हा केवळ स्त्रियांचा उत्सव नाही; पुरुषांनीही जोतिबा होण्याची गरज !! डॉ. मंजिरी मणेरीकर यांचं मनोगत

हा केवळ स्त्रियांचा उत्सव नाही; पुरुषांनीही जोतिबा होण्याची गरज !! डॉ. मंजिरी मणेरीकर यांचं मनोगत

हा केवळ स्त्रियांचा उत्सव नाही; पुरुषांनीही जोतिबा होण्याची गरज !! डॉ. मंजिरी मणेरीकर यांचं मनोगत

सावित्रीबाई फुले ह्यांच्याबद्दल शाळेत गेल्यावर वाचले. स्त्रीशिक्षणासाठी पतीला सहकार्य करण्यासाठी त्यांना सासरचे घर सोडावे लागले. लोकांकडून खूप त्रास सहन करावा लागला. मात्र मी जन्माला आले, तोपर्यंत सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमांमुळे मुलींचे शिक्षण ही सहज गोष्ट झाली होती. त्यामुळे माझ्यासाठी सावित्रीबाई म्हणजे माझी आईच.

तिच्यासाठी शिक्षण हेच सर्वस्व होते. तू अभ्यास कर हे एकच वाक्य ती बोलायची. मला घरकाम, शिवण, विणकाम, भरतकाम ह्याची खूप आवड पण ते सगळे सोडून ती मला अभ्यासाला बसवायची. मी आणि माझा भाऊ ह्यांच्यात कुठलाही भेदभाव तिने केला नाही. ती त्या काळात BA पर्यंत शिकली होती. आई शिकलेली असणे ही किती मोठी गोष्ट आहे हे मला लग्नानंतर समजले.

नवऱ्याची जातच काय पण पोटजात सुद्धा सारखी असूनही सासू शाळेतही न गेलेली असल्यामुळे दोन घरांतील वातावरणात जमीन अस्मानाचा फरक होता.

त्यातून मला मुलगा झाल्यानंतर मी MD करायला सुरुवात केली. घरून थोडेही सहकार्य न मिळाल्यामुळे मी अनेकदा फेल झाले. तरीही केवळ माझ्या आईमुळे मी MD ची डिग्री मिळवली, म्हणूनच ज्योतिबाचा शोध म्हटल्यावर माझा नवरा हा माझ्या अपयशाचे कारण असल्याने मी आधी ह्या विषयावर लिहिणार नव्हते. पण त्यातच पुढे लिहिलेले वाचून लक्षात आले की अनेक ज्योतिबा माझ्या आयुष्यात आले आहेत.

त्यातील पहिले म्हणजे माझे आजोबा. खरे तर ते मी साडेतीन वर्षांची असतानाच वारले. पण त्याआधी त्यांनी मला देवनागरी आणि रोमन दोन्ही लिपीतली अक्षरे लिहायला आणि वाचायला शिकवली होती. दुसरे ज्योतिबा म्हणजे माझे वडील.
मला 5 वर्षांची असतानाच जाड भिंगाचा चष्मा लागला. बाबा मला घेऊन अनेक डॉक्टरांकडे गेले. माझे डोळे सुधारावेत म्हणून जे जे करता येईल ते त्यांनी केले. वाचनाची आवड त्यांनी 15 रुपयांत 50 पुस्तके, साने गुरुजींच्या गोड गोष्टींची पुस्तके घेऊन लावली.

मी वर्गात नेहमी पहिली यायचे. पण ते परीक्षेच्या आधी अभ्यास घेताना असा प्रश्न विचारायचे ज्याचे उत्तर मला यायचे नाही. मग म्हणायचे वाच पुन्हा. काही अभ्यास नाही झालाय. त्यांच्यामुळे मला सगळी पुस्तके पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत वाचायची सवय लागली.

ज्ञान हे दिल्याने वाढते म्हणून नेहमी शेजारच्या मुलांना, भावाला शिकवायला लावायचे. त्यांनी आम्हाला पोहायला शिकवले, सायकल शिकवली. सगळीकडे एकटे जाण्याची सवय लावली. इतकंच काय पेपरला पंचिंग मशीन ने पंच करून तो फाईल मध्ये कसा लावायचा हेही शिकवले.

पाचवीत असल्यापासून माझे बँकेत खाते उघडले. मिळालेले बक्षिसांचे पैसे त्यात साठवण्याची सवय लावली. त्यांना खूप मित्र होते. सर्वांशी मैत्री कशी करावी हेही त्यांनीच शिकवले.

शाळेतले नाना परब सर, मराठे सर, दाभोळकर सर हेही माझ्यासाठी ज्योतिबाच होते. ज्यांच्यामुळे मी मेडिकल ला गेले ते रेगे सर आणि पै सर हेही ज्योतिबाच होते. ह्या सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून यश मिळवण्याचे महत्व ठसवले. त्यामुळे नंतर अपयश आल्यावर सुद्धा मी चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.

लग्नानंतर मात्र वडील बराच काळ जावयाच्या बाजूने राहिले. त्यामुळे मला खूप त्रास झाला. तरीही मी घर सोडून घटस्फोट मिळवल्यावर त्यांना आपली चूक कळली आणि नंतर पुन्हा त्यांनी मला मदत केली. तोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभी राहिली होते. त्यामुळे फारशी मदत लागली नाही.

ह्या काळातही काही नातेवाईक ज्योतिबा माझ्या पाठीशी उभे राहिले. तर हे माझ्या आयुष्यातील ज्योतिबा! आज त्यांनी दाखवलेल्या सत्य, प्रामाणिक प्रयत्न आणि आत्मविश्वासाने संकटांना तोंड देणे ह्या मार्गाने मी आयुष्याचे मार्गक्रमण करत आहे. त्या सर्वांना नमन !!

 

 

 

डाॅ. मंजिरी मणेरीकर

 नामवंत पॅथाॅलाॅजिस्ट | नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे पॅथाॅलाॅजिस्ट व टीएन मेडिकल कॉलेज व नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून कामाचा अनुभव.


 

 


डॉ. मंजिरी मणेरीकर यांचं मनोगत इथे ऐका :

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!