं, असं ती सांगते. अनिल वाडेकर पायाने अधू आहे आणि त्याच्या घरात महाराष्ट्र शासनाचं कसलंसं ओळखपत्र होतं.
मुलांची आश्रमात राहण्याची व्यवस्था करू आणि तुझंही लग्न करून देऊ, असं वाडेकरने तिच्या मनात भरवलं होतं. प्रत्यक्षात पीडित महिलेची कशावर तरी सही घेऊन त्याने ती मुलं कोणालातरी देऊन टाकली. थोडक्यात विकली. पीडित महिलेला ट्रेनमध्ये बसवलं. त्या ट्रेनमध्ये दलाल तिच्या संपर्कात आले. त्यांनी तिला कंथारियात ईश्वर नावाच्या प्रौढाला विकली.
बेपत्ता मुलांची आजी
पीडित महिलेची आई व भाऊ मुलांच्या शोधात उल्हासनगरला आले, तेव्हा बाल कल्याण समितीच्या कार्यालयाबाहेर कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर आणि मीडिया भारतचे सहसंपादक प्रफुल केदारे यांची भेट झाली. त्यांच्याच प्रयत्नाने त्यांची तात्पुरती राहण्याची सोय आधी एका सिंधी धर्मशाळेत व नंतर वन स्टाॅप सखी सेंटरला झाली.
दरम्यानच्या काळात कायद्याने वागा लोकचळवळ आणि मीडियाभारत ने या प्रकरणाला सार्वजनिकरित्या वाचा फोडल्यावर उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला, जो मागाहून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
पोलिसांनी अनिल वाडेकर, छाया वाडेकर नावाच्या व्यक्ती आणि दोन अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १३७(२), १४३(३), १४३(५), ३०८ (२) आणि ३(५) खाली गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा सिद्ध झाल्यास १४ वर्षेपर्यंतचा तुरुंगवास किंवा जन्मठेपही होऊ शकते.
पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे खरोखरच अशा नावांच्या, आडनावांच्या व्यक्ती उल्हासनगरात राहतात का, कुठे राहतात ते हुडकल्यावर त्यांच्याकडे पीडित महिला राहिली होती का, हे निष्पन्न झाल्यावरच मुलांच्या शोधाच्या दिशेने तपास जाईल. राजस्थानातील विक्रेता दलाल, मध्यप्रदेशातील खरेदीदार हे तर डोळ्यासमोर आहेत. पण खरंच कारवाई होईल का ? महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानातील सरकारं आवश्यक तत्परता, गांभीर्य दाखवतील का ?
महाराष्ट्रातील हिंदू महिलेला राजस्थानातला हिंदू दलाल मध्यप्रदेशातील हिंदू पुरुषाला विकतो. यात सगळे आरोपी हिंदू ! अशावेळी हिंदू संघटना, हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी नेते गप्पगार असतात. त्यांना चेव येण्यासाठी लागतं तथाकथित लव्हजिहाद प्रकरण.
हिंदू महिलेला एक व्यक्ती विकत घेतो, लग्न केलं म्हणून दाखवलं जातं आणि अनेकजण बलात्कार करतात, हे भारतात सर्रास सुरू आहे. पण गाईच्या तस्करीवर थयथयाट करणारे बाईच्या तस्करीवर मात्र ढिम्म आहेत.
जिथे जिथे असले संतापजनक प्रकार सुरू आहेत, त्यातल्या बहुतांशी राज्यात भाजपा सरकारं आहेत. पण महिलांची, लहान मुलांची तस्करी रोखण्यासाठी ही सरकारं काहीही करत नाही.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर २४ तासांच्या आत ही लहानगी मुलं हुडकून काढता येतील. आपणही एका मुलीचे बाप आहोत, इतकी जाणीव त्यांच्यात जागी व्हायला हवी आणि लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याशी प्रामाणिकपणा दाखवायला हवा. रिकामटेकडे विषय सोडून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता राबवायला हवी. स्वयंस्फूर्तता नसेल तर किमान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्याचे सोपस्कार तरी करायला हवेत. अशी शेकडो बेपत्ता मुलं आपल्या कुटुंबात परततील आणि महाराष्ट्रात पुन्हा कोणाचं मूल पळवण्याची कोणाची हिंमत होणार नाही ! मला खात्री आहे, मुख्यमंत्री हे आव्हान स्वीकारतील ! अशी पोस्ट करून कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी सदर प्रकरणात लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्री कम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलं आहे.
उत्तरेत मुलींची संख्या कमी आहे, लग्नासाठी मुली मिळत नाहीत, म्हणून तिथल्या पुरुषांची खाज भागवायला महाराष्ट्रातल्या महिला विकल्या जाताहेत, हा विषय मराठी अस्मितावाल्या संघटना आणि राजकीय पक्षांच्याही अजेंड्यावर नाही.
मूळात लोकांचे जीवनमरणाचे कोणतेच पक्ष भारतात राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर नाहीत. राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यात, आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत आणि महिला, लहान मुलांची तस्करी करणारे दलाल मोकाट आहेत, बिनधास्त आहेत.