खय्याम : रसिकांसाठीच जगलेला संगीतकार !!!

खय्याम : रसिकांसाठीच जगलेला संगीतकार !!!

खय्याम : रसिकांसाठीच जगलेला संगीतकार !!!

१८ फेब्रुवारी १९२७ आली पंजाब मधील नवाब शहर येथे जन्मलेल्या मोहम्मद जहुर खैयाम हाश्मी. म्हणजे संगीत सम्राट खय्याम. यांच्या घरात काव्य आणि संगीताचा माहोल आधीपासूनच. खरंतर के. एल. सहगल यांनी प्रभावित होऊन अभिनेता होण्यासाठी घरातून लहानपणीच पळुन आलेला हा मुलगा. शिक्षणापेक्षा संगीतात अधिक रमणारा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैन्यात भरती झालेला हा शूर सैनिक त्या युध्द मैदानापेक्षा संगीत विश्वातील सूर सेनापती झाला. संगीतकारांच्या इतिहासातील सुवर्ण पर्वच ठरला.

 “फिर छिडी रात बात फुलोंकी”…., “कभी कभी मेरे दिल में खयाल आता है ” ….  “इन आँँखो की मस्ती के “….  “वह सुबह कब आयेगी “…, ” ऐ दिले नादान”.., “तेरे चेहरे से नजर नही “…  यासारख्या भावनोत्कट हिंदी चित्रपट गीतांनी आपला कित्येक मैलांचा प्रवास सुलभ करून ठेवलाय. लांबच्या प्रवासात गाडीत ही मन, मान आणि मेंदू डुलवणारी गाणी आजही आग्रही असतात.  शब्दांना जिवंत करून समाधिस्थ करण्याची ताकद आहे या गीतांच्या संगीतात. माणूस जेव्हा जेव्हा उदास होतो , विषण्ण  होतो , तेव्हा अस्थिर मनाला स्थिर, चैतन्य मय करण्याचं सामर्थ्य बाळगून आहेत, खय्याम यांची शेकडो गाणी.

केवळ चित्रपटाला गीत संगीत साज चढवल्यामुळे अजरामर झालेले चित्रपट खय्याम यांच्या प्रयोगशील संगीतरचनेचे द्योतक आहे. शेकडो चित्रपट गीतं , गजल , रुबाई , कव्वाली , नज्म,  मेलोडीस  साजशृंगाराने स्वरबध्द केलेल्या गीतांवर निस्सीम प्रेम करणारा खय्याम साहेबांचा चाहता वर्ग पाच दशकांपासून आजही त्यांच्या लाघवी ऋणानुबंधातच आहे.  संगीतातील प्रादेशिकता उभी करणं,  सांदर्भीत वाद्यांचा योग्य वापर, ठहराव आणि योग्य गळ्याकडुन गाऊन घेणं ही शक्तीस्थळं खय्याम यांनी हुकमी पणे वापरली आहेत.

धर्म जात ओलांडून केवळ सुर आणि धुन यांच्याशी  इमान राखणारा संगीतकार खय्याम यांचे स्वतः चे एक अबाधित पर्व आहे आणि कायम राहणारच. त्यांचे वयाच्या ९३  व्या वर्षी निघून जाणं जीवाला चटका देणारच. भारतीय हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात निरव समाधानाचं  युग देणारे संगीतकार म्हणून खय्याम यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही.

संगीतकार पं. हुसेनलाल भगतराम  व  पं.  अमरनाथ यांच्याकडून खय्याम यांनी संगीत शिक्षण घेतलं. वयाच्या १८ व्या वर्षी पाकिस्तानी संगीतकार बाबा चिश्ती यांच्यासोबत बिन मोली सहायक म्हणून काम सुरू केलं.  सुरुवातीला  ‘शर्माजी ‘ नावाने काम करणारे खय्याम यांना १९४७ सालच्या ” हिर – रांझा” चित्रपटाकरीता संगीत करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील गाणी तुफान गाजली , पण हा शांत मितभाषी संगीतकार उपेक्षितच राहिला. यानंतर “शोला और शबनम ” या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं “अकेले मे वह घबराऐ तो होंगे “… , या गाण्याने खय्याम यांना खरी ओळख दिली.

११ वर्षे संघर्ष केल्यानंतर  १९५८ च्या फिर वह सुबह  होगी…. या गीतांनी खय्याम यांना रसिकांंच्या आणखी जवळ पोहोचवलं.  साठच्या दशकातील “शोला और शबनम ‘” ,”फूटपाथ ‘” यासारख्या चित्रपटातूनही खय्याम रसिकांच्या पसंतीस उतरले. १९७६  च्या यश चोपडा यांच्या  ” कभी-कभी ” च्या गीतांना त्यांनी चढवलेल्या सुर-साजाने  ही गाणी अमर झाली.  आणि इथूनच खय्याम यांच्या नावाने जुबली चित्रपटांची संगीतमय मालिका सुरू झाली . उमरावजान च्या गाण्यांनी तर ब्लाँक ब्लास्टर दिला. ” त्रिशूल “, “बाजार ” , “रजिया सुलतान ” सारख्या चित्रपटांनाही अप्रतिम संगीत दिलं .

खय्याम यांच्यावर पद्मभूषण व  अकादमींच्या पुरस्कारां सोबतच रसिकांच्या अखंड प्रेमाचाही मोठा वर्षाव झाला.  शायरीची  नजाकत, आशयाची संवेदनशीलता,  भावनाप्रधानता, अल्लडता आणि  सौंदर्यने ओतप्रोत संगीतबध्द रोमँटिक तल्लीनतेचा दौर पाच दशकांपासून सुरुच आहे. त्यांच्या परिणामकारक व प्रयोगशील शैलीचे संगीत ऐकणारा  त्यांचा स्वतंत्र श्रोता वर्ग आज हळहळलाय.

आपल्या कामामध्ये टोटल सिन्सँरीटी हा आयुष्याचा स्थायीभाव ठेवून नेहमी  उंच उड्डाण भरणारा हा परफेक्शनिस्ट आपल्यातून निघून गेलाय, जगण्यातला ‘ सुकून ‘ देणाऱ्या शेकडो गाण्यांचं धन मागे ठेवूनच. जाताजाता आपल्या संपत्ती तील १२ कोटींचा निधी गरजू समाजाला दान करून जाणारा हा निर्गवी सूर, धुन यांचा  कुबेरच. आयुष्यभर नम्रपणे जगला तो रसिकांसाठी. स्वतः साठी कधीच नाही !!!

 

—–प्रफुल केदारे—–

लेखक पत्रकार आहेत व कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत.

kedarepraful@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!