कन्यारास : बाईची नव्हें, बाई ‘माणसाची’ कविता !

कन्यारास : बाईची नव्हें, बाई ‘माणसाची’ कविता !

कन्यारास : बाईची नव्हें, बाई ‘माणसाची’ कविता !

‘कन्या रास’ हा अलका गांधी-असेरकर यांचा काव्याग्रह प्रकाशनने प्रकाशित केलेला काव्यसंग्रह नुकताच हातात पडला. फेसबुकच्या माध्यमांतून त्यांच्या अनेक सुट्या सुट्या कविता वाचनात आल्या होत्या. त्या वाचताना या कविता वेगळ्या म्हणजे स्वतंत्र बाण्याने लिहिलेल्या आहेत हे प्रकर्षाने जाणवत होते. संग्रहाच्या मनोगतात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय, की माझ्यावर कोणत्याही पूर्वसूरींचा ठसा नाही. कोणत्याच कवीचा किंवा कवितेचा प्रभाव नाही. जीवनानुभवाला दिलेलं ते एक शब्दरूप आहे.

तिची ही कबूली कुणाला आत्मप्रौढीची किंवा उद्धटपणाची वाटू शकते पण मला तिच्यातल्या स्पष्टवक्तेपणाची ती प्रामाणिक कबूली वाटते. पूर्वसूरींची कोणतीही सावली नसलेली, काव्यागत बंध-अनुबंधाशी फारकत घेणारी कविता त्या ज्या स्व-तंत्राने लिहितात त्या अर्थाने ती स्वतंत्र आहे. ‘अनौरस मूल’ या कवितेतून त्यांची ही भूमिका अधिक स्पष्ट होत जाताना दिसते.

‘कन्या रास’ काव्यसंग्रहाच्या शीर्षकातूनच एकंदर कवितेचा रोख आणि कल वाचकांच्या लक्षात येतो. कन्या राशीत जन्म घेणाऱ्या बाईला बाय डिफॉल्ट जे दुय्यमपण वाट्याला येते त्या अनुभवांना वाट करून देणारी ही कविता. त्यांची कविता स्त्रीयांबद्दल, त्यांच्या भावविश्वाबद्दल, तिच्या इच्छा-अपेक्षांबद्दल बोलत राहते. बाईच्या समृद्ध अवकाशाची मागणी करते, पण त्याही पलीकडे जाऊन तिच्या हाडामासाच्या शरीराबद्दल, निसर्गदत्त अशा खारीर भूकेबद्दल बोलते.

भूक मग ती कोणत्याही पातळीवरची असो, ती एक मानवीय गरज आहे, परंतु इथल्या समाजव्यवस्थेत स्त्रीच्या शारीर भूकेला अनुल्लेखाने मारलं गेलय किंवा त्या भूकेचं अस्तित्वच नाकारलंय. एवढंच नाही तर त्याचा उच्चार देखील गुन्हा ठरावा इतकं भय बाईच्या मनावर बिंबवलं आहे.

‘बायका’ या कवितेत त्या म्हणतात,

‘बायका चारचौघात खाजवत नाहीत,
बाया जात नाहीत बंगाली बाबाकडे
ऑरगॅझमच्या समस्या घेऊन
बायका शोधत नाहीत शिलाजित बिलाजित व्हायग्रा..

या कवितेतून ज्या मनुष्यप्राण्याच्या आदिम भूकेपासून बाईला अनेकदा वंचित राहावं लागतं तिच्या या हक्काबद्दल धीटाईने बोलतात तेव्हा त्यांची कविता स्त्री-पुरुष भेदापलिकडे जाऊन तिच्या माणूस असण्याचा, मानवी हक्काचा आग्रह धरताना दिसते. तेव्हा एकूणच कविता स्त्रीकेंद्री असली तरी स्त्रीवादापलिकडे जाऊन माणूसपणाच्या एका अटळ थांब्यावर नेऊन सोडते.

त्यांची कविता जितकी बाईची आहे त्याहीपेक्षा ती माणूसपणाची अधिक आहे.

