गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले…!!!

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले…!!!

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले…!!!

ठाण्यात राम मारुती रोडवर एक देवा नावाचं कपड्यांचं मोठं शोरूम आहे. दोन सख्खे भाऊ ते चालवतात; पण दोघेही भाऊ इतके कार्यरत आहेत की ते मालक आहेत हे कुणाला कळणारही नाही.‌ स्वतः ग्राहकांच्या कपड्यांचे अल्टरचे माप घेतात तसंच गिर्‍हाईकांना काहीच त्रास होऊ नये म्हणून दोघेही काळजी घेतात . गंजायचं नसेल तर स्वतःची झीज करून घ्या, असंच या दोघांकडे बघितल्यावर वाटतं.

त्यांच्या वागण्याबोलण्यात मालकी थाट नाही. मिजासही नाही. त्यांची सततची कामाची घडपड झिजणं सांगते. कसे गंजतील ते?

किती खरं आहे ना हे ! गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले. वस्तू पडून राहिली किती गंजतेच. ती निरुपयोगी होते. वस्तू जर सतत कामात, वापरात राहिली तर तिची झीज होते. झीज होऊनही तिचा वापर केला जातो. एखादी वस्तू गंजून गेली की ती कामाची राहत नाही.

तळपत्या तलवारीच्या तेजापुढे गंजलेली तलवार निस्तेज आहे. आळशी माणसं गंजलेल्या वस्तुप्रमाणेच. थोडीही झीज घेणार नाहीत. यांचा बोजा घराला कायम वाहावा लागतो.

कामाच्या वस्तू कितीही जुन्या झाल्या तरी त्यांची काळजी घेतली जाते. कारण त्या वापरल्या जातात. गंजलेल्या वस्तू मात्र एखाद्या कोनाड्यात किंवा पोटमाळ्यावर पडून राहतात. बिनकामाच्या ! त्याच्याकडे कोणीही पाहत नाहीत. बऱ्याचदा त्या विस्मरणातही जातात. त्यांची काळजी घेतली जात नाही. उलट त्या टाकून देण्याचाच विचार जास्त केला जातो. कामाच्या माणसांकडूनच अपेक्षा केल्या जातात. ही माणसं कायम कामात राम शोधतात.

आजारी व वयस्कर मंडळींना गंजण्याचा नियम लागू होत नाही. ती आयुष्यात कधी ना कधी खूप झिजलेली असतात. अशांचा उबग येऊ देऊ नये. त्यांना जपलं पाहिजे.

एक गोष्ट लक्षात घ्या -

स्वतः शिकार करून पोट भरणारे प्राणी... काबाड कष्ट करणारे प्राणी झिजतातच. त्यांचा डामडौल काही औरच असतो. ते विचारही करत नसावेत आयतं मिळवण्याचा. स्वतः अंगमेहनत करून खाद्य मिळवणं , स्वतः कष्ट करणं , त्यातून मिळणारा जो काही आनंद असतो, तो खरंच वाखाणण्याजोगा असतो .

काही माणसं स्वतः एका जागेवर बसून फक्त दुस-यास सल्ला देण्याचं काम इनामेइतबारे करतात. त्यांना खरंतर गंज चढलेला असतो . अंगमेहनतच करत नाहीत. कायम रेललेली. आळशीपणाचा कळस असतात अशी माणसं .

काहीजण मात्र जेवढे दुसऱ्यास काम सांगतात तेवढेच काम स्वतःही करतात. भले मग ते मोठ्या मोठ्या शोरूमचे मालक का असेनात . मोठे मोठे बिझनेसमनसुद्धा स्वतः अंगमेहनत करून स्वतःच्या कामातून दुसऱ्यास कामाचे सल्ले देतात. अशांची खरी प्रसन्न व्यक्तिमत्त्व असतात .

मालकच स्वतः इतकी मेहनत घेत आहे असं म्हटल्यावर , त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक सुद्धा मोठ्या उत्साहाने काम करतात. अशांना कधीच गंज चढत नाही. त्यांची झीज होईल पण तजेला कायम राहील.

झीज होणे म्हणजे काय ? तर त्या - त्या कामात प्राविण्य मिळवण्याचं कार्य आणि गंज म्हणजेच निष्क्रियता ! एकही काम धड न करता येणे...!

चंदनासारख्या झिजणाऱ्या देहाचा सुगंध कर्तृत्वाने दरवळतोच ! आता आपणच ठरवायचं झिजायचं की गंजायचं.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!