मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. "याचीसाठी केला होता अट्टाहास " म्हणत एकमेकांना लाडू चारताना त्यांचे फोटो सोशल मीडियावर झळकले आणि सत्ता स्थापनेचा दुसरा अंक सुरू झाला.
फडणवीस समर्थक आणि फडणवीसधार्जिण्या मीडियाने रंगवलेले त्यांचे चाणक्यच मुख्यमंत्री होणार यावर त्यांच्या पाणी फिरले. पक्षाच्या आदेशानुसार फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
हेच जर फडणवीस यांनी अडीच वर्षापूर्वी केले असते तर त्यांनी राजकीय नाट्याचा जो पहिला अंक घडवून आणला होता त्यासाठी त्यांची दमछाक झाली नसती.

शिवसेना बंडखोरांचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आणि त्यांच्यात सामील होणाऱ्या टोळीने सुरत मार्गे गुवाहाटी गाठली. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निकालानंतर ह्या राजकीय नाट्याला सुरूवात झाली हे चित्र दिसत असले तरी याची स्क्रिप्ट आधीच दोन वर्षांपासून लिहिलेली असणार यात नक्कीच तथ्य आहे.
शिवसेना बंडखोरांचे प्रमुख एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंडखोरी केली असे सांगत होते. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचे हिंदुत्व नाही असं त्याचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे बरोबर बंडखोरी केली.
बाळासाहेब ठाकरेंचे हे हिंदुत्व नाही असं म्हणत आहेत मग बाळासाहेबांच्या नंतर इतके वर्ष ते शिवसेनेत काय करत होते? हा प्रश्न येतो . एवढा हिंदुत्वाचा पुळका होता तर तेव्हाच बंड करायचे होते. तेव्हा त्यात सत्तेचे वाटेकरी झालात.
२०१४ ला भाजपा बरोबर सत्तेत होतात त्यावेळी भाजपा दुजाभाव करते म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार झालात. तेव्हा तर भाजपाबरोबर होतात. तेव्हा कुठं गेले होते तुमचे हिंदुत्व? आणि आता ही महाविकास आघाडी बरोबर अडीच वर्षे सत्तेत वाटेकरी होता. मग तुमचे हिंदुत्व सोयीचे आहे का ?
बंडात सामील झालेले राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत गेलेले दिपक केसरकर ,उदय सामंत यांनी दिलेली बंडाची कारणं तकलादू दिसत होती. किंबहुना ते शरद पवार यांनी शिवसेना संपवली अशी भाजपाची भाषा बोलत होते. अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व हे कळायला मार्ग नव्हता.

शिवसेनेला भाजपने दिलेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही म्हणून सर्वांच्या सहमतीने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर शिवसेनेने २०१९ मध्ये आघाडी केली. ज्या हिंदुत्वाच्या मुद्दावर एकनाथ शिंदे व बंडखोर भाजपच्या हिंदुत्वाचे गोडवे गात आहेत तेच गेल्यावेळी भाजपच्या सत्तेतून बाहेर पडण्यासाठी राजीनाम्याची भाषा करत होतो. एकनाथ शिंदे गटाचे हे हिंदुत्व न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता खुळी नाही.
२०१४ मधील भाजपाच्या नकली युतीला कंटाळून सर्वसहमतीने शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आघाडी केली असताना अनैसर्गिक आघाडी म्हणून बोटं मोडण्याची खरं तर कुणालाच गरज नव्हती. देशातला हा पहिला प्रयोग सर्व पक्षांच्या संमतीने केला गेला होता आणि तो यशस्वीही झाला होता.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना कुठल्याही तपास यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला नव्हता. ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांना गुलाम करून विरोधातील कुणालाही धाक दाखवला नव्हता. घोडेबाजार हे शब्द ही महाविकास आघाडीच्या जवळपास फिरकलेही नव्हते. ही खऱ्या अर्थाने नैसर्गिक युती होती.
पण सत्तापिपासू वृत्तींना येनकेन प्रकारे ही सत्ता घालवायची होती. त्यासाठी ते कोणताही विधिनिषेध न ठेवता जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होते हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे.

