रस्त्याची चाळण ; पण उपायांत आश्वासनांची उधळण फक्त !!

रस्त्याची चाळण ; पण उपायांत आश्वासनांची उधळण फक्त !!

रस्त्याची चाळण ; पण उपायांत आश्वासनांची उधळण फक्त !!

कल्याण - रायते रस्त्याला वाली कोण ?

कल्याण म्हाळशेज महामार्ग क्र ६१ हा मुंबई-अहमदनगरला जोडणारा महत्त्वाचा दुवा. मात्र, गेले ३ वर्षापासून कल्याण ते रायते दरम्यान मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता मृत्यूला आमंत्रण ठरला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता सामाजिक - राजकीय कार्यकर्ते आक्रमक तितक्याच निर्णायक आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार, रिक्षा, व वाहनचालकांना खोळंबलेल्या रहदारीचा मनस्ताप सहन करावा लागतोय, तर स्थानिक रहिवासी, विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकही त्रस्त आहेत. खड्ड्यांमुळे प्रवाशांमध्ये मान, पाठ, कंबर याचे विकार वाढु लागलेत.

असंवेदनशील अधिकारी ठेकेदार यांच्या उदासीनता आणि दुर्लक्षामुळे या रस्त्यावर आजवर अनेक अपघात घडलेत. वरप गावचे नारायण महादु भोईर हे जेष्ठ नागरिक अपघातात दगावले.

गेल्या ३ वर्षांपासून विविध आंदोलने करणाऱ्या स्थानिक नेत्यांनी आता फसवी आश्वासनं देणाऱ्या राजकारणी, ठेकेदार आणि अभियंत्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

आपण या रस्त्यासंदर्भात अनेकदा सरकारकडे पाठपुरावा करतोय. आता रहिवासी संतापलेत. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद सदस्य जयश्री सासे यांनी मीडिया भारत न्यूज ला दिली. या रस्त्यालगत अनेक शाळा असल्याने हा शालेय विद्यार्थ्यांच्याही जीवनमरणाचा प्रश्न असल्याचं सासे यांनी म्हटलं आहे.

वेळेत अधिकाऱ्यांनी रस्ता खड्डेमुक्त करण्याची प्रक्रिया सुरु न केल्यास आपण ग्रामस्थांसह उपोषण करणार असल्याचा इशारा जयश्री सासे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे

या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आम्ही गेल्या सातआठ महिन्यांपासून सतत पाठपुरावा करून शासनाला गंभीरतेने लक्ष घालण्यासाठी सनदशीर लढा देतोय असं मनसे नेते अश्विन भोईर यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं.

खड्डयांमुळे मरण पावलेल्या नारायण महादु भोईर या नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या निष्काळजी अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी टिटवाळा पोलीस स्टेशनला केली असल्याची माहिती भोईर यांनी दिली.

आश्विन भोईर, महेश चिंतामण देशमुख, उमेश पाटील, विवेक सुरेश गंभीरराव , राजेश बारकू भोईर ,जगन्नाथ शेट्टी, संजय कांबळे, दिलीप भोईर आणि रिक्षा चालक संघटना यांनी टिटवाळा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनानुसार ११ आॅगस्ट २०२२ पासून खड्डयात ठाण मांडून उपोषण करण्याचा इशारा दिलाय.

कल्याण-मुरबाड राष्ट्रीय मार्ग (६१) लगत म्हारळपाडा येथे थारवानी प्रोजेक्ट समोर म्हारळपाडा ते पांजरपोळ, पावशेपाडा दरम्यान रस्ता लवकरात लवकर सिमेंट कॉक्रीटीकरण किंवा व्यवस्थीत डांबरीकरण करणे बाबत २ दिवशीय आमरण उपोषण केले असता आम्हास कार्यकारी अभियंता सी. तृप्ती नाग यांनी व संबंधीत विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते की पावसाळा सुरु होण्याअगोदर सदर रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करण्यात येईल ; परंतु त्यानंतर सदर रस्त्याचे काम त्यांच्या चुकीमुळे पावसाळा सुरु होण्याअगोदर कॉक्रीटीकरण झाले नाही. त्यांनी सदर रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरु केल्याने म्हारळपाडा ते पांजरपोळ खूप खड्डे, चिखल असल्याकारणाने रोज रस्त्यावर अपघात होतात. अपघाताचे प्रमाण खुप वाढले असून २ जुलै २०२२ रोजी आमचे वरप गावाचे जेष्ठ नागरीक नारायण महादू भोईर यांचे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अपघाती मरण झाले असून असे बरेच अपघात झाले आहे आणि होत राहणार. राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना आपले जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे, असे या निवेदनात म्हटलेले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचं काय म्हणणं आहे ?

रस्त्याच्या कडेला असलेली गटारव्यवस्था परिपूर्ण नसल्याने तसंच जोरदार पावसामुळे खड्डे बुजवण्यास विलंब होतोय. पण सध्या आमचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. महिनाभराच्या आत हा रस्ता दुरुस्ती करून रहादारीस सुरळीत करण्याचा प्रयत्न करू !

तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांचाही याचबाबत एमएमआरडी आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी उपोषण आंदोलनातून सतत संघर्ष सुरू असतो.

रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षांपूर्वी, २८ आॅगस्ट २०२१ रोजी आक्रमक पवित्रा घेतला गेला होता. त्यावेळी, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांनी ७ आॅक्टोबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र तात्पुरती मलमपट्टी केलेले ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

या दोन वर्षात झालेल्या मुसळधार पावसात म्हारळ, वरप, कांबा, ते रायते या दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. एका फुटाचेही काँक्रिटीकरण केलेले कुठेही आढळत नसल्याने अधिकाऱ्यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप रमेश हिंदुराव यांनी केलाय.

 

 

 

 

प्रफुल केदारे

सहसंपादक, मीडिया भारत न्यूज

kedarepraful@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!