धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून गच्छंती अटळ ! बलात्काराच्या आरोपानंतरच्या खुलाश्याने मुंडेंचं राजकारण अधिक अडचणीत !

धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून गच्छंती अटळ ! बलात्काराच्या आरोपानंतरच्या खुलाश्याने मुंडेंचं राजकारण अधिक अडचणीत !

धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून गच्छंती अटळ ! बलात्काराच्या आरोपानंतरच्या खुलाश्याने मुंडेंचं राजकारण अधिक अडचणीत !

गायिका रेणू शर्मा यांनी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलाय. रेणू शर्मा ह्या मुंडे यांची दुसरी पत्नी करूणा शर्मा यांच्या बहीण आहेत. रेणू यांच्या आरोपानंतर मुंडे यांनी स्वत:च करूणांसोबतच्या नात्याची कबुली दिलीय. करूणा यांच्यापासून दोन मुलंही असल्याचा व त्यांना आपण पालक म्हणून आपलं नाव दिल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय. करूणा, रेणू आणि त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा मिळून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा मुंडे यांचा आरोप आहे. करूणा यांच्याशी असलेला वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचंही मुंडे यांनी मांडलं आहे.

मात्र, मुंडे यांचा खुलासा त्यांच्या वैयक्तिक पातळीवर त्यांचा बचाव करणारा असला तरी महाविकास आघाडी सरकारची मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंधांवर राज्यातील जनतेसमोर सारवासारव करताना दमछाक होणार आहे. अशा स्थितीत धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून गच्छंती अटळ दिसत आहे.

रेणू शर्मा यांनी एक ट्वीट करून बलात्काराच्या घटनेचा गौप्यस्फोट केलाय. करूणा शर्मा घरी नसताना धनंजय मुंडे यांनी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले, त्याचं चित्रण केलं आणि त्यानंतर वारंवार दबावाने शोषण केलं, असा रेणू शर्मा यांचा आरोप आहे. आपल्याकडे मुंडे यांच्या संवादसंदेशांचे पुरावे असल्याचं रेणू यांचं म्हणणं आहे.

पोलिसांनी आपली तक्रार नोंदवून घ्यायलाही नकार दिला, अशी तक्रार त्यांनी केलीय. रेणू यांनी ट्वीट करताना मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं असून, त्यावरून या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होतेय.

https://twitter.com/renusharma018/status/1348680895046197249?s=19

धनंजय मुंडे यांनीही रेणू शर्मा आणि त्यांचे भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्यावर दबाव, धमकावणी व खंडणीचे आरोप केलेत.

कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केलाय.

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असं मुंडे यांनी म्हटलंय.

सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत, असा दावा मुंडे करतात.

काय म्हटलंय मुंडे यांनी आपल्या खुलाश्यात, पाहुया :

मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता, असा आरोप करून, या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आल्याची माहिती मुंडे यांनी दिलीय.

नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी मा. उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी मा. उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी मा. उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.

तथापि कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, व श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.

माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएस रुपी पुरावे आहेत, तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो.

मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल तथापि माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी कारण सदर प्रकरणी श्रीमती करूणाशर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे.

हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.

धनंजय मुंडे यांनी हा खुलासा केलेला असला तरी त्यांनी करूणा शर्मा यांचा, मुलांचा व करूणा यांच्या नावे असलेल्या केडीएम ट्रेक्सिम प्राईव्हेट लिमिटेड या २०१४ पासून अस्तित्वात असलेल्या कंपनीचा, सदनिकांसह इतर मालमत्तांचा आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला होता का, यासारख्या अनेक नव्याने उद्भवणाऱ्या प्रश्नांचाही सामना करावा लागणार आहे.

महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सद्या भाजपा आणि त्या पक्षाशी बांधील माध्यमं सोडत नाहीयेत. त्यात सरकारातील एक मंत्र्यावर बलात्काराचा आरोप झाल्यावर आता येणारा काळ सरकारसाठी सुकर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदर प्रकरण अंगावर घेतील का, या प्रकरणात शरद पवार यांची भूमिका काय असेल, यावर पुढच्या हालचाली अवलंबून आहेत. मात्र, रेणू शर्मा यांच्या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रीमंडळातून बाजूला सारण्यावाचून अन्य नजिकचा पर्याय महाविकास आघाडीकडे नाही.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!