फेकन्यूजचा मारा भारतीयांवर हजारों वर्षांपासून होतोय !

फेकन्यूजचा मारा भारतीयांवर हजारों वर्षांपासून होतोय !

फेकन्यूजचा मारा भारतीयांवर हजारों वर्षांपासून होतोय !

फेकन्यूज, फॅक्टचेक हे शब्द समाजमाध्यमात नव्याने चर्चेत आलेले असले तरी भारतीयांना या दोन्ही गोष्टी नवीन नाहीत. धर्मपालनाच्या नावाखाली अतार्किक भंपककथांमार्फत हजारों वर्षांपासून आपल्याकडे फेकन्यूज पसरवल्या जात आहेत. अर्थात, फॅक्टचेक करणारेही सुरुवातीपासून संघर्ष करताहेत. अंधश्रद्धा निर्मूलन हेही एकप्रकारचं फॅक्टचेकींगच आहे. जे दाभोळकरांनी जीव धोक्यात आहे, याची जाणीव असतानाही केलं. अशा शब्दांत कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन केलं.

शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येला २० ऑगस्ट २०२१ रोजी आठ वर्षे झाली. त्या निमित्ताने, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कल्याण शाखेद्वारा अभिवादन सभेचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले वाचनालय, कल्याण (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेत महाराष्ट्र अंनिस आणि विविध समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी शहीद डॉ दाभोलकर यांना अभिवादन केलं.

पु ल कट्ट्याचे सुधीर चित्ते, महा अंनिस कल्याण शाखेचे उपाध्यक्ष डॉ बी एस वाघ, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड कार्यक्रमाला उपस्थित होते. अक्षय भोईर याने कविता वाचन केले. बंडू घोडे (पुरोगामी विचार मंच), शैलेश दोंदे (समता संघर्ष), उदय चौधरी (कामगार नेते) सुरेखा भापकर इत्यादि वक्त्यांनी आपले विचार मांडून या कार्यक्रमाची भक्कम वैचारिक पायाभरणी केली.

राज असरोंडकर यांनी विचार मांडत असताना, आपल्याकडे धर्म कसे माणसांचे मेंदू बधीर करून त्यांना गुलाम करण्यासाठी वापरले गेले व धर्माच्या नावावर सांगितल्या गेलेल्या अनेक भंपक कथा ह्या कशा लोकांची विचारप्रक्रिया कुंठीत करण्यासाठी सांगितल्या गेल्या आणि मूळात आज देशावर राज्य करणारी हुकुमशाही प्रवृत्ती ही कशी एक बुरसट धर्मसंस्कृतीच आहे आणि दाभोळकरांची हत्या हा त्या संस्कृतीचाच भाग कसा आहे, ते एकेक उदाहरण मांडत उलगडून सांगितलं.

अफगणिस्तानात सत्ता हस्तगत करणाऱ्या आणि धर्माच्या नावावर स्वतःचा दहशतवादी अजेंडा राबवणाऱ्या तालिबानचं उदाहरण असरोंडकर यांनी दिलं. अगदी स्वतःला परिवर्तनवादी म्हणवणारी मंडळीही कट्टरतेपायी कशी माती खातात, हे सांगताना इंडियन आयडॉलच्या सायली कांबळेचं झालेलं ट्रोलिंगही त्यांनी सांगितलं. शिवाय, सुधारणावाद्यांचं श्रेय धर्मांध लोक कसं कोडगेपणाने लाटत असतात, तेही असरोंडकर यांनी मांडलं.

असरोंडकर यांच्या भाषणाचा धागा पकडून पत्रकार किरण सोनावणे यांनी आजचं भीषण सामाजिक वास्तव आणि त्या मागील इतिहास याची तर्कसंगत मांडणी केली. या परिस्थितीत डॉ दाभोळकर यांचे विचार पुढे घेऊन जाणे किती महत्वाचं परंतु अवघड आहे, याची जाणीव करून देऊन त्यांनी विविध पर्याय सुचवून उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

किरण सोनावणे यांनी भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडत देशाच्या मागासलेपणाची कारणं सविस्तरपणे मांडली. टप्प्याटप्प्याने त्यांनी आपलं भाषण एका उंचीवर नेलं. देशाचे नागरिक म्हणून वावरताना आपण कसे धर्म आणि देश या दोन दगडांवर पाय ठेवून दुहेरी व्यक्तीमत्व म्हणून वावरत असतो आणि देशापेक्षा धर्माला महत्व देत कसे बेगडी देशभक्त असतो, याची सोनावणे परिणामकारक मांडणी केली. भारताचा इतिहास, सामाजिक सुधारणा आणि वर्तमान हा प्रवास त्यांनी सांगितला.

ज्वलंत विषय, त्या विषयाची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सखोल मांडणी, संयत भाषा, प्रभावी युक्तिवाद यांनी परिपूर्ण अशी ही भाषणं खरं तर वैचारिक मेजवानीच होती.

महा. अंनिस, राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर यांनी डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिति आणि त्यानंतर केवळ डॉ. दाभोळकर यांचे विचार आणि त्यांनी निर्माण केलेली संघटनेची कार्यप्रणालीमुळेच संघटना कशी वाढली, विस्तारली याची माहिती दिली.

कल्याण शाखेच्या कार्याध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत यांनी वर्तमान परिस्थितीत डॉ. दाभोळकर यांचे विचार घेऊन, सर्व समविचारी पक्ष, संघटना यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महा. अंनिस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी केलं. किशोर जगताप, टिटवाळा शाखा पदाधिकारी यांनी प्रस्तावना करून उपस्थितांचं स्वागत केलं. आभार प्रदर्शन तानाजी सत्वधर, प्रधान सचिव, कल्याण शाखा यांनी केले.

शेवटपर्यंत सर्व उपस्थित मन लावून वक्त्यांची भाषणं ऐकत होते. एवढंच नाही तर कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्त्यांनी (महिला कार्यकर्त्या देखील उत्साहाने सामील झाल्या) त्यांच्यासोबत कोंडाळे करून बसून गप्पांचा फडच रंगविला. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर रंगलेला हा संवाद संपूच नये असे सर्वांना वाटत होते. किरण सोनवणे आणि राज असरोंडकर यांनी सहभागी लोकांचं अत्यंत रंजक पद्धतीने शंका समाधान करून भरपूर ज्ञानवर्धक माहिती दिली.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!