सरकारमध्ये निधी कमी मिळाला हेही एक पोकळ कारण बंडखोर आमदार पुढे करत आहेत. त्याला शेंडा बुडका नाही आणि आकडेवारीही नाही. गेल्यावेळी भाजपमध्ये सत्तेत असताना जी गळचेपी भाजपने केली होती .त्याच्या कितीतरी पट निधी उध्दव ठाकरे सरकारने यांना दिला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने अर्थव्यवस्था ढासळली असताना ही भरघोस निधी देण्यात आला आहे याची आकडेवारी ही ठाकरे सरकारने जाहीर केली.
मग ज्यांनी राजकारणात मोठं केले त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचे ते गोडवे गात त्यांच्याच पुत्राला अपमानितरित्या सत्तेवरून पायउतार करायला हे बंडखोर का धजले असावेत ?
शिवसेनेचा मुख्यमंत्री पायउतार होत असताना आम्ही शिवसेनेत आहोत म्हणत हे शिवसेनेचे बंडखोर कोणता आसुरी आनंद घेत असतील ?
महाराष्ट्राच्या राजकीय पटलाला बंड नवीन नाहीत. याआधीही अशी राजकीय बंडं झाली आहेत. परंतु ह्या बंडाला ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगसारख्या केंद्र सरकारच्या हातातील बाहुले झालेल्या यंत्रणेचा वास येत आहे.
सुरत ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते गोवा आणि मुंबई हा चार्टर्ड विमानातूनचा खर्च, पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्च याला जनतेच्या पैशावर केलेल्या आय्याशीचा वास येत आहे. आसाममध्ये पूर परिस्थिती असताना तिथली माणसं मरत असताना आसाम सरकार बंडखोरांची जी बडदास्त ठेवत होते त्याला संवेदनशीलता मेल्याचा वास येत आहे. महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने फक्त 11.9 टक्के पेरणी झाली आहे त्यांना वाऱ्यावर सोडून काय झाडी, काय डोंगर, काय हाटील म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधिंच्या बेताल वक्तव्याचा वास आहे. महाराष्ट्र मोदी सरकारच्या कृपेने महागाईत होरपळत असताना, लाखो तरुण बेरोजगार असताना एकनाथ शिंदे जिला महाशक्ती म्हणतात त्या भाजपच्या कुटील कारस्थानाचा येत वास आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळलं म्हणून एकमेकांना लाडू चारणाऱ्या भाजपला ते लाडू किती कोटी रुपयांना पडले ? आणि जनतेच्या पैशाचा, स्वप्नाचा का चुराडा केला ? हे प्रश्न भाजपाला जनता विचारत आहे.
भाजप व भक्तगणांना असं वाटत असेल की त्यांनी डाव जिंकला पण केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्रसरकार, भाजप प्रणित राज्यसरकार ,गोदी मीडिया, राज्यपाल, न्यायालय यांना हाताशी धरून जिकलेला हा डाव रडीचा डाव आहे त्याला आपण हवं तर ईडीचा डाव म्हणूया...
तुमच्या जिंकण्यापेक्षा अत्यन्त सुसंस्कृत संयमी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्याची जास्त चर्चा महाराष्ट्रात आहे. त्यांची खुर्ची बळकवणाऱ्यांना सत्ता लाभणार नाही असा त्यांनी भवताल निर्माण केला आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने र(ई)डीने डाव जिंकला आहे. गोदी मीडिया काहीही सांगत असली तरी ह्या देशाची जनता सत्य जाणते म्हणूनच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या फडणवीसांना आदेश दयावा लागला, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा.
आता ह्या राजकीय नाट्याचा तिसऱ्या अंकात लोकशाही मूल्य आणि राज्यघटनेची मोडतोड नाही केली तर आणखी वेगळे चित्र समोर येईल.
प्रा. कविता म्हेत्रे
अध्यक्ष : राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्र