भाजपाच्या छत्रछायेखालील जैन समाजाकडून महाराष्ट्रात मांसाहार बंदीचा फतवा निघाला आणि तो शिंदे-फडणवीस सरकारने उचलून धरला तर आश्चर्य वाटायला नको. वसईत मांसाहार सेवा देणाऱ्या एका हाॅटेलला महिना २५ हजाराच्या दंडाची नोटीस बजावण्यात आलीय. एका जैन मंदिर व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात येतेय.
मराठी उद्योजक लाॅबीचे पदाधिकारी कल्पेश सपकाळ यांनी या शाकाहारी दडपशाहीचा विरोध करत हाॅटेल कोणत्याही परिस्थितीत बंद न करण्याचा निर्धार केलाय. उलट दंड बजावण्याच्या असंविधानिक कृतीविरोधात आधी सरकारकडे व आवश्यकता भासल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचं हाॅटेल संचालक वैभव भणगे यांनी मीडिया भारत न्यूजला सांगितलं.

कायद्याने वागा लोकचळवळीने जैन मंदिर ट्रस्टच्या दादागिरीचा निषेध केला असून वैभव भणगे यांना त्यांच्या लढाईत सर्वतोपरी पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं संघटनेचे कोकण संघटक दीपक परब यांनी सांगितलं, तर धनदांडग्यांचं हिंदुत्व आता मराठी अस्मितेवर हुकुमत गाजवू लागलं असल्याची प्रतिक्रिया कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी दिलीय. महाराष्ट्रातील जनतेने वेळीच सावध व्हावं, अन्यथा मुंबई तुमची, भांडी घासा आमची, हे पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही असरोंडकर यांनी दिलाय.
वसईतील तुंगारेश्वर फाटा येथील कुशल मंगल औद्योगिक वसाहतीतील एस-१० या गाळ्यात सुरू असलेल्या हाॅटेल डायमंडमध्ये मांसाहारी भोजन मिळत असल्याचा विरोध समोरील जैन मंदिराच्या श्री चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन ट्रस्टकडून ऑक्टोबर महिन्यात करण्यात आला होता. त्यावर औद्योगिक वसाहतीच्या सोसायटीने अशोक कुमार तिवारी आणि किशन कुमार तिवारी या गाळेधारकांना नोव्हेंबर महिन्यात नोटीस बजावलीय. गाळेधारक तिवारी असले तरी हाॅटेल संचालक वैभव भणगे नावाची मराठी व्यक्ति आहे.
नोटीशीत हाॅटेल बंद करण्यास बजावण्यात आलंय आणि तसं न केल्यास पुढील दर महा २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
सोसायटीने काही व्यवसायांवर बंदी घातलेली असून मांसाहारी हाॅटेल त्यापैकी एक असल्याचं सोसायटीने आपल्या नोटीशीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे या नोटीशीवर कोण्या जैन व्यक्तिचीच स्वाक्षरी आहे.
असं समजतंय की कुशलमंगल औद्योगिक वसाहतीत जैनांचंच वर्चस्व आहे व तीच मंडळी मंदिर ट्रस्टवर आहेत.
हाॅटेल व्यावसायिक वैभव भणगे यांनी मीडिया भारत न्यूज शी बोलताना सांगितलं की मला हाॅटेल सुरू करून सहासात महिने झालेत. इथल्या लोकांना खरंच मांसाहाराची अडचण असती तर हाॅटेल सुरू झालं तेव्हाच त्यांनी विरोध केला असता. आताचा विरोध हा मराठीद्वेष्टेपणातून होतो आहे. मांसाहाराचा बहाणा केला जातोय. या जैन मंडळींना झुंडीने मराठी माणसाचा व्यवसाय बंद पाडायचा आहे. कोणी काय खावं, कुठला व्यवसाय करावा, हे कोण सांगणारे ? यांची मुजोरी महाराष्ट्रात अशीच चालू दिली तर उद्या शाकाहारी हाॅटेलातल्या कांदालसणालाही ते विरोध करतील.

वैभव भणगे म्हणाले की त्यांचा विरोध आणि मला बजावलेली नोटीस असंविधानिक आहे. माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. त्यामुळे मी त्याविरोधात कायदेशीर लढा द्यायचा निर्णय घेतलाय. गाळेधारक माझ्या सोबत आहेत. पण उद्या त्यांनी साथ नाही दिली तरी मी माझ्या संविधानिक अधिकारांसाठी लढणारच. माझा करार तीन वर्षांचा आहे. मी सात-आठ लाखांची गुंतवणूक केलीय. माझं हाॅटेल बंद झालं तर आत्महत्येशिवाय माझ्याकडे काही पर्याय राहणार नाही.
हा लढा शाकाहारी - मांसाहारी असा नसून मराठी माणसाच्या महाराष्ट्रातल्या अस्तित्वाचा आहे. मराठी माणसाला इमारतीत घर घेऊ न देणारे जैन लोक आता पोटावर पाय देऊ लागलेत. का सहन करायचं यांना ? महाराष्ट्रातील समस्त मराठी जनांनी या लढ्यात मला साथ द्यावी, असं आवाहनही भणगे यांनी केलं आहे.