जयंत नारळीकर : विज्ञानाची सुलभ मांडणी करणारा वैज्ञानिक !

जयंत नारळीकर : विज्ञानाची सुलभ मांडणी करणारा वैज्ञानिक !

जयंत नारळीकर : विज्ञानाची सुलभ मांडणी करणारा वैज्ञानिक !

जयंत नारळीकर ! अर्थात भारतीय खगोलीय भौतिकीविज्ञ व गणितज्ञ. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णु वासुदेव नारळीकर हे रँग्लर असून ते बनारस हिंदू विद्यापीठात व पुणे विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. १९५७ साली जयंत नारळीकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी मिळविली. १९५७ मध्ये त्यांना केंब्रिज येथील उच्च शिक्षणासाठी जे. एन्. टाटा शिष्यवृत्ती मिळाली.

ते केंब्रिज विद्यापीठातील गणितामधील ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले (१९५८–६०). १९५९ साली ते रँग्लर झाले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठामधून बी.ए. (१९६०), एम्.ए. (१९६४), पीएच्.डी. (१९६३) आणि डी.एस्‌सी. (१९७६) या पदव्या संपादन केल्या. १९६०-६१ मध्ये त्यांना डब्ल्यू. ए. मीक शिष्यवृत्ती मिळाली.

नारळीकर हे १९६३ पासून रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे आणि केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे फेलो आहेत. ते १९६२-६३ मध्ये फिट्झ विल्यम हाऊस, केंब्रिज येथे गणितीय अध्ययनाचे संचालक किंग्ज कॉलेज, केंब्रिज येथे बेरी–रॅम्से फेलो (१९६३–६९) आणि वरिष्ठ संशोधक फेलो (१९६९–७२) होते.

१९६७– ७२ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी या संस्थेच्या अध्यापन व संशोधन वर्गाचे सदस्य होते. १९७३–७५ या काळात ते जवाहरलाल नेहरू फेलो होते. १९७४ पासून ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत.

१९७६ साली ‘इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी’ने फेलोशिप देऊन त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव केला. ऑक्टोबर १९७२ पासून ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे खगोलीय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहेत.

फ्रेड हॉईल, एच्. बाँडी व टी. गोल्ड यांनी पूर्वी मांडलेल्या ⇨ विश्वोत्पत्तिशास्त्रातील स्थिर अवस्था उपपत्तीच्या संदर्भात नारळीकरांनी संशोधन केले. हॉईल व नारळीकर यांनी विश्वातील द्रव्याच्या निर्मितीसंबंधी गणितीय विवरण केलेले होते. याकरिता त्यांनी ऋणात्मक ऊर्जेची संकल्पना उपयोगात आणली.

गुरुत्वामुळे एखाद्या वस्तूच्या शीघ्रतेने होणाऱ्या आकुंचनाला ⇨ गुरुत्वीय अवपात म्हणतात. हॉईल व नारळीकर यांनी हा अवपात ऋणात्मक ऊर्जेची शक्ती वापरून थांबविता येतो असे दाखविले. तथापि गुरुत्वाकर्षणातील ऋणात्मक ऊर्जेला तोंड देणारी दुसरी ऋणात्मक शक्ती हॉईल–नारळीकर यांनी तर्क केल्याप्रमाणे विश्वात असेल काय, हा अद्यापि न सुटलेला प्रश्न आहे.

हॉईल व नारळीकर यांनी ११ जून १९६४ रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीपुढे गुरुत्वाकर्षणाचा एक नवा सिद्धांत मांडला. यात अर्न्स्ट माख यांच्या तत्त्वाला (कोणत्याही कणाची गती ही विश्वातील इतर द्रव्याच्या संदर्भात लक्षात घेतली तरच अर्थपूर्ण ठरते) गणितीय रूप देऊन आइन्स्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षणाशी त्याची सांगड घालून देण्यात आली.

जडत्व हा वस्तूचा मौलिक गुणधर्म नसून त्याचा विश्वरचनेशी संबंध आहे, असे या सिद्धांतात प्रतिपादन करण्यात आले.

नारळीकर आणि त्यांचे सहकारी के. एम्. व्ही. अप्पाराव यांनी विश्वामध्ये कृष्ण विवरांप्रमाणे श्वेत विवरे अस्तित्वात आहेत आणि प्रत्यक्षात ती विवरे नसून द्रव्य आणि ऊर्जा यांची उगमस्थाने आहेत, असे मत प्रतिपादन केले.

केंब्रिज विद्यापीठाने नारळीकर यांना ज्योतिषशास्त्रातील टायसन पदक (१९६०), स्मिथ पारितोषिक (१९६२) आणि ॲडम्स पारितोषिक (१९६७) देऊन त्यांचा सन्मान केला. १९६५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिला. १९७३ मध्ये मुंबई मधील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने त्यांना सुवर्ण महोत्सवी सुवर्ण पदक दिले.

नारळीकर यांनी आर्. जे. टेलर, डब्ल्यू. डेव्हिडसन आणि एम्. ए. रूडरमन यांच्या समवेत ॲस्ट्रोफिजिक्स (१९६९) आणि फ्रेड हॉईल यांच्या समवेत ॲक्शन ॲट ए डिस्टन्स इन फिजिक्स अँड कॉस्मॉलॉजी (१९७४) हे ग्रंथ लिहिले. तसेच स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स (१९७७). हा त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.

खगोलीय भौतिकी, गुरुत्वाकर्षण, विश्वोत्पत्तिशास्त्र इ. विषयांवरील त्यांचे ७० हून अधिक संशोधनात्मक निबंध आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. यांखेरीज त्यांनी काही विज्ञान कथा लिहिलेल्या असून वैज्ञानिक विषयांवर सुलभ भाषेत व्याख्याने देण्यासंबंधी त्यांची ख्याती आहे.

 

साभार : मराठी विश्वकोश

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!