दाभोळकरांना आरएसएसचा हस्तक ठरवणं चुकीचं !

दाभोळकरांना आरएसएसचा हस्तक ठरवणं चुकीचं !

दाभोळकरांना आरएसएसचा हस्तक ठरवणं चुकीचं !

प्रत्येकाचा समाज परिवर्तनाचा, प्रबोधनाचा मार्ग वेगवेगळा असू शकतो, सामाजिक राजकीय जीवनात जे अनुभव काम करत असताना येत असतात त्यानुसार काम करण्याचा मार्ग ठरतो, बऱ्याचवेळा सामाजिक राजकीय परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घेऊन व्यक्ती समाजात आपली काम करण्याची पद्धत ठरवत असते.

सद्यस्थितीत जात, धर्म,लिंग, देव, सण, उसत्व, परंपरा, चालीरीती हे बहुसंख्य जनतेसाठी सर्वात जवळचे घटक प्रिय आहेत, माणूस भावनिकदृष्ट्या या घटकांशी जोडलेला असतो, म्हणूनच या घटकांचा शिताफीने वापर करून निवडणुकीत सत्ता प्राप्तीचे प्रयत्न होतात, या मुद्द्यांचा आधार घेत दंगली पेटवल्या जातात, माणसं जीव द्यायला तयार होतात.

कर्मकांड, अनिष्ट रूढी, परंपरा, बुवा बाबा यामागे सर्व आर्थिक स्थरामधील जनतेचा वावर आहे. यामागे जशी आर्थिक सामाजिक कारण आहे तसेच भावनिक मानसिक कारणं देखील आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचे एकच एक सरळसोट उत्तर कोणीही देऊ शकत नाही.

जाहीरपणे धर्मग्रंथाची चिकित्सा करणं, धर्मग्रंथावर देवी देवतांवर जाहीरपणे ताशेरे ओढण याच गोष्टी केल्या पाहिजेत तरच समाज प्रबोधन होईल अशी ज्यांची भूमिका आहे, त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की या गोष्टीमुळे बऱ्याचवेळा तुमचे बहुसंख्य जनतेसोबत संवादाचे मार्ग संपतात.

आम्ही नास्तिक अशी भूमिका घेऊन जर तुम्ही एखादया देवभोळ्या माणसाच्या घरी गेलात आणि चर्चा करु लागतात तर चर्चाच करणं कठीण होऊन जातं. संवादच संपला तिथे प्रबोधन कसं होणार ? त्यामुळे बऱ्याचवेळा मध्यम मार्गाचा अवलंब करावा लागतो. ही प्रबोधनाची परंपरा अखंड चालणारी असते.

बदल एका दिवसात घडत नसतात. त्यामुळे मासेसमध्ये जाऊन धर्मग्रंथाची चिकित्सा करा तरच समाजप्रबोधन होईल अशी अनाठायी भूमिका घेणं चुकीचे आहे व त्यासाठी बाबासाहेबांचा संदर्भ देणं तर पूर्णतः चुकीचे आहे. काळानुसार कामाचे संदर्भ, पद्धती बदलत असतात.

डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या जातीव्यवस्थेबद्दल आकलनाला मर्यादा असतील त्या मर्यादेवर चर्चा होईल, टीकात्मक विवेचन होईल पण या मुद्द्यावरून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले काम पूर्णपणे खोडून काढणं, त्यांना उजव्या गटामध्ये बसवणं, त्यांना आर एस एस चा हस्तक म्हणणं आणि हे म्हणत असताना, ते ब्राह्मण आहेत म्हणून ते असे आहेत, हे वारंवार उद्धृत करणं पूर्णतः चुकीचे आहे.

प्रत्येकाच्या कामाला मर्यादा असतात, मर्यादा आहेत म्हणून त्यांना विरोधी गटात ढकलणं योग्य नाही. किमान परिवर्तनवादी विचारसरणीच्या लोकांनी तरी असं करू नये. त्यांनी फेसबुकवर असा आकांडतांडव करण्यापेक्षा फेसबुकबाहेर स्वतःच्या कामाची एक पद्धत विकसित करावी व यशस्वीपणे राबवून दाखवावी.

 

 

 

ॲड. भाग्येशा कुरणे

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकील

bhagyeshasnehal93@gmail.com / 9730197530

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!