सीमॉन-द-बोव्हा म्हणतात त्याप्रमाणे बाई जन्माला येत नाही, ती घडविली जाते. या बाईला घडविण्याच्या प्रक्रियेत समाजव्यवस्थेचा मोठा वाटा आहे. ही व्यवस्था पूर्णपणे पुरुषधार्जिणी आहे. ज्या पितृसत्तेने बाईचं जगणं एका विवक्षित परिघात बंदीस्त केलं आहे त्या परिघाला छेद देणाऱ्या अधिकतर कविता या संग्रहात सापडतात. पितृसत्ताक व्यवस्थेत बाईने पुरुषाच्या पुढे जाणं मंजूर नसतं. या पुरुषी मानसिकतेला चिमटा घेताना ससा कासवाच्या पारंपरिक गोष्टींचा आधार घेऊन त्या स्त्री-पुरुष असमानतेवर मार्मिक भाष्य करतात.

‘कन्या राशी’च्या भोगवट्यातून कोणतीही बाई सुटली नाही. पितृसत्तेच्या रहाटगाड्यात समस्त स्त्री वर्ग भरडलेला आहे. पुरुषी वासनेचा वेगवेगळ्या पातळ्यांवर तिला अनुभव येत असतो, त्यात अवर्ण-सवर्ण, शिक्षित अशिक्षित असा भेद नसतो; याचे वास्तव तपशील त्यांच्या ‘फरक’ या कवितेतून स्पष्ट होतात.

आज स्त्रिया घराबाहेर पडून अर्थार्जन करायला लागल्या आहेत. घर आणि नोकरी सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागते पण तिच्या या कर्तबगारीची वेगळी दखल घेण्याऐवजी तिच्या या सक्षमतेचं उदात्तीकरण केलं जातं. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या कसरतीत अनेक सुखकारक गोष्टींना तिला मुकावं लागतं.

इच्छा, अपेक्षा, स्वाभाविक गरजा पदरासारख्या कमरेला खोचून ती धावत राहते दमछाक होईपर्यंत. अशा प्रकारे होणारं आपलं शोषण बाईला कळू नये याचा एक सात्विक संताप अलका गांधी-असेरकर आपल्या ‘सुपर सिंड्रोम’ या कवितेतून व्यक्त करतात.

‘तू झाशीची राणी
घाल तुळशीलापण पाणी
तू सुनिता यानातली
रेख सड्यावरही रांगोळी..
ते का प्रयत्न करत नाहीत
तुझ्यासारखं होण्याचा जराही?’..

बाईच्या मातृत्वाचं, तिच्या सृजनशीलतेचं, तिच्या बाईपणाचं उदात्तीकरण करून तिला गोड भ्रमात ठेवलं जातं, पण त्याच्या आडून तिचं शोषण केलं जातं; परंतु पुरूषी सत्तेचा हा कुटील कावा आजच्या ग्लोबल जगातल्या बाईला कळूनही कळत नाही तेव्हा पुरुषी कूटनीतीचा पडदा फाडताना ‘सुपर सिंड्रोम’ सारख्या कवितेतून उपरोधाने अलका गांधी-असेरकर बाईलाही कानपिचक्या द्यायला बिचकत नाहीत.

बाईचं जगणं पुरुषाच्या सोयीचं व्हावं म्हणून बाई घडवण्याच्या प्रक्रियेला धार्मिक अधिष्ठान देऊन, पाप-पुण्याचं भय दाखवून तिला पुरुषांकित करून ठेवलं आहे. धर्मशास्त्रे, पुराणे यांचे दाखले देऊन तिचा बौद्धिक-मानसिक set-up बनविला गेलाय. अलका गांधी-असेरकर याच महाभारत, पुराणे इत्यादींमधल्या मिथकांचा स्व-तंत्र पद्धतीने धांडोळा घेतात. तर्कबुद्धीने त्याचा यथेच्छ समाचार घेतात. वेळप्रसंगी विज्ञानाचे दाखलेही देतात. अशावेळी त्यांची कविता काहीशी आक्रमक होताना दिसते.

‘कदाचित रावणा तुझे चुकलेच’ अशा कवितेतून नरोत्तम रामाची प्रतिमा तपासायला भाग पाडतात. द्रौपदीसारख्या पौराणिक पात्राचा अचूक वापर आपल्या कवितेत करतात. तेव्हा त्यांची ही द्रौपदी पारंपरिक नसते तर स्वेच्छेने राज्यसभेत उतरून परंपरा, धर्मसत्ता यांची वस्त्रे फेडून निर्वस्त्र होऊन आपल्या आदिम उगमाचा, आपल्या मानवीय अस्तित्वाचा उच्चारव करते. अशी कविता स्त्रीवादाच्या पलीकडे जाऊन तिच्या माणूस असण्याचा हट्ट धरताना दिसते.

