संधी मिळताक्षणी देश सोडायचा का?

संधी मिळताक्षणी देश सोडायचा का?

संधी मिळताक्षणी देश सोडायचा का?

कसारा घाटात एका कंटेनरचे ब्रेक फेल झाले. तो आधीच ओव्हरलोडेड होता. त्यात लोखंडी सळ्या. रविवार सकाळची वेळ. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने अनेक गाड्यांचा चुथडा करत एका गॅस टँकरला धडक दिली. सुदैवाने त्या गॅस टॅंकरचा स्फोट झाला नाही. हे सर्व भयानक नाट्य घाटात सुरु असतांना मागून येणाऱ्या आणि समोरून घाट चढणाऱ्या गाड्यांना संदेश देता येईल, त्यांची रहदारी नियंत्रित करता येईल, अशी कोणतीही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा इथे नाही.

घाट आधीच दोन्ही बाजूने खचलेला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी एका बाजूने अनेक आठवडे तो बंद होता. घाटात फोनला रेंज नाही अजिबात. इथे प्यायचं पाणी, टॉयलेट्सची कुठेही सोय नाही. काही इमर्जन्सी उद्भवली, तर कोणाला कळवणार, कसलाच पत्ता नाही. जवळपास हॉस्पिटल, डॉक्टर कुठे आहेत माहित नाही.

काल ह्या थरार नाट्याच्या वेळेसच मी माझ्या कुटुंबासकट कसारा घाटाच्या दिशेने निघाले होते. सुदैवाने घरून निघतांना उशीर झाला, म्हणून तो कंटेनर पुढे गेलेला होता. परंतु, नंतर तिथे जी काही अभूतपूर्व ट्रॅफिक जॅम झाली की विचारता सोय नाही. नासिक ते कल्याण इतक्या प्रवासाला तब्बल दहा तास लागले. घाटात गाड्या अडकून पडलेल्या. रस्ता खचलेला. मोठाल्या गाड्या दोन्ही दिशेने ब्लॉक करताय रस्ता. त्यांना रोखायला, सूचना द्यायला, रस्ता मोकळा करायला कोणीही दिसत नव्हतं.

घरी पोहोचल्यावर ज्या बातम्या वाचल्या, त्यात स्थानिक पोलिसांनी दोन तासांत घाटातली वाहतूक सुरु केली, असे उल्लेख होते. त्यांचं घड्याळ वेगळं असावं. जेंव्हा घाटातून इतक्या मोठ्या गाड्या जातात, तर त्यांचे लोड किती आहे, ते आधीच का तपासले जात नाही? आपत्ती व्यवस्थापन म्हणून इथे काय सोयी सुविधा आहेत?

काल पुण्याच्या एंट्रीला अनेक रस्त्यांना चार पाच किलोमीटरचे ट्रॅफिक जॅम होते. मुंबईत घोडबंदर रोड, शीळ फाटा, ठाणे ते कल्याण रस्ता इथे कायमच वाहतूक कोंडी झालेली दिसते. त्यात पाऊस सुरु झाला, तर गाडीतून खाली उतरता येत नाही. गाडीत पुरेसं पाणी, अन्न असेलच असं नाही. कित्येक लाल डबा बसेसचे, खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वायपर्स बंद पडलेले असतात. बसेस गळत असतात. आपापल्या गाडीत एसी लावून बसलं, तर टॉयलेट्स गाठावे लागतात जे अभावानेच आढळतात. रस्ते अतिशय खराब आहेत संपूर्ण महाराष्ट्रातच. आपत्तीत लोक धंदा शोधतात. जास्त दराने पाणी, जास्त भाडं घेतात. एकीकडे रोड प्रवास इतके जीवघेणे झालेले असतांना ट्रेन मध्ये तर चढूच शकत नाही, अशी भयानक गर्दी असते. मीरा रोड, डोंबिवली ह्या स्थानकांमधून ट्रेनमध्ये शिरणे अत्यंत अवघड आहे पीक अवर्स ला. रोजचं मरण!

आमचे नेते काय करतात, माहित नाही. आमचे अनेक सेलिब्रिटी ह्या मूलभूत प्रश्नांबद्दल काहीही बोलत नाहीत. आमच्या अस्मिता एकदम तीव्र आहेत आणि आम्ही इतिहासात कधी काळी घडलेल्या घटना वर्तमानात आपल्या सोयीने चघळत किडलेली फुफ्फुसं आणखीन फुगवत बसतो. आमची संस्कृती कशी महान आहे, ह्या पलीकडे मुद्देच दिसत नाहीत लोकांना किंवा ते पाहायचेच नाही आहेत.

माझ्यासारख्या आणि माझ्याहून लहान अशा सर्वांना मी हाच सल्ला देईन की चांगली संधी मिळता क्षणी हा देश सोडा. मला अनेक संधी मिळून देखील मी फिरून इथेच येत राहते आणि अजूनही मी आशा सोडलेली नाही. पण, ज्यांना ही कचकच नको आहे, आयुष्याचा दर्जा चांगला हवा आहे, रस्त्यावर आलेले सण वार, कलकल नको वाटते, इथली पुरुष प्रधानता नकोशी वाटते, इथली जात-धर्म व्यवस्था नको वाटते, त्यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये वर असलेल्या, जेंडर इश्युज बद्दल संवेदनशील असलेल्या, सुबत्ता असलेल्या, स्त्रिया मोठ्या पदांवर जास्त संख्येने असलेल्या, बऱ्यापैकी निधर्मी झालेल्या देशांमध्ये करिअर करावे! असे भरपूर देश आहेत. स्वतःचे स्वतः शोधून घ्यावेत. माझं ठरलंय!


प्राची पाठक
#Prachi_Chirpy


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!