एकलव्यांच्या परिश्रमाचे, चिकाटीचे कौतुक तसेच वंचितांचा रंगमंचाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव यातून समता प्रसारक संस्था गेली अनेक वर्ष गरीब वस्तीतील मुलांचा गौरव करून त्यांना त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत योग्य मार्गदर्शन करण्याचे महत्वाचे काम करत आहे, असं प्रतिपादन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात केलं. समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी होत्या.
एकलव्य गौरव कार्यक्रमाच्या या तिसाव्या वर्षी ठाणे आणि कळवा शहरातील ठाणे महानगर पालिकेच्या सर्व माध्यमिक शाळा, कळवा रात्र शाळा, बीजे हाय स्कूल अशा सर्व शाळेतील मिळून ४०० च्या वर मुलांचा गौरव पत्र आणि रोख रक्कम बक्षीस देवून सन्मान करण्यात आला.
स्वत: चाळीत राहून आर्थिक दृष्ट्या खडतर आयुष्य जगताना काम करत मुनिसिपल शाळेतून शिक्षण घेत केईएम सारख्या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेतून डॉक्टर आणि एमडी झाल्यावर एमपीएससी परीक्षा उत्तम रित्या पास होऊन मुंबईचे उप जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत डॉ. श्याम घोलप कार्यक्रमात मुलांशी संवाद साधताना म्हणाले की

तुम्हाला आयुष्यात जे जे काही हवं आहे असं वाटते ते तुम्ही तुमचे लक्ष्य ठरवा, त्यासाठी प्रशिक्षण मिळवा आणि तुम्हाला खरंच जर स्वत:च्या उन्नतीबरोबर समजाची आणि देशाचीही उन्नती साधायची असेल तर उद्योजक व्हा. कुठल्या तरी आड मार्गाने कर न देता पैसा कमवायच्या भानगडीत पडू नका. आजूबाजूच्या परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण करून जाणवलेल्या प्रॉब्लेम्स साठी समाधान शोधा आणि त्यातूनच तुमचा उद्योग उभारा, मग बघा तुम्हाला पैशाच्या समृद्धिबरोबर मनाचं समाधानही लाभेल.
म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात त्यांना ज्या सामाजिक अस्पृश्यतेला तोंड द्यावं लागलं, ज्या अमानुष विषमतेला सामोरं जावं लागलं त्या मानाने आजचा काळ हा सुवर्ण काळ आहे असंच म्हणायला हवं. आज संविधानाने दिलेल्या कायद्याने आणि त्यानुसार आखलेल्या योजननांचा फायदा घेऊन आणि तुमच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही जे ठरवाल ते करू शकाल अशी स्थिति आहे, फक्त तुमच्या ठाम इच्छा शक्तीची गरज आहे, असंही प्रतिपादन डॉ. घोलप यांनी केलं.

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असतांनाही शहरांच्या परिघावरील गरीब वस्त्यांच्या संख्येत वाढ होत आहे आणि त्यांना भेडसावणार्या समस्या कसोटी पाहणार्या आहेत, असं म्हणत कार्यक्रमाच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांनी अशा वस्त्यांतून रहात असतानाही जिद्दीने अभ्यास करणार्या सर्व एकलव्यांचे अभिनंदन करून त्यांना संस्थेच्या नेहमी होणार्या विविध उपक्रमात उत्साहाने भाग घेण्याचे आवाहन केले.
वंचितांच्या रंगमंचावर चमकून ‘आरण्यक’ या व्यावसायिक नाटकात अभिनय करणारे संजय निवंगुणे आणि राष्ट्रीय स्तरावर मल्लखांबमध्ये पुरस्कार मिळवणारे किशोर म्हात्रे यांनी आपली मनोगते मांडली.
कार्यक्रमाचे संयोजक एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगताप यांनी प्रस्तावना केली. अक्षता दंडवते आणि स्मिता मोरे यांनी सूत्र संचालन केले. पाहुण्यांची ओळख संस्थेच्या उपाध्यक्ष लतिका सु. मो. यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले.

या कार्यक्रमाला समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ, जगदीश खैरालिया, बिरपाल भाल, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राबोडी फ्रेंड्स सर्कल चे मतीन शेख, सुनील पोटे, सुरेखा आणि शिवाजी पवार, माध्यमिक शाळा निरीक्षक बाविस्कर सर, बालकुम महानगर पालिका शाळेचे क्षीरसागर सर, किसान नगर शाळेच्या पुष्पा पालकर मॅडम, संजय पाटणकर, हर्षदा बोरकर, शैलेश मोहिले, वृशाली नानिवडेकर, डॉ. नरेंद्र जावळे आदि मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, अजय भोसले आणि एकलव्य कार्यकर्ते नीलेश दांत, राहुल सोनार, इनोक, दर्शन पडवळ, निशांत पांडे , प्राची डांगे, सई मोहिते आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.