उल्हासनगर महानगरपालिका हळूहळू कात टाकू लागली आहे. अलिकडच्या काळात विविध निमित्ताने महापालिका तिच्या आजवरच्या स्वभावाच्या बाहेर येऊन कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करू लागली आहे. इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातूनही उल्हासनगर महानगरपालिकेने काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. सामाजिक संदेश देणाऱ्या माहितीपटांची निर्मिती केली.
आता महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चक्क कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची ती संकल्पना होती. उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालकीच्या तरुण तलावाच्या जागेतील सभागृहात संपन्न झालेल्या कवी संमेलनासाठी लक्षणीय संख्येने महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, आरोग्य अधिकारी दिलीप पगारे या अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ या कवी संमेलनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रशासनाचा हुरुप वाढला असून, कलासाहित्यिक स्वरुपाचे अनेकविध कार्यक्रम यापुढेही आयोजित केले जातील, असं आयुक्त अजीज शेख यांनी मीडिया भारत न्यूजला सांगितलं.
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर यांनी कवी संमेलनाचं उद्घाटन केलं तर मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. भिलारे यांचा अलीकडेच वास्तव हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

या कवी संमेलनात महाराष्ट्रातलं एक चर्चेतलं नाव कवी जितेंद्र लाड विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांच्या गेय कवितांनी ही मैफल चांगलीच रंगली. मराठीतील नामवंत कवयित्री व मराठी भाषा अभ्यासक वृषाली विनायक यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करत रसिकांना खिळवून ठेवलं.
उल्हासनगर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर कवीच्या भूमिकेत मंचावर पाहायला मिळाले. किरण भिलारे, वृषाली विनायक, जितेंद्र लाड, राज असरोंडकर, दिलीप मालवणकर, डॉ. नरसिंग इंगळे, दीपक वाटवानी, दिनेश गोगी, प्रिया मयेकर, प्रफुल केदारे, करुणा केथानी, डॉ. सुमित्रा जाधव यांनी कवी संमेलनात सहभाग नोंदवला.
महानगरपालिकेच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी बाळू नेटके यांनीही आपल्या कविता सादर केल्या. महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी आभारप्रदर्शन केलं.