जिजाबाई : धाडसी, दृढनिश्चयी स्वतंत्र वृत्तीच्या राजमाता !

जिजाबाई : धाडसी, दृढनिश्चयी स्वतंत्र वृत्तीच्या राजमाता !

जिजाबाई : धाडसी, दृढनिश्चयी स्वतंत्र वृत्तीच्या राजमाता !

महाराष्ट्राच्या इतिहासातील जिजाबाईंचे स्थान अनन्यसाधारण आहे; कारण त्या केवळ स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांच्या, रयतेच्या मातोश्री होत्या.

जिजाबाईंचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे, सुखवस्तू शूर जहागीरदारांचे होते. जिजाबाईंची जन्मतारीख व साल यांविषयीची निश्चित माहिती उपलब्ध नाही; तथापि परंपरेचा दाखला देऊन त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी झाला, असे काही इतिहासकार मानतात; पण तत्कालीन घटना-घडामोडी पाहता जिजाबाईंचा जन्म इ. स. १५९५ नंतर व १६०० पूर्वी केव्हातरी झाला असावा.

वडील लखूजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. त्यांच्या चाकरीत असलेले मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी यांच्याशी इ. स. १६०९-१० दरम्यान दौलताबाद किल्ल्यात जिजाबाईंचा विवाह झाला, असे शिवभारतकार सांगतो. त्या प्रसंगी मुर्थजा निजामशाह हजर होता. पुढे काही कारणाने भोसले व जाधव या घराण्यांत वैमनस्य आले.

जिजाबाई व शहाजीराजे यांचा मुक्काम सुरुवातीस काही वर्षे वेरूळातच होता. पुढे शहाजी आपला मोकासा (जहागिरी) सांभाळून निजामशाहीच्या नोकरीत रुजू आले. त्या वेळी जिजाबाईंची त्यांच्यासोबत भ्रमंती चालू होती.

जिजाबाईंना एकूण सहा मुले झाली. त्यांपैकी संभाजी व छत्रपती शिवाजी ही दोन मुले इतिहासात प्रसिद्ध असून वंशवर्धक ठरली. अन्य चार मुले अल्पायुषी ठरली. पुढे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी यांना अफजलखानाच्या कपटाने मृत्यू आला (१६५४).

जिजाबाई शहाजीराजांच्या पुण्याच्या जहागिरीत इ. स. १६३६ पूर्वीच रहावयास आल्या. पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबर रामायण, महाभारत, भागवत आदींतील कथा सांगितल्या. विशेषत: शांतिपर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यांतील कथा सांगितल्या.

जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली. पुण्यात लालमहाल प्रासाद बांधला, ओसाड जमीन लागवडीखाली आणली. त्यांनी कसबा पेठेतील गणपतीची पूजाअर्चा नियमित सुरू केली. इतर मंदिरांतूनही दिवाबत्तीची व्यवस्था केली; तसेच खेड-शिवापूर येथे एक वाडा बांधला. तेथे शहाबाग नावाची उत्तम बाग तयार केली. शहाजींच्या राजकारणाचे, धोरणांचे त्यांना ज्ञान होते.

पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले. याविषयींचे अनेकविध उल्लेख तत्कालीन पत्रव्यवहारांतून पहावयास मिळतात.

राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी येथील मार्तंडभैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला. त्याचा निवाडा जिजाबाईंनी केला होता. त्यावर ‘मातोश्री साहेबे (जिजाबाईंनी) जे आश्वासन दिले आहे, तसेच माझेही आश्वासन राहील’, असे दि. १३ जुलै १६५३ च्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात.

शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत. जिजाबाई महाराजांच्या राज्यकारभारात अखेरपर्यंत (१६७४) जातीने लक्ष घालीत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. राज्यकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत.

महाराज आग्राभेटीवर गेले असता त्यांनी सर्व कारभाराचा शिक्का जिजाबाईंच्या हाती सुपुर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवचन विश्वासू कारभाऱ्यांकडून घेतले होते. जिजाबाई स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी त्यांचे पाचाड (रायगड) येथे निधन झाले.

सौजन्य : मराठी विश्वकोश

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!