संग्रहातल्या अधिकतर कविता स्त्रीकेंद्री, बाईच्या शोषणावर भाष्य करतात. विज्ञानाने बाईच्या शोषणाची नवी दारे उघडली आहेत. ‘फेसबूक-व्हाट्सप इत्यादी’ सारख्या कवितेतून बाईच्या चारित्र्याची बदलती परिमाणं अलका गांधी-असेरकर अचूक टिपतात.

बाईबद्दल बोलत असताना भोवतालचं बदलतं वास्तव एक संवेदनशील कवयित्री म्हणून त्यांना साद घालताना दिसतं. आजच्या घडीला करपलेलं लहान मुलांचं बाल्य त्या ‘शाळेची वाट’ या कवितेत रेखाटतात. तेव्हा मन भयव्याकुळ होते. बदलणारं सामाजिक पर्यावरण, त्यातली दांभिकता ’२६ जानेवारी’ सारख्या कवितेतून त्या निःसंकोचपणे उघडी करतात.

एकूणच कविता संग्रहाचा विचार करताना कवितेच्या अनुषंगाने आलेल्या विचारांच्या, विषयाच्या मांडणीचा धीटपणा वाचकाला एका कोवळ्या धाकात ठेवतो. आतापर्यंत स्त्री-सौंदर्याची, तिच्या कोमल कांतीची, तिच्या सचैल रूपाची अक वर्णने पुरुष कवींनी केलेली आहेत. पण पुरुषाच्या सौंदर्याचं वर्णन तेही स्त्री-साहित्यिकांकडून अभावानेच झालेलं दिसतं. पण अलका गांधी-असेरकर ‘अडकलेला पाऊस’ कवितेत सचैल पुरुषाचं मोहक रूप रेखाटतात.

त्यांच्या धीटाईला तर दाद द्यावी लागतेच पण शृंगार रसाचं पेटंट केवळ पुरुषांच्याच मालकीचं नसल्याचा अस्फूट सूर त्यातून सापडतो. हे पेटंट आपल्या अधिकारात घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं.

‘कन्या रास’ हे अलका गांधींचं प्रौढत्वात झालेलं अपत्य! जगण्याच्या प्रवासात कुणी, कधी कुणाला भेटावं याला काही नियम नसतो किंवा त्याचा नेमही नसतो. अलका गांधींना कविता पन्नाशीत भेटली. त्या जरी असं म्हणत असल्या तरी जाणत्या वयातच कवितेची बीजं त्यांच्या जाणीव-नेणीवेत आधीपासूनच रूजली असावीत.

किंबहुना ती संवेदनेत होतीच फक्त तिला शब्दरूप धारण करायला त्यांना पन्नाशी गाठावी लागली. याचा दुसरा अर्ध लोणचं मुरावं तशी कविता अनेक वर्षे त्यांच्या आत मुरली गेलीय. अनेक वर्षांच्या वैचारिक मंथनातून ती परिपक्व होत गेली. म्हणूनच तिची अभिव्यक्ती आशयघन अन वैचारिक संपन्नता घेऊन उतरली आहे.

संग्रहातल्या सगळ्याच कविता वाचनीय आहेत. काही कविता केवळ विचार मांडतात. कधी-कधी त्या सलग विचार मांडतात. पण तरीही त्याला आपण कविता म्हणू शकतो. एकतर त्या वैचारिक मंथनातून आलेल्या आहेत आणि माणसाच्या जगण्याबद्दल बोलत आहेत.

संपूर्ण कवितासंग्रह स्त्रीत्वाचा, स्त्रीजाणीवेचा धागा कुठेही सोडत नाही, तरीही ते केवळ बाईची कविता नाही, तर ती बाई-‘माणसाची’कविता आहे, याची खूणगाठ वाचकाने बांधावी.

पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवण्यासारखं तर आहेच, पण मिटून ठेवल्यावर पुन्हा पुन्हा उघडून वाचावसं वाटेल असं आहे. अलका गांधी-असेरकर तुमच्या पुढच्या लेखनाला खंडीभर शुभेच्छा.

 

 

 

छाया कोरेगांवकर

मराठीतील ज्येष्ठ कवयित्री


झिम्माड विभागातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा :

झिम्माड


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आयोजित बोलू कवतिके उपक्रमात कवयित्री छाया कोरेगांवकर यांच्याशी संवाद साधलाय, राज असरोंडकर यांनी !

युट्यूबवर ऐका :
छाया कोरेगांवकर यांची राज असरोंडकर यांनी घेतलेली मुलाखत !

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!