काल वर्गात शिकवता-शिकवता सहजच, एका मुलाने प्रश्न केला. मॅडम अनुभव म्हणजे काय हो? कधीच वर्गात न बोलणारा मुलगा आज अचानक असा प्रश्न विचारतोय? मला कुतूहल वाटलं त्याचं. जरी आत्ताच्या विषयाला ते धरून नसलं तरीही, त्याने पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. हे खरोखरीच कौतुकास्पद बाब आहे.
आपण अनेकांमध्ये असलो, काही वेगळं ऐकत असलो, तरीही डोक्यात खूप काही चालू राहतं याची ही प्रचिती होती. विषयाला बगल देऊन त्याच्या बालबुद्धीला पटेल अशा त्रोटक शब्दांत अनुभव म्हणजे काय? हे मी सांगू लागले.

अनुभव म्हणजे एखाद्या प्रसंगातून आपल्याला मिळालेली चांगली-वाईट शिकवण, त्यातून आलेली प्रचिती. एवढं बोलून मी पहिला माझ्या विषयाला न्याय दिला. तो पूर्ण केला. आम्ही शिक्षक शासनाने चाकोरीबद्ध केलेला अभ्यासक्रम मुलांना शिकवल्याशिवाय राहत नाही. तो पूर्ण झाला तरच आमच्या मनास परम शांती मिळते. हा आमचा स्वभावधर्म.
भले मग त्यात मुलांना, त्याही पलिकडे काही प्रश्न पडत असतील तरीही आम्ही बहाद्दर आमचा मुद्दा काही सोडत नाहीत. पण नंतर मी विचार करू लागले. खरंच अनुभव म्हणजे इतकं त्रोटक उत्तर आहे? आपण त्याला थोडक्यात समाधानी करण्याचा प्रयत्न केला.

अनुभव म्हणजे व्यापक संकल्पना आहे. त्याची व्याख्या अजून तरी कोणत्या शाळेत शिकवली जात नाही. उत्तम अनुभव मुलांना येतील असे उपक्रम शाळांमधून जरूर घेतले जातात. पण त्याची व्याख्या, त्याची व्यापकता काही खुली केलेली नसते.
आयुष्य चांगल्या-वाईट अनुभवांनी समृद्ध आहे. प्रत्येक चांगल्या-वाईट अनुभवातून आपण शिकत राहतो. माणसाचं वागणं अनुभवांनी खुलत जातं. एखाद्याला आलेल्या अनुभवातूनच तो त्या प्रसंगाला वाईट किंवा चांगलं म्हणतो. प्रत्येकाच्या दृष्टीने एखादा प्रसंग चांगलाच अनुभव देईल असं काही सांगता येत नाही. एखाद्याला तशाच घडलेल्या प्रसंगाचा वाईटही अनुभव येऊ शकतो.
चांगले अनुभव माणसाला समृद्ध करत जातात. घडलेली घटना, आलेला प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सारखाच असत नाही. चांगले अनुभव, चांगल्या शिकवणी देतात त्यातून माणूस घडत जातो.
काही प्रसंगातून वाईट अनुभव येतात. ते मनावर कोरले जातात. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून आपण काळजी घेऊ लागतो. अनुभव उभारी देतात तसेच काही अनुभव माणसाला निष्क्रियसुद्धा बनवतात. अशांचं आयुष्यच उदासवाणं बनवतात. भीतीचं, नैराश्यवादी जीवन काय कामाचं?
काही प्रसंगातून आपल्याला माहीत असतं की, वाईट अनुभव येणार आहेत तरीही मन नेमकी तिच गोष्ट करण्यास प्रवृत्त होते. पुढच्याला ठेच लागल्यावर म्हणतात मागचा शहाणा होतो. पण सगळेच पुढच्याचे ऐकतातच असं नाही. प्रत्येक गोष्टीचा आपणहून अनुभव घ्यावा. असं बऱ्याच जणांना होतं.
बऱ्याचदा चांगले आणि वाईट अनुभव आपल्याला मिळणं हे काही आपल्या हातात नसतं. आपल्या हातात फक्त इतकंच आहे की त्यातून आपण काय शिकणार आहोत. वाईट अनुभव ज्यांच्याकडून नेहमीच येत राहतात अशा व्यक्तीपासून चार हात लांब राहणंच योग्य. तुझा तू-माझा मी हेच बरोबर.
एखादी हवीहवीशी वाटणारी गोष्ट सुद्धा, आलेल्या वाईट अनुभवातून नकोशी होऊ लागते; म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या मार्गाने मार्गस्थ होणं चांगलं. मतमतांतरे असू शकतात. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. प्रत्येकाची व्याख्या निरनिराळी असू शकते. अनुभव घेत रहायचं, जीवन समृध्द करत रहायचं. चांगले- वाईट जे काही असेल ते स्वीकारत जायचं.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com