सरकारी शाळा, मातृभाषेतून शिक्षण ते अंतराळ संशोधन संस्था

सरकारी शाळा, मातृभाषेतून शिक्षण ते अंतराळ संशोधन संस्था

सरकारी शाळा, मातृभाषेतून शिक्षण ते अंतराळ संशोधन संस्था

आपल्या मातृभाषा तामीळ भाषेतून सरकारी शाळेत शिकलेल्या गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा, ज्याचं बालपण जवळजवळ अनवाणीच गेलंय. धोतीतच वावरणाऱ्या त्या जिद्दी मुलाने पदव्युत्तर शिक्षण सुरू झाल्यावर पहिल्यांदा पॅन्ट घातली. जिद्दीने शिकत गेला आणि आज तो भारताचा राॅकेट मॅन म्हणून ओळखला जातो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख कैलासावडिवु सिवन यांचा तामीळनाडूतील खेड्यातून सुरू झालेला प्रवास आज अंतराळात पृथ्वीचा उपग्रह चंद्राला गवसणी घालतो आहे.

कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबातील हा मुलगा. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे भाऊबहीण खूप शिकू शकले नाहीत, जेमतेम उच्च माध्यमिक शिक्षण ; पण शिक्षणाची आंतरिक ओढ के सिवन यांना आयुष्यात मानसन्मानाच्या उंचीवर घेऊन गेली.

सिवन यांचं पाचवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच सरकारी शाळेत झालं. दहावीपर्यंत पुढचं शिक्षण वलानकुमाराविलाई गावात झालं. गावात बसची सोय नव्हती. चालतच जावं लागे. खाजगी शिकवणी नव्हती. पण सिवन यांचा पिंडच बुध्दिमान विद्यार्थ्याचा होता. शालेय जीवनात त्यांनी कायम पहिला क्रमांक लागला. नागरकाॅईल येथील एसटी हिंदू काॅलेजात सिवन यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. सिवन कुटुंबातलीच नव्हे तर गावातलीही ती पहिली पदवी होती. वडिलांसोबत ते त्यांना शेतीत मदत करत. शेतीकाम करता करताच सिवन आपलं शिक्षण घेत होते. गणित विषय घेऊन बीएससी पूर्ण केलं. चार विषयांत त्यांना १०० टक्के गुण होते. त्यांच्या वडिलांनी पुढे अजून शिकवायचा निर्णय घेतला. सिवन यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांना शेत जमिनीचा तुकडा विकण्याची वेळ आली. खरं तर ती शेतजमीनच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार होती. पण सिवन यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी जमीनीचा काही भाग विकला होता.

मद्रास इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजीमधून एराॅनाॅटिकल इंजिनियरिंग केल्यावर पुढे आयआयएससीमधून अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. मिसाइल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्या मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेचे माजी विद्यार्थी होते त्याच संस्थेत सिवन शिकले. कलाम हे चौथ्या बॅचचे विद्यार्थी होते तर सिवन हे २९ व्या बॅचचे विद्यार्थी होते. म्हणजेच कलाम यांच्यानंतर बरोबरच २५ वर्षांनी तेच विषय घेऊन सिवन यांनी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला होता. आयआयटी मुंबईतून एरोस्पेस इंजिनियरिंग वर सिवन यांची पीएचडी आहे. सत्यभामा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, विक्रम साराभाई पुरस्कार, बिरेन रॉय अवकाश विज्ञान पुरस्कार असे अनेक मानसन्मान सिवन यांना मिळाले आहेत.

१९८२ ला सिवन यांचा इस्रोत प्रवेश झाला. इस्रोचे राॅकेटमॅन म्हणून ते ओळखले जातात.‌क्रायोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, आरएलव्ही विकसित करण्यात सिवन यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. या कार्यात सिवन यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही सी-३७ या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे जगातील अनेक देशांचे लक्ष लागले होते. अखेर आपल्या लौकिकाला जागत इस्रोने ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी करून दाखविली. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ प्रक्षेपक सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी आकाशात झेपावला. उड्डाणापासून ते अंतराळाच्या कक्षेत उपग्रह वेगळे होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात आखल्याप्रमाणे सर्वकाही व्यवस्थित पार पडले आणि इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते. २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवन यांच्या हाती देण्यात आली. चंद्रयानचे यशस्वी प्रक्षेपण झाले त्यावेळी ‘भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे’ अशा शब्दांमध्ये के. सिवन यांनी या मोहिमेचे वर्णन केले होते. ‘मागील सात दिवसांपासून आम्ही घरदार विसरुन या मोहिमेच्या कामात लागलो होतो, त्यामुळे ही मोहिम यशस्वी झाल्याचा विशेष आनंद आहे,’ असं सिवन यावेळी म्हणाले होते. तसेच ‘ऐतिहासिक प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे. अज्ञात असलेल्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. आपले कार्य संपलेले नाही. आता आपण पुढच्या मोहिमेवर काम सुरु करणार आहोत. यावर्षी अनेक मोहिमा आहेत. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या सर्वांना माझा सलाम’, अशा शब्दांमध्ये सिवन यांनी आपला आनंद व्यक्त केला होता.

के सिवन यांच्यावर धार्मिक संस्कार आहेत. कामाच्या व्यापात त्यांचं गावी घरी जाणं क्वचित होतं, पण एप्रिल-मे महिन्यात गावातील भद्रकाली अम्मा पुजेसाठी ते दरवर्षी नियमित येतात. के सिवन यांनी चांद्रयान मोहिमेला सुरूवात करण्यापूर्वी तामीळनाडूतील उडिपी येथील श्रीकृष्ण मठातील विद्याधीश तीर्थ यांचे आशीर्वाद घेतले होते. मात्र, एखाद्या संशोधकाने आपल्या वैज्ञानिक मोहिमा सफल करण्यासाठी पुजापाठ, साकडं, साधूंचे आशीर्वाद यांचा आधार घ्यावा का, यावरून देशात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चांद्रयान मोहिमेच्या अपयशाचं खापर कोणावर फोडायचं, सरकारवर, संशोधकांवर की पुजापाठावर असा प्रश्न आता विचारला जात आहे.

चांद्रयान2 मोहिमेच्या विक्रम लँडरसोबत संपर्क तुटल्यानंतर ‘इस्रो’तील सर्वच शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला होता. इतक्या वर्षांची मेहनत आणि स्वप्न चंद्राच्या उंबरठ्यापाशी पोहचून धूसर झाल्याने सिवन यांनाही गहिवरुन आलं. सिवन यांना अनावर झालेला हा हुंदका त्यांच्या सच्चेपणाची साक्ष देतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सिवन यांना तामीळी शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड आहे. बागकामात रमणारा त्यांचा स्वभाव आहे. निसर्गाशी एकरूप होणारा त्यांचा हाच संवेदनशील चेहरा चांद्रयान मोहिमेच्या थोडक्यात हुकलेल्या यशानंतर भावुक झालेला देशाने पाहिला.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!