कधीतरी स्वतःला भेटून बघा. किती राहिलंय जगायचं ते कळेल. कितीतरी गोष्टी हातातून निसटल्या. कधी कधी तर त्या इतक्या नामानिराळ्या झाल्या, की हे आपल्याला कधीतरी हवं होतं हेच आपण विसरून गेलो. स्वतःसाठी काय करायचं राहून गेलंय हेही समजलं नाही ! काळाच्या ओघात वाहत गेलो पण मागे काय राहून गेलंय हे बघितलंच नाही. मी कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाही प्रयत्न केला नाही.
"ये आई जरा इकडे ये ना". "कधीची बोलावतेय तुला". "पण तुझं आपलं नेहमीचंच...थांब आले", "थोडंसंच काम आहे ते उरकून घेते". "हे काय गं नेहमी नेहमी तुझं ". "बघावं तेव्हा कामातच असतेस".

" हो गं आलेच". "नुस्ता गोंधळ घालतेस घरात". "थोडं थोडं उरकून घ्यावं म्हटलं तर तुझं आपलं लगेच बोलावंण". "बोल आता काय झालंय" ? आई आतून येता येता म्हणाली.
अगं आई "एक गम्मत दाखवते तुला".
तुझ्या मोबाईलवरून तुझाच नंबर डायल कर बघू. म्हणून आईने तिच्याच मोबाईलवरून तिचाच नंबर डायल केला. तो व्यस्त.
"अरेच्चा, व्यस्त"? मन मनाशीच पुटपुटलं. पुन्हा पुन्हा तोच चाळा करत बसली. पण छे, सारं व्यर्थच.
पुन्हा तेच, "इस नंबर की सभी लाईने व्यस्त".

सर्वांसाठी वेळ काढणारी ती जेव्हा तिने तिलाच भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र ती व्यस्त ! सगळ्यांशी भेटून झालं, बोलून झालं ; पण स्वतःशीच बोलायचं राहून गेलं. किती दुर्लक्ष आपणच आपल्याकडे केलं. क्षणभर याची खंत तिच्या मनाला स्पर्शून गेली.
असंच बर्याचदा बर्याच जणांचं होतं. सगळ्यांची विचारपूस करता करता स्वतः ची विचारपूस करायची राहून जाते. कधी विचारलंय कोणी स्वतःला कसं चाललंय सगळं? कशी आहेस तू ? खुपदा असं होत. जेव्हा आरशात उभं राहून स्वतःला हा प्रश्न आपण विचारतो, तेव्हा ह्याचं उत्तर आपल्याला सहज देता येत नाही.
का देता येत नाही या प्रश्नाचं उत्तर? इतका तर अवघड प्रश्न नाही हा... की याचं उत्तरच आपल्याला देता येऊ नये? का होत असं? की आपणच टाळतो आपल्याला? सामोरं जायला घाबरतो स्वतःला?

कधीतरी स्वतःला भेटून बघा. किती राहिलंय जगायचं ते कळेल. कितीतरी गोष्टी हातातून निसटल्या. कधी कधी तर त्या इतक्या नामानिराळ्या झाल्या, की हे आपल्याला कधीतरी हवं होतं हेच आपण विसरून गेलो. स्वतःसाठी काय करायचं राहून गेलंय हेही समजलं नाही ! काळाच्या ओघात वाहत गेलो पण मागे काय राहून गेलंय हे बघितलंच नाही. मी कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. नव्या पिढीकडून हे खूप छान शिकता येईल आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायला. स्वतःची एक नवीन ओळख स्वतःलाच करून घ्यायला.
आज स्वतःची ओळख स्वतःला नव्याने होताना खूप छान फील येतोय. आज नव्याने आपणच आपल्याला भेटलो, एका नव्या ढंगात, एका नव्या रंगात ! रंगहीन हे सारं वाटत असताना असं इंद्रधनुषी जगण्याची ओळख झाली..या इंद्रधनुष्यात आहेत भावनांचे अनेक रंग तरंग. प्रत्येक रंगाची एक वेगळीच मजा, मस्ती, एक वेगळेपण जगणारी स्वतःची संस्कृती. प्रत्येक रंगात न्हाऊन निघावं मनसोक्त आणि जगावं भरभरून.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com